|| आशीष ठाकूर

कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल बाजाराच्या सध्याच्या पातळीचे समर्थन करीत आहेत. परदेशी गुंतवणुकीच्या ओघाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया एक वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांना आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणात्मक निर्णयांना मिळालेली ही एक पोच पावतीच आहे.

गेल्या लेखात शास्त्रोक्त, गणिती पद्धतीने निर्देशांकांचे वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ५२,१९६ आणि निफ्टीवर १५,३३१ चे असेल, हे नमूद केलेले होते. ही वरची लक्ष्य सरलेल्या सप्ताहातील मंगळवारच्या व्यवहारात गाठली. त्या दिवसांतर्गत उच्चांक – सेन्सेक्सवर ५२,५१६ आणि निफ्टीवर १५,४३१ नोंदवला गेला. पण त्याच दिवशीचा निर्देशांकाचा बंद भाव बरोबर सेन्सेक्सवर ५२,१०४ आणि निफ्टीवर १५,३१३ वर येऊन निर्देशांकावर पुढे घसरण सुरू झाली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५०,८८९.७६

निफ्टी : १४,९८१.७५

हल्लीच्या तेजीच्या वादळवाऱ्यात निर्देशांकावरच्या घसरणीचे स्वरूपच पालटले आहे. कधी घसरण ही अगदीच मामुली स्वरूपात, तर कधी अतिजलद स्वरूपात! अवघ्या पाच-सात दिवसांत सेन्सेक्सवर तीन ते चार हजार अंशांची आणि निफ्टीवर हजार ते बाराशे अंशांची घसरण होऊन पुन्हा सुधारणा. जसे काही घडलेच नाही असा आविर्भाव. असे हे निफ्टीने दिलेले तेजी-मंदीचे निशाणे पकडण्यात गुंतवणूकदारांची फसगत तर होतेच, पण त्याहून दु:खाची बाब म्हणजे ही फजिती पाहून निफ्टी खटय़ाळपणे बोलते.. ‘निशाणा तुला कळला ना’!

गुंतवणूकदारांची ही मानसिक दोलायमान अवस्था हाताळण्यासाठी गेल्या लेखात शास्त्रोक्त, गणिती पद्धतीचा (तांत्रिक विश्लेषणातील फेबुनासी फॅक्टर) आधार घेत गेल्या लेखाची मांडणी केली होती. यातील अधोरेखित बाब म्हणजे अखंड पैशाचा ओघ चालू असताना, तेजीच्या वाटचालीला तात्पुरता पूर्णविराम हा बरोबर सेन्सेक्सवर ५२,१९६ आणि निफ्टीवर १५,३३१ वरच होतो, प्रत्यक्षात जे घडले ते नवलच म्हणायचे!

या स्तंभातील जानेवारीपासून आजतागायत प्रत्येक लेखात एक वाक्य अधोरेखित असायचे.. आताच्या घडीला निर्देशांकावर ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ हा सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० असा असेल व तेजीची कमान या स्तरावर अवलंबून असेल व सरलेल्या सप्ताहातील साप्ताहिक बंद बरोबर या स्तराच्या आसपास होत आहे.

आता दोन कळीचे प्रश्न

१) बाजाराचा उच्चांक स्तर गाठला गेलाय का?

२) उच्चांक झाला असल्यास, तर तेथून निर्देशांकावर घसरण किती असेल?

उच्चांकाचा मुद्दा समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. अतिजलद ट्रेनची प्रवाशांनी साखळी ओढल्यानंतर ट्रेन कशी थांबते तो प्रसंग डोळ्यासमोर आणा. साखळी ओढल्यानंतर अतिजलद ट्रेन तात्काळ न थांबता काही अंतरावर जाऊन थांबते, तशीच परिस्थिती आताच्या घडीला बाजाराची आहे.

आजही बाजारावर तेजीवाल्यांची पकड आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ५०,५०० ते ५०,१०० आणि निफ्टीवर १४,८५० ते १४,७०० चा स्तर राखल्यास बाजारात पुन्हा सुधारणा होऊन निर्देशांक सेन्सेक्सवर ५१,५०० ते ५१,७०० आणि निफ्टीवर १५,१५० ते १५,२०० पर्यंतची फेरउभारी दिसेल. हा स्तर निर्देशांकांनी पार केल्यास नवीन उच्चांक सेन्सेक्सवर ५२,८०० आणि निफ्टीवर १५,५०० असा असेल.

सरलेल्या सप्ताहातील बाजाराची घसरण पाहता उच्चांक अगोदरच प्रस्थापित झाला का? हे जाणून घेण्यासाठी येणाऱ्या दिवसातील सुधारणेत निर्देशांक सेन्सेक्सवर ५१,५०० ते ५१,७०० आणि निफ्टीवर १५,१५० ते १५,२०० चा स्तर पार करण्यास निर्देशांक वारंवार अपयशी ठरून ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० स्तर तोडल्यास सेन्सेक्सवर ५२,१९६ आणि निफ्टीवर १५,३३१ ला उतरत्या भाजणीतील उच्चांक (लोअर टॉप) प्रस्थापित झाला असे समजण्यास हरकत नाही. या स्तरावर अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा (गुंतवणूक कालावधी सहा महिन्यांहून कमी) असलेल्या गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर ज्यायोगे मंदीची मानसिक आणि आर्थिक तयारी होइल.

पुढील लेखात उच्चांक झाला असल्यास निर्देशांकावर घसरण किती असेल ते जाणून घेऊ या.

आता आपण गुंतवणूकदारांच्या आवडत्या समभागांचे निकालपूर्व विश्लेषण जाणून घेऊ या.

१) पॉवर इंडिया (एबीबी पॉवर प्रॉडक्ट अ‍ॅण्ड सिस्टीम इंडिया लिमिटेड)

तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, २६ फेब्रुवारी

१९ फेब्रुवारीचा बंद भाव – १,४३८.४० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर –             १,४०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,६०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,२०० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.