|| दिलीप राजपूत

गेल्या सहा महिन्यांत विविध लेखांतून इच्छापत्र संपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग व त्याचे पलू याबद्दल जाणून घेतले. व्यवस्थापनाच्या पुढच्या भागाची माहिती करून घेण्याआधी मागील लेखाचा आलेख घ्यावा असे प्रकर्षांने जाणवले. मागील आठवडय़ात ‘रिटायर्ड लाइफ फाऊंडेशन’च्या नेरुळ येथे कार्यशाळेसाठी गेले असता, एक सामाईक धागा आढळला. इच्छापत्र केल्यानंतर त्याच्या प्रभावीपणाबद्दल शंका कायम उद्भवतात. एखाद्या व्यक्तीने जर का सर्व गोष्टी सविस्तरपणे इच्छापत्रात नमूद केल्या असतील तरीही प्रत्यक्षात त्याची हुबेहूब अंमलबजावणी होते का? उदाहरणार्थ, इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीने ते सांगायचे का? कुणाला ही माहिती द्यायची? ही माहिती दिल्यास त्याचा दुरुपयोग तर होणार नाही? रजिस्ट्रेशन केल्यामुळे इच्छापत्र केल्याची माहिती सर्वाना मृत्यूपश्चात होते का? इच्छापत्र कुठे जतन करून ठेवले पाहिजे? इच्छापत्र जर सापडले नाही तर त्याचे परिणाम, इच्छापत्र केल्यानंतर संपादित केलेल्या संपत्तीचे काय? संपत्ती इच्छापत्रात नमूद केली असता, परंतु इच्छापत्र केल्यानंतर त्या व्यक्तीकडे ती संपत्ती राहत नाही, अशा नमूद केलेल्या संपत्तीचे इच्छापत्र करणाऱ्याच्या पश्चात काय होते? इच्छापत्राऐवजी ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’ करता येते का? इच्छापत्र हा संपत्ती हस्तांतराचा एकमेव पर्याय आहे का? चला या प्रश्नाची उत्तरे पाहू या.

कुठे ठेवले : कायद्यानुसार इच्छापत्र कुठे ठेवले आहे त्याबद्दलची माहिती कुणालाही सांगणे आवश्यक नाही. इच्छापत्र हे एक खासगी दस्तऐवज आहे ज्याची माहिती मृत्यूपश्चातच समोर यायला हवी; पण व्यावहारिकदृष्टय़ा इच्छापत्र केल्याची माहिती ठरावीक लोकांना असली पाहिजे. हे लोक कोणते हे इच्छापत्र करणाऱ्यांनी ठरविले पाहिजे. जी एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती निष्पादक म्हणून नेमल्या जातात त्याच व्यक्तींना इच्छापत्राची माहिती देणे, उत्तम कारण याच व्यक्ती इच्छापत्राची अंमलबजावणी करतात. इच्छापत्राची एक प्रतही त्यांना देऊ शकता. निष्पादकाच्या जोडीला इच्छापत्र केल्याची माहिती कुणाला द्यावी याचा निवड आणि निर्णय इच्छापत्र करणाऱ्यांनी घ्यावा. इच्छापत्र कोणत्याही सुरक्षित व सहज उपलब्ध होईल अशा जागी ठेवणे. बँक लॉकर जर असेल तर अथवा कोणतीही सुरक्षित जागा पाहावी.

  1. इच्छापत्राची नोंदणी : आवश्यक नाही. नोंदणी इच्छापत्र केल्याचे स्थापित करते. हा नोंदणीकृत दस्तावेज आपोआप उपलब्ध होत नाही. जी व्यक्ती रजिस्ट्रारकडे औपचारिक अर्ज करते त्या व्यक्तीला प्रमाणित प्रत देण्यात येते.
  2. निष्पादकाची भूमिका : एखाद्या व्यक्तीने जर सर्व गोष्टी सविस्तरपणे नमूद केल्या असतील तर त्याची अंमलबजावणी होते का? निष्पादकावर जबाबदारी असते की, त्याने इच्छापत्राच्या अनुसरून करणे. जर का ते होत नसेल, तर प्रभावित लाभार्थी कोर्टाकडे दाद मागू शकतो. निष्पादक दोषी आढळल्यास त्याला शिक्षाही होऊ शकते.
  3. इच्छापत्र सापडले नाही तर: हा एक महत्त्वाचा प्रश्न – इच्छापत्र सापडले नाही तर? प्रामाणिक प्रयत्न करूनदेखील जर इच्छापत्र सापडले नाही तर ते इच्छापत्र करणाऱ्यानेच नष्ट केले आहे असे समजावे. ही एक इच्छापत्र रद्द करण्याची प्रक्रिया होय. अशा प्रसंगी संपत्तीचे वितरण इच्छापत्र न केल्याप्रमाणे होते. वैयक्तिक कायद्याप्रमाणे विभाग व हिस्सा ठरविला जातो.
  4. इच्छापत्र की पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी: पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दुसऱ्या व्यक्तीला देणारी व्यक्ती, जी कामे करू शकते त्याचे अधिकार अधिकृत करू शकतात. हा दस्ताऐवज देणारी व्यक्ती जिवंत असेपर्यंतच वैध असतो. देणाऱ्या व्यक्तीच्या पश्चात ते कालबाह्य़ होते. त्याचा उपयोग माणसाच्या हयातीतच उपयुक्त ठरू शकतो. म्हणूनच पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचे उपयोजन संपत्ती व्यवस्थापनात मर्यादित असते.

शेवटचा प्रश्न- इच्छापत्र हा एकमेव पर्याय आहे का? संपत्ती हस्तांतर हा एक संपूर्णपणे विषय आहे, जो आम्ही पुढच्या लेखात संबोधित करू.

(या संदर्भातील आपले प्रश्न पाठविण्यासाठी ई-मेल : willassure@gmail.com)