arth5

  • प्रश्न: मी एका शाळेत प्राथमिक शिक्षक आहे. माझे उत्पन्न आर्थिक वर्ष २०१६-१७ सालचे ३,४०,००० रुपये इतके असेल. मला कर वाचवायचा असेल तर मी कोठे गुंतवणूक करावी?

अंबादास बोराडे, मेलद्वारे

उत्तर : आपल्याला संपूर्ण कर वाचवायचा असेल तर आपल्याला ४०,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक ‘कलम ८० सी’ किंवा ‘कलम ८० डी’ खाली करता येईल. आपले वय ६० वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे आपले २,५०,००० रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. ‘कलम ८७ ए’ नुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ (कर निर्धारण वर्ष २०१७-१८) साठी ५,००० रुपयांपर्यंत कर सवलत विचारात घेऊन आपल्याला ४०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

‘कलम ८० सी’नुसार कर वजावटीसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत यात काही लोकप्रिय पर्याय असे : जीवन विमा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), मुलांचे शैक्षणिक शुल्क, पाच वर्षांची मुदत ठेव, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र वगैरे. खेरीज ‘कलम ८० डी’ प्रमाणे मेडिक्लेम विम्याची २५,००० रुपयांपर्यंत वजावट मिळते.

 

  • प्रश्न: मी सन २००० साली खरेदी केलेले एक घर आता विकले. या घराच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून दोन घरे आहेत. मी विकलेल्या घरावरील कर वाचविण्यासाठी अजून एक घर विकत घेऊ शकतो का?

एम. कडुस्कर, बडोदे

उत्तर : एका घराची विक्री केल्यानंतर त्यावर होणाऱ्या भांडवली नफ्यावर कर भरावयाचा नसेल तर ‘कलम ५४’ नुसार भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक नवीन घरात करावी लागते. आपल्याकडे किती घरे असावीत अशी अट नाही. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या घरात गुंतवणूक करता येईल. मागील वर्षांतील एका घराच्या विक्रीपासून झालेला भांडवली नफा फक्त एकाच घरात गुंतविता येतो.

 

  • प्रश्न: माझा मुलगा बी.ई. झाला आणि उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला आहे. आम्ही त्याच्यासाठी बँकेतून शैक्षणिक कर्ज घेतले आहे. हे कर्ज वडिलांनी त्यांच्या नावाने घेतले आहे. या कर्जावरील व्याज हे त्याच्या वडिलांनी भरले. या व्याजाची वडिलांना उत्पन्नातून वजावट मिळेल का?

पूजा काळे, मेलद्वारे

उत्तर : ‘कलम ८० ई’नुसार उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची वजावट उत्पन्नातून मिळते. ज्या वर्षी व्याज प्रत्यक्ष भरले आहे त्या वर्षी आणि पुढील सात वर्षे असे एकूण आठ वर्षांपर्यंत भरलेल्या व्याजाची वजावट मिळते. कर्जाच्या परतफेडीची वजावट मात्र मिळत नाही.

त्याचप्रमाणे हे कर्ज बँक, वित्तीय संस्था किंवा मान्यताप्राप्त धर्मादाय संस्थेकडून घेतले असले पाहिजे. मित्र किंवा नातेवाईकांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची वजावट या कलमानुसार मिळत नाही. या कलमानुसार वजावट घेण्यासाठी करदाता कर्जदार असणे गरजेचे आहे. मुलाच्या वडिलांनी कर्ज घेतले आहे तर या कलमानुसार वजावट फक्त वडिलांनाच मिळू शकेल. मुलगा या व्याजाची वजावट घेऊ शकणार नाही. या व्याजाच्या वजावटीला मर्यादा नाही. हे व्याज करपात्र उत्पन्नातूनच दिले गेले असले पाहिजे. अशा अटींची पूर्तता झाल्यास वजावट नक्कीच मिळते.

 

  • प्रश्न: माझी आई ज्येष्ठ नागरिक आहे. ती गृहिणी आहे आणि तिचे उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. तिची बँकेत मुदत ठेव आहे. या मुदत ठेवीच्या व्याजावर बँकेने आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये २,५०० रुपये इतका उद्गम कर (टीडीएस) कापला होता, हे आम्हाला ऑगस्ट २०१६ मध्ये समजले. आता हा कापला गेलेला कर तिला परत मिळेल का?

प्रकाश रोदिया, जालना

उत्तर : आर्थिक वर्ष २०१४-१५ (म्हणजेच कर निर्धारण वर्ष २०१५-१६) सालचे विवरणपत्र ३१ मार्च २०१७ पूर्वी दाखल करता येते. यानुसार आपण आता या वर्षीचे विवरण पत्र दाखल करू शकता आणि कर परताव्याचा (रिफंडचा) दावा करू शकता. परंतु ‘कलम २७१ एफ’ नुसार आर्थिक वर्ष २०१४-१५ सालचे विवरण पत्र ३१ मार्च २०१६ नंतर दाखल केल्यास ५,००० रुपयांचा दंड आकारला जाऊ  शकतो.

 

  • प्रश्न: मी १ जानेवारी २०१५ रोजी एका कंपनीचे १०० शेअर्स प्रत्येकी १०० रुपयांना खरेदी केले. त्यानंतर १ ऑगस्ट २०१५ रोजी त्याच कंपनीचे १०० शेअर्स प्रत्येकी १२० रुपयांना विकले आणि त्याच दिवशी परत त्याच कंपनीचे १०० शेअर्स प्रत्येकी ११० रुपयांना खरेदी केले. मला १ ऑगस्टचा व्यवहार इंट्रा-डे म्हणून दाखवता येईल का? यावर मला कर किती भरावा लागेल?

संदीप खेडेकर, मेलद्वारे

उत्तर : प्राप्तिकर कायदा ‘कलम ४५ (२ए)’प्रमाणे, जर शेअर्स डीमॅट स्वरूपात असतील तर, प्रथम खरेदी प्रथम विक्री (ाकफरळ कठोकफरळ डवळ) या नियमानुसार भांडवली नफा काढावा लागतो. त्यामुळे आपल्याला १ जानेवारी २०१५ रोजी खरेदी केलेले शेअर्स प्रथम १ ऑगस्ट २०१५ रोजी विकले असे दाखवावे लागेल आणि त्या नुसार भांडवली नफा काढावा लागेल. यानुसार आपल्याला २० रुपये (विक्री किंमत १२० रुपये आणि खरेदी किंमत १०० रुपये) प्रत्येकी असे १०० शेअर्सचे २,००० रुपये अल्प मुदतीचा भांडवली नफा असेल (वर्ष पूर्ण होण्याच्या आत विकले गेल्याने) आणि त्यावर १५.४५ टक्के (शैक्षणिक करासह) दराने कर भरावा लागेल.

 

  • प्रश्न: मागील लेखात आपण असे सांगितले होते की पतीने पत्नीला शेअर्स भेट म्हणून दिले आणि ते शेअर्स पत्नीने विकले तर त्यावर होणारा भांडवली नफा हा पतीच्या उत्पन्नात गणला जातो. माझा प्रश्न असा आहे की जर पतीने भेट दिलेल्या शेअर्सच्या विक्रीवर अल्प आणि दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा झाला तर असा तोटा पतीच्या इतर उत्पन्नातून वजा करता येईल का?

अर्जुन पाटील, मेलद्वारे

उत्तर : प्राप्तिकर ‘कलम ६४’ प्रमाणे जसा भांडवली नफा हा पतीच्या उत्पन्नात गणला जातो तसाच अल्प मुदतीचा भांडवली तोटासुद्धा पतीला त्याच्या भांडवली नफ्यातून वजा करता येईल आणि तो पूर्णपणे वजा होत नसेल तर तो पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्डसुद्धा करता येईल. दीर्घ मुदतीसाठी धारण केलेल्या शेअर्सच्या विक्रीवर (ज्यावर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरला आहे) झालेला भांडवली नफा करमुक्त असल्यामुळे अशा शेअर्सच्या विक्रीवर झालेल्या तोटय़ाची वजावटसुद्धा इतर भांडवली नफ्यातून मिळत नाही.

 

  • प्रश्न: माझ्या मित्राला पैशांची गरज असल्यामुळे त्याच्याकडून मी एक दुकान १२ लाख रुपयांना खरेदी केले. परंतु मुद्रांक शुल्कासाठी या दुकानाचे मूल्य १४ लाख रुपये इतके आहे. मला या व्यवहारावर कर भरावा लागेल का?

संकेत जोशी, मेलद्वारे

उत्तर : हे दुकान आपण अपुऱ्या मोबदल्याने खरेदी केले आहे. मुद्रांक शुल्कासाठी असणारे दुकानाचे मूल्य हे खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यामुळे. या फरकाची रक्कम ही आपल्या इतर उत्पन्नात गणली जाईल. म्हणजेच २ लाख रुपये (१४ लाख वजा १२ लाख रुपये) इतकी रक्कम हे आपले उत्पन्न असेल आणि त्यावर आपल्याला कर भरावा लागेल.

 

  • प्रश्न: मी एक घर मे २०१४ मध्ये पुणे येथे ३५ लाख रुपयांना विकत घेतले होते, २०१६ मध्ये माझी बदली नाशिक येथे झाली. जून २०१६ मध्ये हे पुण्याचे घर मी ३८ लाख रुपयांना विकून नाशिक येथे ४२ लाख रुपयांचे नवीन घर विकत घेतले. मला या व्यवहारावर कर भरावा लागेल का?

       – प्रकाश कुलकर्णी

उत्तर : आपण मे २०१४ मध्ये खरेदी केलेले घर जून २०१६ मध्ये म्हणजेच खरेदी तारखेपासून तीन वर्षांच्या आत विकले म्हणून यावर होणारा भांडवली नफा हा अल्प मुदतीचा आहे. ‘कलम ५४’ नुसार एक घर विकून दुसरे घर ठरावीक मुदतीत खरेदी केले किंवा ‘कलम ५४ ईसी’ नुसार बाँडमध्ये (५० लाख रुपयांपर्यंत) पैसे गुंतविले तर कर सवलत मिळते.

या कलमाअंतर्गत सवलती फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठीच आहेत. आपण घर अल्प मुदतीत विकले असल्यामुळे या सवलतींचा लाभ घेता येणार नाही. आपल्याला झालेल्या अल्प मुदतीच्या नफ्यावर आपण कर दराच्या टप्प्यात म्हणजे स्लॅबप्रमाणे कर भरावा लागेल.

  • लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना pravin3966@rediffmail.com या मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.