सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकलेल्या चक्रीवादळासारखा बाजाराचा गेला आठवडा वादळी ठरला. सप्ताहातील पहिल्या दोन दिवसांत जागतिक बाजारांच्या पाठबळावर भारतीय बाजार जवळजवळ तीन टक्कय़ांनी वर गेला. सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे ५० हजार १५ हजारांच्या वर स्थिर होण्यासारखी परिस्थिती दिसू लागली; परंतु नंतरच्या दोन दिवसांत नफावसुलीचे धोरण व बिटकॉइनच्या मूल्यात झालेल्या मोठय़ा घसरणीमुळे जगातील सर्वच बाजार नरमाईकडे झुकले. मात्र शुक्रवारी स्टेट बँकेने जाहीर केलेल्या निकालांनी बँकिंग क्षेत्राला मोठे पाठबळ मिळाले व सेन्सेक्स व निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी पुन्हा एकदा पन्नास व पंधरा हजारांपुढे निर्णायकी मजल मारली.

लार्सन अँड टुब्रोच्या तिमाही नफ्यात ३ टक्के, तर वार्षिक नफ्यात २१ टक्के वाढ झाली. मार्च महिन्यातील नव्या कंत्राटांमध्ये १२ टक्के घट झाली असली तरी कंपनीच्या हातातील मागण्यांची किंमत तब्बल ३ लाख २७ हजार कोटी आहे जी गेल्या वर्षीपेक्षा आठ टक्क्यांनी जास्त आहे. करोनामुळे लागणाऱ्या टाळेबंदीचा परिणाम बांधकाम व पायाभूत प्रकल्प उभारणीवर फार मोठा झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर लार्सन अँड टुब्रोची कामगिरी नावाजण्यासारखी आहे. कंपनीने या काळात खेळत्या भांडवलाचे व कर्जाचे प्रमाण कमी करून पुढील काळात हातातील मागण्या पूर्ण करण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती निवळत जाईल तशी या कंपनीकडून मोठय़ा कामगिरीची अपेक्षा वित्तीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

आरती इंडस्ट्रीजने शेवटच्या तिमाहीत नफ्यात २३ टक्के वाढ साधली आहे. वार्षिक तुलनेत नफा थोडासा कमी झाला असला तरी रसायन व औषधनिर्मिती क्षेत्रातील ही दमदार कंपनी पुढील वाटचालीसाठी सज्ज झाली आहे. कंपनीने १:१ बोनस जाहीर केला आहे. कंपनीने ३,००० कोटींची विस्तार योजना आखली आहे. चीनवरील अवलंबन कमी करण्याच्या जागतिक मानसिकतेमुळे व भारतात आयात होणाऱ्या मालाला पर्याय म्हणून या कंपनीकडे अपेक्षेने पाहिले जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर स्थिरावलेल्या बाजारभावात केलेली खरेदी बोनससाठी पात्र ठरेल आणि दीर्घ मुदतीतील नफ्यासाठीदेखील फायद्याची ठरेल.

टाटा मोटर्सने मार्चअखेरच्या तिमाहीत अनपेक्षित असा तोटा जाहीर केला. तो मुख्यत्वे युरोपमधील जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) कंपनीतील अपवादात्मक तोटय़ामुळे होता. टाटा मोटर्सची मालकी असलेल्या जेएलआरच्या व्यावसायिक पुनर्रचनेसाठी कंपनीला एकरकमी आर्थिक भार सोसावा लागला. भारतातील व्यवसायाला गेल्या वर्षांतील चार हजार आठशे कोटींच्या तोटय़ाच्या तुलनेत १,६४६ कोटींचा नफा झाला आहे. कंपनीच्या व्यापारी वाहनांच्या विक्रीत प्रत्येक तिमाहीत वाढ झाली आहे. सेमी कंडक्टर चिपच्या तुटवडय़ामुळे उत्पादनांवर निर्बंध आले आहेत. जगातील अर्थव्यवस्था करोनातून बाहेर यायला सुरुवात होत आहे. त्यामुळे युरोपमधील प्रवासी वाहनांना मागणी आहे. गेली काही वर्षे नफ्यात येण्यासाठी झुंजत असणाऱ्या कंपनीला येत्या वर्षभरात यश मिळण्याची चिन्हे आहेत.

सेन्सेक्स व निफ्टी हे बाजाराचे प्रमुख निर्देशांक जरी मर्यादित पातळीत घुटमळत असले तरी मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक त्यांच्या उच्चतम पातळीकडे झेपावत आहेत. बाजारात आतापर्यंत जाहीर झालेल्या जवळपास सर्वच मध्यम व लहान कंपन्यांचे निकाल उत्तम आहेत. त्यामुळे त्यांच्या समभागांना मागणी आहे. करोनाच्या रुग्णवाढीचा वेग जसा मंदावला तशी करोनाने सर्वात जास्त हानी झालेल्या उद्योगांकडे गुंतवणूकदारांनी लक्ष वळवले आहे. त्यामुळे लॉजिस्टिक्स, मनोरंजन, विमान वाहतूक अशा सेवा क्षेत्रातील समभागांनाही मागणी आलेली दिसत आहे. प्रमुख निर्देशांकांना गेले काही महिने ‘बँक निफ्टी’ची साथ मिळत नव्हती. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा शेवट दिसू लागताच तिसऱ्या लाटेलाही बाजाराने गृहीत धरले आहे. उद्योग क्षेत्र प्रगतिपथावर येईल तशी बँकांच्या कर्जवाटपाला मागणी येऊन बँकांचे समभाग बाजाराला उभारी देतील.