05 March 2021

News Flash

बाजाराचा तंत्र कल : अखेर तेजी क्षणीकच ठरली!

निर्देशांकांनी सेन्सेक्सवर २८,८७५ आणि निफ्टीवर ८,३००चा स्तरच तोडल्यामुळे अखेर तेजी क्षणिकच ठरली.

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर ashishthakur1966@gmail.com

रिझव्‍‌र्ह बँकेच्या विविध आर्थिक सवलतींच्या सुखद घोषणेवर सेन्सेक्सने ३१,१२६ आणि निफ्टीने ९,०३८ चा दिवसांतर्गत उच्चांक मारला. अपेक्षा होती, नजीकच्या दिवसांत निर्देशांक किमान सेन्सेक्सवर ३१,७०० आणि निफ्टीवर ९,३००च्या स्तराला गवसणी घालेल; पण निर्देशांकांनी सेन्सेक्सवर २८,८७५ आणि निफ्टीवर ८,३००चा स्तरच तोडल्यामुळे अखेर तेजी क्षणिकच ठरली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: २७,५९०.९५

निफ्टी: ८,०८३.८०

निर्देशांकाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा सेन्सेक्सवर २५,६३८ ते ३१,१२६ आणि निफ्टीवर ७,५११ ते ९,०३८ असेल. येणाऱ्या दिवसांत निर्देशांकांनी सेन्सेक्सवर २६,६७० आणि निफ्टीवर ७,८०० चा स्तर राखल्यास पुन्हा एक सुधारणा अपेक्षित आहे. जिचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३१,७०० आणि निफ्टीवर ९,३०० असेल.

आता सामान्य गुंतवणूकदारांना समभाग खरेदी, समभाग संच बांधणीच्या (पोर्टफोलिओच्या) प्रक्रियेत सामावून घेताना, ही प्रक्रिया साध्या, सोप्या, नित्य उपयोगी व्यवहारातील उदाहरणावरून, अगम्य,  किचकट संज्ञाचा आधार न घेता गुंतवणूकदारांच्या व्यवहारज्ञानाला, तर्कसंगत विचारसरणीवर भर देत, ज्ञानाच्या प्रकाशात गुंतवणूकदारांच्या विचारांना चालना देण्याचा प्रयत्न असेल, जसे की.. आताच्या बिकट आर्थिक परिस्थितीत प्रत्येक जण आपला आर्थिक स्तर राखण्याचा प्रयत्न करणार, ना की तो उंचावण्याचा. सर्वत्र तडजोड, स्वस्त पर्यायांचा विचार, आर्थिक काटकसर होणारच, तेव्हा.. एकाच बेकरीत तयार होणाऱ्या पावाला आता महत्त्व राहणार, केकला नव्हे! तेव्हा समभाग संच बांधणीसाठी अशा कंपन्या निवडल्या पाहिजेत ज्यांची उत्पादने नित्यउपयोगी असतील, ज्यायोगे त्या उत्पादनांची मागणी सातत्याने असेल, पण जेव्हा अर्थव्यवस्था सुधारेल तेव्हा याच कंपन्या ‘पावाबरोबर केकदेखील पुरवू शकतील.’ फक्त काही पथ्य/अटी पाळावयाच्या आहेत त्या अशा..

ही गुंतवणूक दीर्घमुदतीच्या धारणेअंतर्गत, किमान गुंतवणूक कालावधी हा तीन वर्षांचा असावा. ही गुंतवणूकयोग्य रक्कम डिसेंबर ते जानेवारी २०२१ पर्यंतच्या प्रत्येक घातक उतारात ही रक्कम २० टक्कय़ांच्या पाच तुकडय़ांत गुंतवायची आहे. कारण वर्षअखेपर्यंत सेन्सेक्सवर २२,९४५ आणि निफ्टीवर ६,६१७ च्या स्तरावर गुंतवणूकदारांकडे किमान साठ टक्के रक्कम शिल्लक असण्याची नितांत गरज आहे. तसे होणार असेल तरच खालील समभागांचा विचार करावा. येणाऱ्या आठ महिन्यांत हेच समभाग आपल्याला आताच्या किमतीपेक्षाही स्वस्त मिळू शकतात, जमल्यास पुढील मंदीच्या लाटेत हे समभाग इथून आणखी किती खाली कोसळू शकतील तेदेखील पुढील लेखांच्या शंृखलांमधून नमूद केले जाईल. या सर्वामागचा उद्देश एकच, गुंतवणूकदारांनी समभाग संचबांधणीची प्रक्रिया जाणून घ्या, त्यावर स्वत: संशोधन करा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या व नंतरच निर्णय घ्या.

समभाग संचबांधणीतील (पोर्टफोलिओतील) समभागांची यादी :

१) अ‍ॅव्हेन्यू सुपर मार्केट लिमिटेड/ डी-मार्ट (रु. २,०६७) २) आयआरसीटीसी लिमिटेड (रु. १,०८३) ३) आयटीसी लिमिटेड (रु. १७८) ४) नवीन फ्लोरीन इंटरनॅशनल लिमिटेड (रु. १,२६७) ५) बलरामपुर चीनी मिल्स लिमिटेड (रु. ११४) ६) अजंठा फार्मा लिमिटेड (रु. १,३१२) ७) आयओएल केमिकल्स लिमिटेड (रु.  १९३) ८) अ‍ॅक्झो नोबेल इंडिया लिमिटेड (रु. २,०६६) ९) वेदान्त लिमिटेड (रु. ६३) १०) सिप्ला लिमिटेड (रु. ४४९) ११) टाटा केमिकल्स लिमिटेड (रु. २१८) १२) एफडीसी लिमिटेड (रु. २००) १३) इंडिया सिमेंट लिमिटेड (रु. १०१) १४) सीडीएसएल लिमिटेड (रु. २१०) १५) निप्पॉन इंडिया ईटीएफ निफ्टी बीज (रु. ८६) वरील सर्व समभागांच्या किमती या शुक्रवार ३ एप्रिलच्या बंद भावावर आधारित.

पुढील लेखात आताच्या घडीला गुंतवणूक टाळावयाच्या क्षेत्रांचा (सेक्टर) विचार करू.

महत्त्वाची सूचना: वरील सुचविलेल्या सर्व समभागांत आताच्या घडीला लेखकाची वैयक्तिक अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही.       (क्रमश:)

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 1:06 am

Web Title: weekly stock market report zws 70
Next Stories
1 कर बोध : नवीन आर्थिक वर्षांरंभ… करदात्यांसाठी काही बदलांचे अनुपालन गरजेचे
2 क.. कमॉडिटीचा : करोना कहरात धोरण लवचीकतेची गरज
3 बंदा रुपया : मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील
Just Now!
X