|| अजय वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेटो स्विच गियर अ‍ॅण्ड केबल्स लिमिटेड (बीएसई कोड – ५३९३३१)

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘एनएसई इमर्ज’ या एसएमई व्यासपीठावर २०१२ मध्ये ‘आयपीओ’द्वारे नोंद झालेली वेटो स्विच गियर अ‍ॅण्ड केबल्स लिमिटेड ही लघुउद्योगांत मोडणारी कंपनी तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ मध्ये आता शेअर बाजारच्या मुख्य पटलावर आली आहे. गेली पन्नास वर्षे इलेक्ट्रिकल उपकरणांत कंपनीचे वेटो आणि विमल पॉवर हे दोन आघडीचे ब्रॅण्ड अस्तित्वात आहेत.

सुरुवातीला केवळ स्विच गियर, वायर्स आणि केबल्सचे उत्पादन करणारी ही कंपनी आता इलेक्ट्रिकल क्षेत्रातील घरगुती तसेच ओद्योगिक क्षेत्राला अनुसरून अनेक वस्तूंचे उत्पादन करते. यात प्रामुख्याने औद्योगिक केबल्स, मोडय़ूलर स्विच, विविध प्रकारचे पंखे, सीएफएल तसेच एलईडी लाइट्स, पम्प, हीटर्स, एमसीबी बॉक्स आदींचा समावेश होतो. मुंबई तसेच हरिद्वार येथील अद्ययावत कारखान्यातून कंपनी आपली विविध उत्पादने उत्पादित करते आणि आपल्या २,५०० वितरकांमार्फत वितरण करते. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनी आपली उत्पादने निर्यात देखील करू लागली असून गेल्या दहा वर्षांपासून ती आखाती देशांत नियमित निर्यात करीत आहे. सध्या पश्चिम भारतात प्राबल्य असलेली वेटो स्विच गियर आता आपले वितरण आणि सेवा जाळे भारतातील इतरही राज्यांत विस्तारत आहे. जून २०१८ अखेर समाप्त आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने विक्रीत १६.२३ टक्के वाढ साध्य केली असून ७.८१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ३०.२५ टक्क्यांनी जास्त आहे.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सोलर मिशन कार्यक्रमांतर्गत २०२२ पर्यंत १००,००० मेगावॉट सौर ऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. याचा मोठा फायदा वेटोसारख्या कंपन्यांना होईल. तसेच सध्या पायाभूत सुविधांवर सरकार देत असलेला भर, पंतप्रधान आवास योजना, एलईडी दिव्यांना असलेले प्राधान्य, डिजिटल इंडिया यांसारख्या अनेक मोहिमांचा कंपनीला मोठय़ा प्रमाणात फायदा होईल. कंपनीचे दोन्ही प्रकल्प अद्ययावत असून उत्पादन क्षमतादेखील पुरेशी असल्याने या कामी अतिरिक्त भांडवली खर्चही करावा लागणार नाही. सध्या वर्षभराच्या नीचांकाच्या आसपास उपलब्ध असलेला हा मायक्रो स्मॉल कॅप कंपनीचा शेअर एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून फायद्याचा ठरू शकतो.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

 

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veto switch gears and cables ltd
First published on: 17-09-2018 at 04:53 IST