जगभरात गुंतवणूकदारांच्या पसंतीला उतरणारे इंडेक्स फंड भारतात मात्र फारसे लोकप्रिय नाहीत. याची कारणे कदाचित भारतीयांच्या मानसिकतेत असतील. अशा फंडाविषयी म्हणावा तितका अभ्यास व जागरूकता निर्माण केली गेलेला नाही, हे स्पष्टच आहे..
कोणत्याही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या फंडाचा तुलनात्मक निर्देशांक म्हणजेच परताव्यासाठी निर्देशांक (इंडेक्स) गृहीत धरला जातो. ज्याला ‘बेन्चमार्क इंडेक्स’ असे म्हटले जाते. हा निकष काय आहे ते जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण फंडाचा परतावा या निर्देशांकावर (इंडेक्सवर) अवलंबून असतो. त्यामुळे कोणत्या फंडाचे बेन्चमार्क इंडेक्स काय किंवा आधारस्तंभ काय व कोणते आहेत, त्याची रचना काय आहे, कोणते कोणते औद्योगिक क्षेत्रे, मालमत्ता प्रकारचा बेन्चमार्क इंडेक्समध्ये समावेश आहे याचा सोपा अभ्यास करणे गरजेचे आहे.
सामान्य गुंतवणूकदारांनी आठवडय़ातून किंवा महिन्यातून एकदा या इंडेक्सवर लक्ष ठेवेणे गरजेचे असते.
भारतात जसे प्रामुख्याने NSE-Nifty50 व BSE-Sensex30  इंडेक्स आहेत तसेच जागतिक पातळीवर एसएनपी५००, रसेल२०००, डीजे वेल्शायर ५०००, Dow Jones (DJIA) असे नामांकित इंडेक्स कार्यरत असून मोठे गुंतवणूकदार सतत या इंडेक्सच्या चढ-उतारावर लक्ष ठेवून असतात.
आजच्या या भागात इंडेक्स फंडाविषयी जाणून घेऊ.
इंडेक्स फंड हे त्या त्या बेन्चमार्क इंडेक्सची प्रतिकृती असते. बेन्चमार्क इंडेक्स ज्या प्रमाणात परतावा देतो त्याच कमी अधिक प्रमाणात इंडेक्स फंड परतावा देतात.
ज्यांची शेअर व इतर बाजारावर श्रद्धा आहे आणि दीर्घकाळात बाजार चांगला परतावा देऊ शकतो म्हणून ज्यांच्याकडे सबुरी आहे अशा गुंतवणूकदारांसाठी उत्तम मार्ग म्हणजे ‘इंडेक्स फंडा’त गुंतवणूक करणे होय. जगभरात गुंतवणूकदारांच्या पसंतीला उतरणारे इंडेक्स फंड भारतात मात्र फारसे लोकप्रिय नाहीत. याची कारणे कदाचित भारतीयांच्या मानसिकतेत असतील किंवा अशा फंडाविषयी अभ्यास व जागरूकता निर्माण केली गेली नसेल.
अमेरिकेत म्युच्युअल फंडांकडील एकूण गंगाजळीपैकी १०-१२% मालमत्ता ही इंडेक्स फंडांची असते. Vanguard500  हा जागतिक पातळीवर नामांकित असलेला इंडेक्स फंड आहे. जो S&P500  या नामांकित निर्देशांकाची प्रतिकृती आहे. भारतात एकूण म्युच्युअल फंड व्यवसायाच्या १% रक्कमसुद्धा इंडेक्स फंडांमध्ये नाही. या फंडामध्ये कुठल्या कंपन्या घ्यायच्या, केव्हा घ्यायच्या, कुठल्या भावात घ्यायच्या, त्यांचा पोर्टफोलियोमध्ये काय वाटा हे प्रश्न इथे नसतात. ज्या प्रमाणात एखाद्या निर्देशांकात ज्या कंपन्या आहेत, त्या प्रमाणात व त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून इंडेक्स फंडाचा पोर्टफोलियो तयार करतात. दररोज किंवा आठवडय़ातून एकदा पोर्टफोलियोचा समतोल साधला जातो. म्हणजे ज्या कंपन्यांचे भाव वाढल्यामुळे पोर्टफोलियोमध्ये योगदान वाढले आहे त्या कंपन्या विकल्या जातात आणि ज्यांचे भाव खाली गेल्यामुळे योगदान कमी झाले त्या खरेदी केल्या जाऊन पोर्टफोलियोचा समतोल साधला जातो.
निर्देशांकाने दिलेला परतावा व इंडेक्स फंडाकडून मिळालेला परतावा यात फरक नसावा. फरक असेल तर त्याला ‘ट्रँकिंग एरर’ असे संबोधले जाते. भारतात वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांचे इंडेक्स फंड असून बहुतांश फंड निफ्टी प्लान व सेन्सेक्स प्लान असे दोन पर्याय उपलब्ध करून देतात. या प्रकारच्या फंडाने बऱ्याच वेळा कोणत्याही फंडापेक्षा उत्तम परतावा दिला आहे.
भारतात या प्रकारच्या फंडाच्या एकूण १८ योजना आहेत. त्यापकी फ्रॅन्कलिन इंडेक्स फंड – एनएसई निफ्टी प्लानची आज ओळख करून घेऊ.
हा फंड नियमित गुंतवणुकीसाठी खुला असणारा व मुदत बंद नसलेला (Open Ended) आहे. या फंडामध्ये निफ्टीतील कंपन्यांमध्ये निफ्टीतील त्यांच्या योगदानानुसार गुंतवणूक केली जाते. या फंडामध्ये फक्त ‘ग्रोथ’ हा पर्याय उपलब्ध आहे. या फंडाची इतर वैशिष्टय़े याप्रमाणे आहेत :