बाजाराचा तंत्र-कल : आशीष ठाकूर

सरलेल्या सप्ताहात निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ५२,२५० आणि निफ्टी निर्देशांकाने कसाबसा १५,७०० चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखला; पण सरलेल्या सप्ताहातील निर्देशांकाची वाटचाल ही खरे तर ड्रॅगनच्या पडछायेतील होती. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५२,५८६.८४ / निफ्टी : १५,७६३.०५

आज आपण चीन व हाँगकाँगचे भांडवली बाजार कोसळण्यामागची कारणे विस्तृतपणे समजून घेऊ या आणि त्यांचा आपल्या निर्देशांकावर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेऊ या. एखादा देश त्यांनी अंगीकारलेल्या आर्थिक विचारसरणीचा, ध्येयधोरणांचा, तत्त्वप्रणालीच्या वाटचालीचा शतकोत्सव साजरा करत असताना, त्यांच्याकडून मागील चुका टाळत, जास्तीत जास्त लोकाभिमुख, उदयोगस्नेही ध्येयधोरणे आखत, नवीन कात टाकत पुढील वाटचाल आखली जाते; पण चीनमध्ये बरोबर उलट घडत आहे. तेथे सत्तेवर असलेल्या साम्यवादी पक्षाला शंभर वर्षे पूर्ण करीत असताना, प्रत्यक्षात सरकारकडून होत असलेल्या सुधारणा या पुरोगामी विचारांना तिलांजली देणाऱ्या आहेत. सरकारने उद्योगधंद्यांची गळचेपी, मुस्कटदाबी, सरकारी धोरणांना विरोध करणाऱ्या उद्योगपतींचे अपहरण व त्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू अशा विविध घटना घडत आहेत.

चीन महासत्ता म्हणून उदयास येण्यामागे जी औद्योगिक क्षेत्रांची भूमिका आहे त्यात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, संगणक क्षेत्र, शिक्षण क्षेत्रातील ज्ञान संवर्धन व ज्ञान प्रसारण करणारी संकेतस्थळे (शैक्षणिक अ‍ॅप), माहिती-तंत्रज्ञानावर आधारित वाणिज्य व्यवसाय (ई-कॉमर्स), आरोग्य सेवा पुरवणारे उद्योग, संगीत, मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या या सर्वावर कठोर आर्थिक निर्बंध लादले जात आहेत. सर्वत्र अविश्वासाचे, संशयास्पद वातावरण आहे. याचा थेट परिणाम हाँगकाँग, चीनचा भांडवली बाजार कोसळण्यात झाला व त्याचा परिणाम भारतीय भांडवली बाजारांवर झाला. या निराशाजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्देशांकांनी आपला ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ जो सेन्सेक्सवर ५२,२५० आणि निफ्टी निर्देशांकावर १५,७०० असा होता, तो स्तर सरलेल्या सप्ताहातील बुधवारी तोडला. त्या दिवसांतील व्यवहारात सेन्सेक्सने ५१,८०२ आणि निफ्टीने १५,५१३ चा क्षणिक नीचांक नोंदवला आणि पुन्हा सुधारणा झाली.

ऐंशीच्या दशकात चीनने जगासाठी उदार औद्योगिक धोरणांची जी झूल पांघरली होती त्याचे आता बेगडी स्वरूप दिसून येत आहे. त्या वेळेलादेखील जाणकार अर्थतज्ज्ञ, धुरीणांनी सावध करणारे इशारे दिले होते. चीनच्या अफाट लोकसंख्येला रोजगार, सरकारला औद्योगिक भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान हवे आहे म्हणून चीन सरकार पाश्चिमात्य देशांतील कंपन्यांचे पायघडय़ा घालून स्वागत करत आहे. तरी सावध राहून चीनशी आर्थिक व्यवहार करावे असा तो इशारा आता प्रत्यक्षात येत आहे.

भांडवली बाजारातील निर्देशांकाची वाटचाल पाहता, सेन्सेक्सवर ५२,३८० ते ५२,८७० आणि निफ्टी निर्देशांकावर १५,७०० ते १५,९०० हा निर्देशांकाच्या आगामी वाटचालीचा परीघ असेल. सेन्सेक्स सातत्याने ५२,८७० आणि निफ्टी निर्देशांक १५,९०० स्तरावर सातत्याने टिकल्यास निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५३,५०० ते ५४,००० आणि निफ्टीवर १६,१०० ते १६,२०० असेल. अन्यथा सेन्सेक्सने ५२,२५० आणि निफ्टी निर्देशांकाने १५,७०० चा स्तर तोडल्यास निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ५१,८०० आणि  निफ्टी निर्देशांकांवर १५,५०० असे असेल.

  • लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

निकालपूर्व विश्लेषण

१) नोसिल लिमिटेड

’  तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, ३ ऑगस्ट

’  ३० जुलैचा बंद भाव – २६१.२५ रु.

’  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २७५ रुपये, द्वितीय लक्ष्य ३१० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २२५ रुपयांपर्यंत घसरण.

२) स्टेट बँक ऑफ इंडिया

’  तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, ४ ऑगस्ट

’  ३० जुलैचा बंद भाव – ४३१.७० रु.

’  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४२५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४४० रुपये, द्वितीय लक्ष्य ५०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४२५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४०० रुपयांपर्यंत घसरण.

३) हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

’  तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, ६ ऑगस्ट

’  ३० जुलैचा बंद भाव – ४४४.४५ रु.

’  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४३० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४७५ रुपये, द्वितीय लक्ष्य ५०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४०० रुपयांपर्यंत घसरण.