|| डॉ. मेधा शेटय़े

गेल्या तीन लेखांत आपण इच्छापत्राचे महत्त्व, ते किती सोप्या व सुलभरीत्या करता येते याबद्दलची माहिती करून घेतली. त्याचप्रमाणे इच्छापत्राचे विविध प्रकार पाहिले. या लेखात नामांकन (नॉमिनेशन) या बाबतीत असलेले समज-गरसमज याबद्दल माहिती करून घेऊ.

बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, एकदा का आपण आपल्या आप्तनातेवाईकांपकी कुणाचेही वारसदार म्हणून नामांकन केले की इच्छापत्र करण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ, दीपक िशदे या गृहस्थांनी आपल्या बँक खात्याचे नामांकन भावाच्या नावे करतात, म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक मुलाच्या नावे करतात आणि लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आणि त्यांचे को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे घर मुलीच्या नावे करतात. त्यांचा असा समज असतो की, ही संपत्ती गुंतागुंत न होता नामांकित केलेल्या व्यक्तीला विनासायास सुपूर्द केली जाऊ शकते. पण तसे अजिबात नाही. नामांकन हा इच्छापत्राला पर्याय हा सर्वसाधारणपणे असलेला समज चुकीचा आहे. पण हेही पूर्णत: बरोबर नाही.

साध्या-सोप्या भाषेत समजावयाचे झाले तर नामांकन केल्याने आपली स्थायी व जंगम मालमत्ता धारण करता येते, पण त्याचा मालकी हक्क सुपूर्द होत नाही. इच्छापत्राद्वारे आपण आपल्या मालमत्तेचे मालकी अधिकार व त्या अनुषंगाने उपलब्ध सर्व हक्क सुपूर्द करतो.

नामांकित व्यक्ती, फक्त मालमत्ता कायदेशीर वारसाहक्क प्राप्त होण्यास काही विलंब झाल्यास त्या संपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी घेते. नामांकित व्यक्ती ही वारसदार नसते, पण त्या संपत्तीचे धारण विश्वस्त म्हणून करते. किंबहुना संपत्तीसंरक्षक म्हणून धारण करते व इच्छापत्रात नमूद निर्देशानुसार योग्य त्या व्यक्तीला सुपूर्द करते. इच्छापत्र नसल्यास ही संपत्ती वारसदारांना सुपूर्द करणे नामांकित व्यक्तीला बंधनकारक असते.

इच्छापत्र मात्र मालमत्तेचे मालकीहक्कांचे हस्तांतरण करते. इच्छापत्र असल्यास नामांकन व वैयक्तिक धर्मानुसार असणाऱ्या कायद्याप्रमाणे होणारे वाटप या दोन्ही गोष्टी बाजूला सारून, इच्छापत्रात नमूद केल्याप्रमाणेच हक्काची अंमलबजावणी होते.

हे वाचल्यावर असा प्रश्न उद्भवतो. नामांकन करणे आवश्यक आहे का? नामांकन आवश्यक आहे. मालमत्तेचे संरक्षण करण्याकरिता. अर्थात आपल्या लक्षात आले असेलच, इच्छापत्र व नामांकन या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.

(लेखिका कायदाविषयक तज्ज्ञ)

या संदर्भातील आपले प्रश्न पाठविण्यासाठी ई-मेल : willassure@gmail.com