सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

गेल्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच भारतीय बाजाराने तीन लाख कोटी डॉलरच्या बाजार मूल्याचा नवा विक्रम नोंदवला आणि या सप्ताहाची आक्रमक सुरुवात केली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या व सरकारी बँकांच्या समभागातील तेजीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – निफ्टीने दौड सुरू ठेवली व शेवटच्या दिवशी रिलायन्समधील सहा टक्के उसळीने या निर्देशांकाला १५,४३५ च्या विक्रमी टप्प्यावर पोहोचविले.

बजाज इलेक्ट्रिकलने गेल्या मार्चच्या तिमाहीतील तोटय़ाच्या तुलनेत या मार्च अखेरच्या तिमाहीत ५४ कोटी रुपये नफा मिळवला आहे. या काळात कंपनीच्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीत ३० टक्के वाढ झाली. कंपनीच्या कंत्राटी विभागाच्या तोटय़ात घट झाली. एप्रिलपासून सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षांत कंपनीच्या या विभागाकडे १,१०० कोटींच्या मागण्या आहेत. गृहखरेदीमध्ये गेल्या तिमाहीत दिसलेली वाढ व टाळेबंदी काळात संचित झालेली मागणी ही टाळेबंदी शिथिल झाल्यावर बाजारात येऊन गृह उपकरणांच्या मागणीत वाढ झालेली दिसेल. याचा फायदा बजाज इलेक्ट्रिकल्स, ओरिएंट इलेक्ट्रिकल्स सारख्या कंपन्यांना मिळेल.

इमामी या आयुर्वेदिक औषधनिर्मिती व ग्राहकोपयोगी उत्पादने बनविणाऱ्या कंपनीचा नफा मार्च अखेरच्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या २२.७५ कोटींवरून ८७.७३ कोटी झाला आहे. कंपनीच्या झंडू, नवरत्न तेल, केश किंग, बोरो प्लस अशा नाममुद्रा प्रसिद्ध आहेत. करोनाकाळातील लोकांच्या आरोग्यनिगेबाबत वाढलेल्या जागरूकतेचा कंपनीला फायदा मिळाला आहे. कंपनी जास्त फायद्याच्या औषधी उत्पादनांवर भर देऊन तसेच नावीन्यपूर्ण उत्पादने सादर करून बाजारपेठ काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून ‘झंडू पोर्टल’मार्गे कंपनी आतापर्यंत ४२ लाख ग्राहकांशी जोडली गेली आहे. मध्यम कालावधीसाठी कंपनीमध्ये गुंतवणुकीला वाव आहे.

हिंडाल्कोचे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले आले. कंपनीच्या वार्षिक नफ्यात ३८ टक्के वाढ झाली. भारतातील अ‍ॅल्युमिनियम व विदेशातील नोव्हालिस या उपकंपनीच्या व्यवसायातील दमदार वाढीचा कंपनीच्या निकालांना मोठा हातभार लागला. नोव्हालिसला बीव्हरेज कॅन्स व वाहन उद्योगांमधे विशेषत: विजेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये होणाऱ्या अ‍ॅल्युमिनियमच्या वाढत्या वापरामुळे मोठय़ा मागणीची अपेक्षा आहे. हिंडाल्कोची उत्कालमधील अ‍ॅल्युमिना या कच्च्या मालाची नवी उत्पादन क्षमता पुढील तीन महिन्यांत कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे जगात वाढणाऱ्या अ‍ॅल्युमिनियमच्या किमती व कच्च्या मालाच्या किमतीमधील बचत हिंडाल्कोला फायद्याची ठरेल. कंपनीमध्ये वर्षभराच्या मुदतीसाठी गुंतवणुकीची संधी घेता येईल.

गेल्या सप्ताहाआधी जाहीर झालेल्या स्टेट बँकेच्या निकालांनी बाजाराला मोठे पाठबळ मिळाले होते. मार्च अखेरच्या वर्षांत बँकेच्या प्रति समभाग उत्पन्नात ४० टक्के वाढ झाली. बँकेने तंत्रस्नेही कारभारावर जोर दिला आहे. थकीत कर्जाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयानंतर बँकांच्या आर्थिक निकालांमध्ये शाश्वती आली आहे. या सप्ताहात स्टेट बँकेच्या समभागात जोरदार खरेदी होऊन त्यांनी ४३३ चा नवीन उच्चांक गाठला होता. गुंतवणूकदारांचा ओघ बँकिंग क्षेत्रातील वाजवी किमतीत मिळणाऱ्या समभागांकडे वळला आहे. स्टेट बँकेतील गुंतवणुकीत यापुढे मोठय़ा फायद्याची अपेक्षा आहे.

तयार दागिन्यांना हॉलमार्क करणे १ जूनपासून बंधनकारक होत आहे. टायटन, कल्याण ज्वेलर्ससारख्या संघटित क्षेत्राच्या कंपन्यांना हा निर्णय अनुकूल असल्यामुळे त्यांच्या भावात वाढ बघायला मिळाली. सोन्याच्या वाढत्या किमती व टाळेबंदीमध्ये सवलत मिळण्याची शक्यता विचारात घेऊन या दोन्ही कंपन्यांचे समभाग घसरणीमध्ये घेऊन ठेवता येतील.

बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या एकत्रित मूल्याच्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेल्या प्रमाणावरून बाजारातील तेजीचे आडाखे बांधता येतात. मागील आठवडय़ात मुंबई शेअर बाजाराच्या मूल्यांकनाने ३ लाख कोटी डॉलरचा टप्पा गाठल्याने हे प्रमाण साधारणपणे १०२ टक्के झाले आहे. या एका निकषावर बाजारात अवास्तव तेजी असल्याचा दावा काही मूलभूत संशोधक करीत आहेत. अनेक प्रगत देशांत हे प्रमाण कितीतरी जास्त आहे. उदाहरणार्थ अमेरिकेत हे प्रमाण २२२ टक्के आहे. परंतु सकल राष्ट्रीय उत्पन्नात बाजारात सूचिबद्ध नसलेल्या उद्योगांचाही समावेश असतो. करोनामुळे आक्रसलेली अर्थव्यवस्था व वधारलेला रुपया ही बाबसुद्धा लक्षात घेणे जरुरीचे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत अनौपचारिक उद्योगांचा मोठा वाटा आहे. त्याची गणना सकल राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. त्यामुळे या एकाच निकषावरून बाजारात अवास्तव तेजी आहे असा निष्कर्ष काढून विक्रीची घाई करण्याचे कारण नाही. या सप्ताहात होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीतील निरीक्षणे महत्त्वाची ठरतील.