बऱ्याच लोकांनी मुलांची शिक्षणे, निवृत्तीनंतरच्या वर्षांकरिता तजवीज म्हणून आणि अगदी वाहनासाठी विम्याच्या सुरक्षेचा लाभ घेतलेला आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, हेच ग्राहक कुटुंबाच्या आरोग्याचा विमा उतरवताना मागेपुढे पाहतात. अनास्था म्हणण्यापेक्षा, जागरुकता आणि पुरेसे शिक्षण नसणे हा घटकही याला कारणीभूत आहे.
आरोग्य विम्याबद्दलची जागरुकता वाढते आहे पण सुयोग्य आरोग्य विमा खरेदी करताना कोणत्या बाबींकडे ध्यान द्यावे यांवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे?
बऱ्याच वेळी आपल्या गरजांची पूर्तता करणारी योजना विकत घेणे ही सुरुवात न बनता ते आपल्याला परवडू शकेल काय या प्रश्नाने सुरुवात होते. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्याआधी त्यातून मिळणाऱ्या लाभाचे मूल्यांकन केले जाते ही बाब लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वस्त योजनांमध्ये ‘‘सर्वागीण सुरक्षा’’ मिळेलच असे नाही. योजनेची वैशिष्ट्ये आणि त्यातून मिळणारे लाभ यांच्याविषयी संपूर्ण ज्ञान असल्यास सुयोग्य योजनेची निवड करता येते.
तुम्ही नेमक्या किती रकमेचा विमा उतरवला आहे?
विम्याची रक्कम म्हणजे कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी वैयक्तिक किंवा कुटुंबाच्या एकत्रित आíथक सुरक्षेकरिता केलेली तजवीज होय. ही रक्कम वैयक्तिक किंवा कुटुंबाकरिता एकत्रित अशी फ्लोटर पद्धतीने देऊ करण्यात येते. तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या गरजांची पूर्तता करेल, अशा रकमेचा आकडा कसा ठरविता येईल?
याकरिता तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरे देऊन निष्कर्षांप्रत येऊ शकाल –
* वयाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असतो. वय जितके जास्त, सुरक्षा तितकीच जास्त लागते
* कुटुंबातील तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींची संख्या
* वेगवेगळ्या शहरांतील आरोग्यनिगेचा खर्च बदलता असतो, त्यामुळे तुम्ही वास्तव्यास असलेल्या शहराचाही विचार होणे गरजेचे आहे
* आपली मिळकत आणि आपल्याला परवडणारी रक्कम याचा विचार करून विमा उतरवण्यात यावा
* आजच्या काळात बहुसंख्य कर्मचारी आपल्या नियोक्त्याने पुरवलेल्या आरोग्य सुरक्षेवर अवलंबून असतात. पण ही सुरक्षा पुरेशी आणि सर्वागीण आहे का याचे मूल्यांकन करून अतिरिक्त सुरक्षेची गरज आहे का याचा विचार व्हावा. आजकाल काही कंपन्या ‘हाय डिडक्टिबल’ पर्याय देऊ करतात. त्यातून नियोक्त्याने देऊ केलेल्या सुरक्षेमध्ये भर घालून वाजवी किंमतीमध्ये अतिरिक्त सुरक्षा (टॉप-अप) मिळवता येते.
* किती रक्कमेचा विमा उतरवावा हे ठरवताना तीव्र ताण, जीवनशैलीशी संबंधित आजार, दरवर्षी वैद्यकीय खर्चात होणारी दोन आकडी वाढ विचारात घेणे गरजेचे आहे. तसेच सद्य आणि भविष्यकालीन गरजांचा देखील विचार व्हावा.

नेटवर्क हॉस्पिटल्स कोणती आहेत?
नेटवर्क हॉस्पिटल्स म्हणजे विमा कंपनी किंवा टीपीए (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटर)च्या यादीत असलेला हॉस्पिटल्सचा समूह होय. नेटवर्क हॉस्पिटल्सचा प्रमुख लाभ म्हणजे इथे कॅशलेस सेवा मिळते. या सुविधेअंतर्गत तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती होता येते आणि कोणतीही रक्कम भरावी न लागता उपचार मिळवता येतात, आणि त्यामुळे या प्रक्रियेत येणारा आíथक ताण कमी होतो. नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये काही शस्त्रक्रिया अत्यंत वाजवी किंमतीत केल्या जात असल्याने एकंदर हॉस्पिटलायझेशनचा खर्च कमी होतो.
नेटवर्क हॉस्पिटल्सची यादी मोठी असलेल्या योजनेचा लाभ घेणे कधीही चांगले.
तुमच्या योजनेला ‘मर्यादां’चे बांध आहेत काय?
वेगवेगळ्या आरोग्य विमा योजनांमध्ये दावा करता येईल, अशा लाभांवर काही विशिष्ट मर्यादा असतात. त्यामध्ये रुग्णालयातील खोलीच्या भाड्यावर असलेल्या मर्यादा, काही विशिष्ट आजारांवर किती रकमेचा विमा उतरवता यावा यावर असलेल्या मर्यादा किंवा डॉक्टरांना अदा करायच्या शुल्कावर असलेल्या मर्यादा यांचा समावेश असतो. अशा योजनेत समाविष्ट नसलेल्या खर्चाची जबाबदारी विमाधारकाला उचलावी लागत असल्याने त्याच्या खिशावर ताण येऊ शकतो.
सब-लिमिट्स असणाऱ्या योजना स्वस्त भासत असल्या तरी कोणत्याही मर्यादा नसलेल्या योजनेची निवड करणे कधीही चांगले.

तुमची पॉलिसी अनेक दाव्यांकरिता सुरक्षा पुरवते का?
एकाच पॉलिसी वर्षांमध्ये अनेक वेळा एकमेकांशी अजिबात संबंधित नसलेल्या वैद्यकीय आणीबाणी आल्यास/ रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास पॉलिसीधारकाच्या मदतीला रिस्टोरेशन सुविधा धावून येते. अतिरिक्त सुरक्षा हवी असल्यास हे वैशिष्टय कामी येते. त्यामुळे एकाच पॉलिसी वर्षांमध्ये एकाहून अधिक दावे करावे लागल्यास आणि त्याची परिणती म्हणून विम्याची रक्कम संपल्यास विम्याची रक्कम रिस्टोअर करण्याची सुविधा मिळते.
‘रिस्टोरेशन’ सुविधा देऊ करणाऱ्या योजना आत्यंतिक गरजेच्या वेळी तुम्हाला अतिरिक्त सुरक्षा पुरवतात.
तुमचा प्रतीक्षा कालावधी आणि योजनेतून काय वगळले गेले आहे?
आरोग्य विमा खरेदी करताना तुम्ही तुमचा प्रतीक्षा कालावधी आणि योजनेतून काय वगळले गेले आहे, त्या गोष्टींना जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अनेक आरोग्य विमा कंपन्यांमध्ये प्री-एक्झिस्टींग डिसीज (पीईडी) म्हणजेच पॉलिसी खरेदी करण्याच्या आधी पॉलिसीधारकाला कोणताही आजार असेल तर त्या संदर्भात प्रतीक्षा कालावधी लागू होतो. हा प्रतीक्षा कालावधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या योजनांमध्ये एक ते चार वष्रे असा कितीही असू शकतो. प्री-एक्झिस्टींग डिसीजसोबतच कॅटरॅक्ट, हíनया वगैरे सर्वसाधारण आजारांच्या संदर्भातही एक किंवा दोन वर्षांचा प्रतीक्षा कालावधी असतो. योजनेतून वगळल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वसाधारणपणे कॉस्मेटिक सर्जरी, आत्महत्या, एचआयव्ही/एड्स, अॅक्युप्रेशर, रिफ्लेक्सोलॉजी अशा पर्यायी उपचारयोजना यांचा समावेश असतो.
प्रतीक्षा कालावधी म्हणून जितकी कमी वष्रे लागतील, जितक्या कमी गोष्टी वगळलेल्या असतील, तितकी त्या योजनेतून प्रदान केली जाणारी सुरक्षा अधिक असते.
योजनेमध्ये आजार आणि कल्याण सुरक्षा आहे का?
आरोग्य विमा उतरवण्याचा मुख्य उद्देश सुरक्षा मिळवणे हा असतो. पण तुम्ही आजारातच नव्हे तर तुमच्या कल्याणातही तुमच्यासोबत असेल अशा आरोग्य विमा पुरवठादाराची निवड करणे हितावह असते. त्यामुळे नियमित तत्त्वावर प्रतिबंधात्मक तपासण्या करणाऱ्या, तुम्हाला तुमच्या आरोग्याचे व्यवस्थापन करण्यात आणि आरोग्यात सुधारणा करण्यात काही कंपन्या मदत करीत असतात.
वैयक्तिक स्तरावरील उपक्रम राबवून तुम्हाला निरोगी राखण्यात मदत करणाऱ्या योजनांची निवड करा.

इतर लाभ
प्रसूती सुरक्षा: तुम्ही अविवाहित किंवा विवाहित तरूण व्यक्ती आहात आणि तुम्ही कुटुंब वाढवू इच्छीता तर ही सुरक्षा तुमच्या कामी येईल. तुम्ही विशेष करुन ही सुरक्षा देऊ करणाऱ्या योजनेची निवड करा, कारण बहुतेक सर्व पॉलिसींमधून प्रसूती सुरक्षा वगळली जाते.
जागतिक प्रवास सुरक्षा:  तुम्ही जगभर प्रवास करत असाल आणि जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली तर अशा प्रकारची सुरक्षा तुमच्याकरिता उपयुक्त ठरु शकेल.
आऊट पेशंट सुरक्षा: सर्वसाधारण आरोग्य विमा योजना तुम्हाला रुग्णालयात भरती झाल्यावरच सुरक्षा पुरवते, पण काही योजना अशाही आहेत ज्या रुग्णाच्या इतर खर्चाकरिता थोड्याफार प्रमाणावर सुरक्षा पुरवतात.
कॉस्ट शेअरिंग तंत्रे: खर्चाची चिंता असेल किंवा तुमच्या सद्य विमा योजनेतून मिळत असलेली सुरक्षा अपुरी असल्याने तुम्हाला त्या सुरक्षेत भर टाकायची असल्यास ‘डिडक्टिबल’ किंवा ‘को-पेमेंट’ पर्याय पुरवणाऱ्या योजनांचा शोध घ्या.
(लेखक, सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)