News Flash

अविवा धन वर्षां..

डाबर उद्योगसमूह आणि जागतिक स्तरावरील अविवा इन्शुरन्स कंपनी यांच्या सहयोगाने २००२ साली भारतात स्थापन झालेल्या अविवा इंडिया या आयुर्विमा कंपनीची एन्डाउमेंट प्रकारात मोडणारी ही पॉलीसी.

| July 8, 2013 08:53 am

डाबर उद्योगसमूह आणि जागतिक स्तरावरील अविवा इन्शुरन्स कंपनी यांच्या सहयोगाने २००२ साली भारतात स्थापन झालेल्या अविवा इंडिया या आयुर्विमा कंपनीची एन्डाउमेंट प्रकारात मोडणारी ही पॉलीसी.
सर्वसाधारणपणे विमा पॉलिसीचे फॉर्म भरण्यासाठी विमा इच्छुक नाखूष असतो. ते काम विमा विक्रेत्याचे आहे असे गृहीत धरले जाते. त्यामुळे भविष्यात काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी अविवा कंपनीच्या माहितीपत्रकात एक मोलाची सूचना दिलेली असते – ‘विमाइच्छुकाने पॉलिसीचा प्रपोजल फॉर्म स्वत: भरावा आणि सगळी माहिती तंतोतंत खरी असावी. जेणेकरून भविष्यात क्लेम देण्याची वेळ आली तर कोणताही प्रश्न उभा राहणार नाही.’ ही अतिशय महत्वाची सूचना आहे.
ठळक वैशिष्टय़े :
१. आठ ते ६० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना ही पॉलिसी घेता येते. २. पॉलिसीच्या परिपक्वतेचे वय आहे १८ ते ७० वष्रे. ३. ही पॉलिसी पाच, १०, १५ किंवा २० वर्षांच्या टर्मसाठी घेता येते. ४. पाच वर्षांच्या पॉलिसीसाठी प्रिमियम भरायचा कालावधी पाच वर्षांचा असतो. इतर पॉलिसींसाठी त्या त्या पॉलिसींच्या टर्मपेक्षा पाच वष्रे कमी असतो. ५. वार्षकि प्रिमियम कमीत कमी ५०,०००रु. आहे. त्यापेक्षा जास्त प्रिमियमवर मर्यादा नाही.
पॉलिसीचे लाभ :
या पॉलिसीमध्ये विमा छत्राबरोबरच हमी दिलेल्या लाभांचाही समावेश आहे. विमाधारकाच्या पॉलिसीच्या टर्मनुसार दरवर्षी कंपनीने हमी दिलेली ठराविक रक्कम त्याच्या खात्यात जमा होणार. जितकी वर्ष विमाधारक प्रिमियम भरतो तितकी वर्ष हा हमी दिलेला लाभ त्याला प्राप्त होणार.
प्रिमियम भरायची टर्म संपल्यावर विमाधारकाच्या खात्यामधे जमा झालेली एकूण रक्कम त्याला प्राप्त होणार. पॉलिसीची टर्म संपल्यावर त्याला विमाछत्राची रक्कमही प्राप्त होणार. प्रिमियम भरायच्या टर्ममध्ये विमाधारकाचा मृत्यु झाला तर वारसाला विम्याची रक्कम आणि त्याच्या खात्यातील जमा रक्कम मिळणार. त्यानंतर विमाछत्राच्या कालावधीत त्याचा मृत्यु झाला तर वारसाला विमाछत्राची रक्कम प्राप्त होणार.
उदाहरण :
विमाधारकाचे वय    : २९ वष्रे
पॉलिसीची टर्म    : २० वष्रे
प्रिमियम भरायची टर्म    : १५ वष्रे
विमाछत्र     : ११,१२,४७१ रु.
वार्षकि प्रिमियम     : १,०३,०९० रु.(सíव्हस टॅक्स सह)
लाभ :
या उदाहरणामधील विमाधारकाला प्रिमियम भरायच्या टर्ममध्ये (१५ वष्रे) दरवर्षी ९० रु. (प्रति १००० रु.) या दराने १,००,१२२ रु. लाभ होणार आहे. त्यानुसार १५ वर्षांमध्ये त्याच्या खात्यात एकूण १५,०१,८३६ रु. इतकी रक्कम जमा होणार आहे आणि त्यानंतरची पाच वष्रे विमाछत्र चालूच रहाणार आहे आणि २० वर्षांनंतर विमाछत्राची ११,१२,४७१ रु. इतकी रक्कमही त्याला प्राप्त होणार आहे.
विश्लेषण :
विमाधारक पहिल्या वर्षी १,०३,०९० रु.प्रिमियम भरतो आणि दुसऱ्या वर्षांपासून १५ व्या वर्षांपर्यंत वार्षकि १,०१,५४५ रु.प्रिमियम भरतो. एकूण प्रिमियमची रक्कम होते १५,२४,७२० रु. आणि हे सर्व करताना त्याचे विमाछत्र आहे ११,१२,४७१ रु. प्रिमियमच्या तुलनेत हे अगदीच नगण्य आहे. पॉलिसीची १५ वष्रे पूर्ण झाली, की कंपनी त्याला हमी दिलेली १५,०१,८३६ रु. परत देते. म्हणजे एकूण भरलेल्या रकमेपेक्षा २२,८८४ रु. कमी देते (१५,२४,७२० -१५,०१,८३६) आणि या बाकी राहिलेल्या रकमेत त्याचे विमाछत्र २० वर्षांपर्यंत चालू ठेवते. म्हणजे गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातूनही ही पॉलिसी लाभदायक नाही. कारण दरवर्षी जमा केलेल्या प्रिमियमच्या बदल्यात त्याला १५व्या वर्षी जी रक्कम प्राप्त होते त्याचा परताव्याचा दर होतो. द.सा.द.शे. सरासरी (-) ०.२०टक्के. थोडक्यात मुद्दलात घाटा असा हा प्रकार आहे.
पर्याय :
सदर विमा इच्छुकाला त्याच एकूण रकमेमध्ये (१५,२४,७२० रु.) जास्तीचे विमाछत्र आणि जास्तीचा परतावा मिळू शकतो काय त्याचा विचार करुया. भारतातील दोन अग्रगण्य विमा कंपन्या माने प्युअर टर्म पॉलिसी घेतल्या तर काय होते ते पाहुया.
विमाछत्र ५० लाख रु. आणि टर्म ३० वष्रे.
कंपनी क्र. १ :
वार्षकि प्रिमीयम १७,८६५ रुपये (सव्‍‌र्हीस टॅक्स सह). ३० वर्षांची एकूण प्रिमियमची रक्कम ५,३५,९५० रु. अविवा धनवर्षांच्या एकूण प्रिमियमच्या तुलनेत बचत ९,८८,७७० रु. ही रक्कम वार्षकि ६५,९२० रु. प्रमाणे, ज्यामध्ये आयकरात सूट आहे आणि परतावा आयकर मुक्त आहे अशा गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये १५ वष्रे गुंतविली तर १५ वर्षांनंतर, विमाइच्छुकाच्या ४४ व्या वर्षी २०,५४,९०८ रु. प्राप्त होणार. तेही खात्रीलायक.
कंपनी क्र.२ :
वार्षकि प्रिमियम ६,७४५ रुपये. ३० वर्षांचे एकूण प्रिमियम २,०२,३५० रु. अविवा धनवर्षांच्या तुलनेत प्रिमियमच्या रकमेमधील बचत १३,२२,३७० रु. ही रक्कम वार्षकि ८८,१६० रु.प्रमाणे वरील सेफ पर्यायात १५ वष्रे गुंतविली तर त्याच्या वयाच्या ४४ व्या वर्षी २७,४७,१९० रु. इतकी गंगाजळी त्याला प्राप्त होणार.
तुलना :
१. अविवा धनवर्षांपेक्षा कंपनी क्र.१ आणि २मध्ये विमाछत्राची रक्कम जवळजवळ पाचपट आहे.
२. ज्या वयामध्ये घरातील कर्त्यां पुरुषावर जास्त जबाबदा-या असतात त्या ४९ व्या वर्षी अविवा धनवर्षांचे विमाछत्र संपते. कं. क्र.१ आणि २ चे विमाछत्र उदाहरणामधील विमाधारकाच्या वयाच्या ५९ वर्षांपर्यंत चालू राहाते.
३. अविवा धनवर्षांच्या प्रत्याभूत मॅच्युरिटीची रक्कम विमाधारकाने भरलेल्या एकूण प्रिमियमपेक्षा कमी आहे. (धनवर्षां म्हणजे पशांचा पाऊस. या उदाहरणामधील पशांचा पाऊस हा केरळमधील आहे की राजस्थानमधील आहे हे विमाइच्छुकाने ठरवायचे आहे) कं.क्र.१ व २नुसार त्याच विमाधारकाला अविवा धनवर्षांच्या रकमेपेक्षा अनुक्रमे (२०,५४,९०८ रु.) सुमारे ३६टक्के आणि (२७,४७,१९० रु) ८३टक्के जास्त आहे.
थोडक्यात :
विमाछत्राच्या रकमेबाबत आणि कालावधी बाबत विचार केला तर अविवा धनवर्षांपेक्षा कंपनी क्र.१ आणि २च्या प्युअर टर्म पॉलिसी जास्त लाभदायक आहेत. त्याच बरोबर गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातूनही कितीतरी सरस आहेत. ज्यांची आयकरात सूट मिळविण्याची इच्छा आहे त्यांनाही तितकीच सूट मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 8:53 am

Web Title: view on aviva insurance company
टॅग : Loksatta,Marathi News
Next Stories
1 भांडवली मालमत्तेच्या विक्रीत ‘स्मार्ट’ वेळेचे महत्त्व!
2 वित्त- वेध
3 आश्चर्यकारक पण वास्तव गणित
Just Now!
X