13 August 2020

News Flash

इन्फोसिसनंतर.. बाजारतेजीचे काय?

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात दुसऱ्या स्थानी असलेल्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीजचे निकाल पाहून तेजी अथवा मंदीचे शेअर बाजार वळण घ्यावा असेही दिवस होते. त्या दिवसांचे गुंतवणूकदारांना पुन्हा स्मरण

| October 14, 2013 07:27 am

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात दुसऱ्या स्थानी असलेल्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीजचे निकाल पाहून तेजी अथवा मंदीचे शेअर बाजार वळण घ्यावा असेही दिवस होते.  त्या दिवसांचे गुंतवणूकदारांना पुन्हा स्मरण व्हावे, असा गेल्या आठवडय़ात बाजाराने फेर धरलेला आपण पाहिले. इन्फोसिसच्या दुसऱ्या तिमाही (जुलै ते सप्टेंबर २०१३) निकालापूर्वीची उत्कंठा आणि प्रत्यक्षात अपेक्षेला खरा उतरलेला निकाल यातून सलग चार दिवसांच्या तेजीने सेन्सेक्सने ६१३ अंश (सुमारे ३ टक्के) कमावले आणि २०,५२८ पातळीवर सूर मारला. निफ्टीची उसळी त्यापेक्षा सरस ३.२ टक्क्य़ांची आणि हा निर्देशांक ६१००च्या जवळ ६०९६ वर सप्ताहअखेरीस स्थिरावला. इन्फोसिसचे निकाल तर अपेक्षेप्रमाणे आलेच, पण आता प्रश्न त्यानंतर येणाऱ्या निकालांचा.. दिवाळीपूर्वीच्या बाजार तेजीला ते पुरेसे इंधन देऊ शकतील काय?

निकाल हंगामातील निर्णायक आठवडा
अमेरिकी अर्थव्यवस्थेत दिसून येणारी उभारी आणि डॉलरच्या तुलनेत कमजोर झालेला रुपया हे घटक भारतातील एकूण सॉफ्टवेअर सेवा निर्यातदारांच्या पथ्यावर पडलेले आहेत. सद्य अस्थिर बाजार स्थितीतही आयटी कंपन्यांच्या समभागांची कामगिरी लक्षणीय उजळ आणि उठावदार दिसण्यात याचे प्रत्यंतर उमटलेले दिसते. इन्फोसिसबाबत विश्लेषकांनी अगदी माफक अपेक्षा बाळगल्या होत्या आणि जेमतेम तितक्याच कंपनीने यंदाच्या तिमाही कामगिरीत पूर्ण केलेल्या दिसल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे उर्वरित वर्षांतील महसुली वाढीबाबतचे संकेत इन्फोसिसच्या व्यवस्थापनाने ६ ते १० टक्क्य़ांऐवजी ९ ते १० टक्के असे सुधारले आहेत. पण येथेही महसूल वार्षिक तत्त्वावर १० टक्क्य़ांपेक्षा जास्त वाढू शकेल, हा आशावादही व्यवस्थापनाने अद्याप कमावलेला नाही हेच दर्शविते. त्यातुलनेत क्रमवारीत इन्फोसिसच्याच वर-खाली असणाऱ्या टीसीएस, एचसीएल टेकसारख्या अन्य सॉफ्टवेअर सेवा निर्यातदार कंपन्यांची कामगिरी इन्फोसिसपेक्षा निश्चितच सरस असेल असे या कंपन्यांच्या गेल्या काही तिमाहींमधील स्थिर कामगिरीवर नजर टाकली असता म्हणता येईल. चालू आठवडय़ातच टीसीएस (१५ ऑक्टोबर), एचसीएल टेक (१७ ऑक्टोबर), माइंड ट्री (१६ ऑक्टोबर), सीएमसी (१४ ऑक्टोबर) असा या कंपन्यांच्या तिमाही निकाल येत आहेत. या कंपन्यांकडून अपेक्षाभंग होणार नाही म्हटले तरी आयटी व्यतिरिक्त व्यापक उद्योगक्षेत्राबाबत फारशी उत्साहवर्धक स्थिती नाही. म्हणून आगामी रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, लार्सन अॅण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सीमेंट अशा निर्देशांकात व बाजार भांडवलाच्या दृष्टीनेही वजनदार कंपन्यांचे तिमाही निकाल याच आठवडय़ात येतील. बरोबरीनेच तिमाहीगणिक कामगिरीत सुधारणेच्या अपेक्षा असलेल्या अग्रेसर खासगी बँका जसे- इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक यांचेही निकाल येतील. एकूण हा आठवडा यंदाच्या निकाल हंगामाच्या दृष्टीने बाजारासाठी निर्णायकच ठरावा..

या तारखा लक्षात ठेवा
* १४ ऑक्टोबर: शुक्रवारी सायंकाळी बाजारातील व्यवहार उरकल्यावर ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादन निर्देशांकांत अवघ्या ०.६ टक्क्य़ांची वाढ दर्शविणारे आकडे जाहीर झाले. आज सोमवारी बाजारातील व्यवहार संपल्यावरच महागाई निर्देशांकांचे आकडे येतील. औद्योगिक उत्पादनवाढीतील निराशेपेक्षा हा आकडा बाजारभावनेच्या दृष्टीने अधिक कळीचा असेल. सप्टेंबरमधील ग्राहक किंमत निर्देशांक ऑगस्टमधील ९.५२टक्क्य़ांपेक्षा निदान अधिक तरी असता कामा नये.
* १७ ऑक्टोबर: अमेरिकेतील सरकारच्या ‘शटडाऊन’मुळे निर्माण झालेल्या आर्थिक पेचप्रसंगावर तोडग्याचे प्रयत्न सुरूच आहेत. पण निदान कर्ज-थकीताच्या नामुष्कीपासून वाचायचे झाल्यास अमेरिकी संसदेने सरकारच्या कर्ज-मर्यादेत वाढीला मंजुरी तातडीने द्यायला हवी. यासंबधाने अंतिम मुदत येत्या १७ ऑक्टोबरला संपुष्टात येत आहे. तसे न झाल्यास अमेरिका गहिऱ्या आर्थिक संकटात सापडू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2013 7:27 am

Web Title: what about market flow after infosys
टॅग Arthvrutant
Next Stories
1 भविष्याबाबत आशादायी चित्र!
2 फसवणूक सत्राला मुदतवाढ!
3 गुंतवणूक निर्णय सुट्टीची योजना आखण्याइतपत बनवा रंजक!
Just Now!
X