News Flash

रपेट बाजाराची : अस्थिर, पण अभेद्य!

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com मार्चच्या पहिल्या सप्ताहात सुरू झालेला तेजीचा रोख गेल्या सप्ताहातही कायम राहिला. जागतिक बाजारांच्या मोठय़ा हालचालींचे पडसाद आपल्या बाजारातही उमटत होते. चारच दिवस

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

मार्चच्या पहिल्या सप्ताहात सुरू झालेला तेजीचा रोख गेल्या सप्ताहातही कायम राहिला. जागतिक बाजारांच्या मोठय़ा हालचालींचे पडसाद आपल्या बाजारातही उमटत होते. चारच दिवस व्यवहार झालेल्या बाजारात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे समभाग आघाडीवर राहिले. मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांचे निर्देशांक सतत सहाव्या आठवडय़ात वर गेले आणि चार आठवडय़ांनंतर निफ्टीने परत एकदा पंधरा हजारांचा टप्पा गाठला.

अर्थव्यवस्थेतील उभारीबरोबर मालवाहतुकीच्या वाहनांसाठी मागणी वाढू लागेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही मागणी २५ ते ३० टक्क्य़ांनी वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचा अप्रत्यक्ष फायदा जमना ऑटो या जड वाहनांसाठी सुटे भाग विशेषत: स्प्रिंग बनविणाऱ्या कंपनीला होईल. कंपनीकडे स्प्रिंगच्या बाजारपेठेचा ६८ टक्के वाटा आहे. आधी एका कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या या कंपनीने तीन नव्या कारखान्यांतून उत्पादन सुरू केले आहे जे वाहन कंपन्यांच्या नजीकच्या क्षेत्रात आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च कमी राहील. जुन्या वाहनांच्या विल्हेवाटीचे धोरण अमलात येईल तेव्हादेखील नवीन वाहनांची मागणी वाढेल. सध्याच्या बाजारभावात केलेल्या गुंतवणुकीमध्ये नफा कमवायची उत्तम संधी आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीमध्ये सध्याच्या भावात खरेदीची संधी आहे. कंपनीने डिसेंबरअखेरच्या उत्पन्नात २० टक्के वाढ जाहीर केली होती. कंपनीच्या घरगुती स्वच्छता, साबण, सौंदर्य प्रसाधने व तयार खाद्य व्यवसायात सातत्याने वाढ होत आहे. करोनाचा प्रभाव कमी होईल तशी कंपनीच्या उत्पादनांची मागणी वाढेल. कंपनीने आपल्या उत्पादनात काळानुरूप नैसर्गिक घटक वापरण्यावर भर दिला आहे. कंपनीचे समभाग अस्थिर बाजारातही टिकाव धरू शकणारे आहेत.

अ‍ॅस्ट्रल पॉलिटेक्निक्सने १:३ प्रमाणात बोनस समभागांच्या पात्रतेसाठी (रेकॉर्ड डेट) १९ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. पाण्याचे पीव्हीसी पाइप बनविणाऱ्या भारतातील क्रमांक दोनवर असणारी ही कंपनी. आता तिने अडेसिव्ह क्षेत्रात पदार्पण केले आहे व आता पाण्याच्या टाक्या बनविण्याचा कारखानादेखील उभारत आहे. पीव्हीसी या मुख्य कच्च्या मालाच्या वाढत्या किमती या क्षेत्रातील कंपन्या, बांधकाम क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे ग्राहकांकडून वसूल करण्यात यशस्वी ठरत आहेत. मल्टिबॅगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीत या सप्ताहात केलेली खरेदी तात्काळ बोनससाठी पात्र ठरेल व दीर्घ मुदतीच्या भांडवलवृद्धीसाठी समभाग राखून ठेवता येतील.

सध्या बाजारात असलेल्या तेजीच्या माहोलात प्रारंभिक समभाग विक्रीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. एमटार टेक्नॉलॉजीला दोनशेपट, तर ईझ माय ट्रिपला एकशेसाठपट प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांनी प्रत्येक प्रारंभिक समभाग विक्रीमध्ये सहभागी होऊन अल्प मुदतीचा फायदा करून घ्यावा. या सप्ताहात कल्याण ज्वेलर्सच्या समभागांची विक्री सुरू होत आहे. केरळमध्ये पंचेचाळीस वर्षांपूर्वी सुरुवात करून नावारूपाला आलेल्या या सराफा पेढीची आता भारतात १०७, तर आखाती देशात ३० विक्री दालने आहेत. भारतातील ‘बिग बुल’चा सहभाग असणाऱ्या नजारा टेक्नॉलॉजी या कंपनीची बहुप्रतीक्षित समभाग विक्रीदेखील या सप्ताहात सुरू होत आहे. ऑनलाइन गेमिंगमध्ये कार्यरत असणाऱ्या या कंपनीच्या समभागांनी अमेरिकेतील ‘नॅसडॅक’वरील नोंदणीनंतर दमदार वाटचाल केली होती.

बाजाराची सध्याची वाटचाल काहीशी अस्थिर, पण आशावादी आहे. भारतात करोनाची वाढणारी आकडेवारी स्थानिक पातळीवर पुन्हा टाळेबंदी होण्याची शक्यता दर्शविते, तर लसीकरणाचा वाढता वेग काहीसे आशादायी चित्र उभे करतो. करोनाकाळात दहा हजारांहून जास्त लघुउद्योग बंद पडले आहेत, तर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे वाढते उत्पन्न सर्व काही आलबेल असल्याचे चित्र उभे करत आहेत. इंधनाचे वाढते दर महागाईची शक्यता वर्तवत आहेत; पण त्याचा दुसरा अर्थ व्यापार-उदिमात वाढ होत आहे. रोख्यांवरील व्याज दरात होणारी वाढ शेअर बाजाराला चिंताजनक आहे; पण त्याने अजून धोकादायक पातळी गाठलेली नाही. अमेरिकेतील मोठय़ा अर्थप्रोत्साहनाच्या काही दिवसांतच होणाऱ्या वाटपामुळे भांडवली बाजाराकडे येणाऱ्या पैशांच्या ओघात वाढ होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी अजूनही अधूनमधून होणाऱ्या घसरणीचा फायदा घेऊन नवीन गुंतवणुकीची संधी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 12:04 am

Web Title: weekly stock market report weekly stock market review zws 70 2
Next Stories
1 विमा.. सहज, सुलभ : एलआयसी खासगीकरण काही अनाठायी शंका
2 फंडाचा ‘फंडा’..: निवृत्त जीवनासाठी नियोजन
3 करावे कर-समाधान :  ‘फॉर्म २६ एएस’ ही काय भानगड?
Just Now!
X