19 October 2019

News Flash

गुणात्मक भरारीचा पश्चिमी तट

वेस्ट कोस्ट पेपर मिल्स लि. (बीएसई कोड - ५००४४४)

|| अजय वाळिंबे

वेस्ट कोस्ट पेपर मिल्स लि. (बीएसई कोड – ५००४४४)

वेस्ट कोस्ट पेपर मिल्स ही भारतातील प्रस्थापित बांगूर समूहाची कंपनी. गेली ६१ वर्षे ही कंपनी कार्यरत असून ती पेपर उद्योगातील एक अग्रणी कंपनी मानली जाते. कंपनीच्या उत्पादनात ५२ ते ६०० जीएसएम या श्रेणीत विविध प्रकारच्या पेपर्सचे उत्पादन केले जाते. यामध्ये स्टेशनरी, औद्योगिक तसेच पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या पेपरचे आणि पेपर बोर्डचेदेखील उत्पादन केले जाते. कर्नाटकातील दंडेली येथे २४० एकर क्षेत्रावर कंपनीचा अत्याधुनिक प्रकल्प असून आवश्यक पायाभूत सुविधा प्रकल्पाजवळ आहेत. उत्पादनासाठी लागणारे पाणी तसेच कच्चा माल कर्नाटक, आंध्र, पाँडिचेरी तसेच तमिळनाडू या लगतच्या राज्यातून येतो. वार्षिक ३२०,००० टनाच्या अखंडित उत्पादनासाठी कंपनी स्वत:साठी ऊर्जा उत्पादनदेखील करते. पेपर उत्पादनखेरीज कंपनीचा ऑप्टिकल फायबर उत्पादन प्रकल्प म्हैसूर येथे आहे. आपल्या उत्पादनांच्या वितरणासाठी कंपनीचे देशभरातील राज्यांतून ८८ वितरक असून गेली सात वर्षे निर्यातीचा पुरस्कार मिळवणारी, वेस्ट कोस्ट पेपर्स जगभरातील सुमारे ३५ देशांत आपली उत्पादने निर्यात करते. गुणवत्ता, पर्यावरणाचे वाढते महत्त्व, प्लास्टिक बंदी तसेच देशांतर्गत असलेली वाढती मागणी यामुळे कंपनी वोइथसारख्या अत्याधुनिक मशीनचा वापर करून उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता वाढवत आहे. अपेक्षेप्रमाणे सप्टेंबर २०१८ साठी कंपनीचे जाहीर झालेले आर्थिक निष्कर्ष उत्कृष्ट असून या कालावधीत कंपनीने ५०४.८२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८८.४९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत तो ८५ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीने कर्जाचा बोजा हलका करून सध्याचे कर्ज-भांडवल गुणोत्तर केवळ ०.३० टक्क्यांवर आणले आहे. येत्या दोन वर्षांत कंपनी संपूर्ण कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे. उत्पादनांना वाढती मागणी, अनुभवी प्रवर्तक, उत्तम गुणवत्ता आणि अपेक्षित आर्थिक कामगिरी यामुळे वेस्ट कोस्ट पेपर मिल्स सध्याच्या भावात आकर्षक खरेदी ठरू शकते. मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी ही गुंतवणूक करावी.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

First Published on December 24, 2018 12:33 am

Web Title: west coast paper mills bse code 500444