15 August 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : निर्देशांकांची ‘किंतु-परंतु’ वाटचाल

जानेवारी ते मार्चमध्ये निफ्टीवर ४,९१९ अंशांची (१२,४३० - ७,५११) घसरण निफ्टीमध्ये झाली.

आशीष ठाकूर

सरलेल्या सप्ताहात बाजारात तेजी-मंदीची संगीत खुर्ची सुरू होती. तेजी म्हणावी तर निर्देशांक सेन्सेक्सवर ३७,००० आणि निफ्टीवर १०,९०० पार होत नाही, मंदी म्हणावी तर सेन्सेक्सवर ३६,००० आणि निफ्टीवर १०,७०० पण तुटत नाही. अशा किंतु-परंतुमध्ये निर्देशांकाची वाटचाल होती. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स : ३६,५९४.३३ / निफ्टी : १०,७६८.०५   

या वर्षांच्या पूर्वार्धातील मंदीची दाहकता ज्यांनी अनुभवली, त्यांच्या २००८ च्या मंदीच्या स्मृती जागवल्या गेल्या. आजच्या लेखात २००८ आणि २०२० च्या मंदीची तुलना, तसेच या दोहोंमधील साम्यस्थळांचा आढावा घेत आपण या मंदीचा कालावधी, खालच्या लक्ष्याचा अंदाज/ आढावा आज आपण घेणार आहोत.

प्रथम या दोन मंदींमधील साम्यस्थळे :

वर्ष २००८ आणि २०२० या दोन्ही तेजींचा उच्चांक हा जानेवारी महिन्यात नोंदवला गेला. २००८ सालात १० जानेवारीला सेन्सेक्सवर २१,२०६ आणि निफ्टीवर ६,३५७ चा उच्चांक नोंदविला गेला होता. त्यानंतर मंदी सुरू झाली. तर चालू वर्षांत २० जानेवारीला निर्देशांकांनी म्हणजे सेन्सेक्सवर ४२,२७३ आणि निफ्टीवर १२,४३० चा सार्वकालिक उच्चांक नोंदविला गेल्यानंतर मंदी सुरू झाली.

दोन्ही मंदींमध्ये पहिल्या दणक्याची दाहकता ही मार्चपर्यंत राहिली. २००८ साली सेन्सेक्स २१,२०६ वरून १४,६७७ आणि निफ्टी निर्देशांक ६,३५७ वरून ४,४६८ पर्यंत घसरला तर आताच्या घडीला सेन्सेक्स २० जानेवारीच्या ४२,२७३ च्या उच्चांकावरून २४ मार्चला २५,६३८ आणि निफ्टी १२,४३० वरून ७,५११ च्या नीचांकापर्यंत आले. तेथे मंदी सरली व सुधारणा सुरू झाली, जी आजतागायत चालू आहे.

वर्ष २००८ च्या मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक/ सुधारणेला २०० दिवसांच्या चलत सरासरी (मूव्हिंग अ‍ॅव्हरेज)चा अडथळा ठरला होता. २००८ साली २०० दिवसांची चलत सरासरी ही सेन्सेक्सवर १७,३०० आणि निफ्टीवर ५,१५० होती. त्या वेळेला निर्देशांकाला ही चलत सरासरी ओलांडण्यास अपयश आले आणि घातक उतार आला होता. सद्य:स्थितीत निर्देशांकावर २०० दिवसांची चलत सरासरी ही सेन्सेक्सवर ३६,९६३ आणि निफ्टीवर १०,८८५ येत आहे. या चलत सरासरीवर निर्देशांक किमान दहा दिवस टिकणे नितांत गरजेचे आहे.

सरलेल्या सप्ताहात तरी दिसून आले की, सेन्सेक्सला ३६,९६३ आणि निफ्टीला १०,८८५ च्या पल्याड झेपावण्यास ही २०० दिवसांची चलत सरासरी सतत अडथळा ठरत होती.

सद्य:स्थितीत निर्देशांकाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा सेन्सेक्सवर १,१२२ अंशांचा आणि निफ्टी निर्देशांकावर ३५० अंशांचा तयार होत आहे. आता २०० दिवसांची चलत सरासरी ही आधार रेषा मानत निर्देशांकाचे वरचे अथवा खालचे लक्ष्य कसे काढायचे ते पाहू या.

सेन्सेक्सची २०० दिवसांची चलत सरासरी ही ३६,९६३ आहे. तेजीच्या दृष्टिकोनातून यात १,१२२ अंशांचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) मिळविला असता ३८,०८५ आणि निफ्टीवर १०,८८५ मध्ये ३५० अंश मिळविले असता ११,२३५ चे वरचे लक्ष्य दृष्टिपथात येईल.

मंदीचा विचार करता निर्देशांक सातत्याने सेन्सेक्सवर ३६,९६३  आणि निफ्टीवर १०,८८५ पार करण्यास अपयशी ठरल्यास निर्देशांकांचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३६,९६३ उणे १,१२२ अंश म्हणजे ३५,८४१ आणि त्याचप्रमाणे निफ्टीवर १०,८८५ उणे ३५० अंश १०,५३५ असे असेल.

येणाऱ्या दिवसांत सेन्सेक्सवर ३५,८४१ आणि निफ्टीवर १०,५५० या पातळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आलेखावर हा स्तर अगोदरचा उच्चांक तर आहेच, पण सर्वात महत्त्वाचे ‘फेबुनाची फॅक्टर’चा ६१.८ टक्के आहे. हा स्तर कसा काढला ते निफ्टीवरील उदाहरणावरून समजून घेऊ.

जानेवारी ते मार्चमध्ये निफ्टीवर ४,९१९ अंशांची (१२,४३० – ७,५११) घसरण निफ्टीमध्ये झाली. ‘फेबुनाची फॅक्टर’ हे गृहीतक तीनशे वर्षांहून अधिक जुने आहे. तेव्हा गणिती पद्धत ही अपूर्णाकांत होती. आता आपण पूर्णाक पद्धतीचा वापर करतो तेव्हाचे .६१८ टक्के हे आता ६१.८० टक्के होतात. ४,९१९ चे ६१.८० टक्के हे ३,०४० येतात. आता निफ्टीचा २४ मार्चचा नीचांक हा ७,५११ आहे. यात ३,०४० अंश मिळवले असता १०,५५१ हे उत्तर येते, ज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही तेजी कायम राहण्यासाठी १०,५५१ या स्तरांवर निफ्टी टिकणे नितांत गरजेचे आहे.

आताच्या घडीला सेन्सेक्स ३५,९१२ आणि १०,५५१ चा स्तर राखायलाच हवा. पुढे सेन्सेक्स ३६,९६३ आणि निफ्टी १०,८८५ चा स्तर ओलांडण्यात यशस्वी ठरल्यास या निर्देशांकांचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,०८५ (३६,९६३ +११२२) आणि निफ्टीवर ११,२३५ (१०,८८५ + ३५०) असे असेल.

(२००८ सालच्या आलेखावरची माहिती ही ५ मे २००८ साली ‘लोकसत्ता- अर्थवृत्तान्त’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘घातक उतारामुळे गुंतवणूकदार त्रस्त होणार का?’ या शीर्षकाच्या प्रस्तुत लेखकाच्याच, लेखातून संग्रहित केलेली आहे.)

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 12:10 am

Web Title: weekly stock market report weekly stock market analysis zws 70
Next Stories
1 अर्थ वल्लभ : अन् हत्ती पळू लागला
2 कर बोध : गुंतवणूक आणि कर आकारणी
3 क.. कमॉडिटीचा : कापूससाठे ‘पेटणार’!
Just Now!
X