सप्टेंबरची १५ तारीख जवळ आली की वर्तमानपत्रात, रेडिओ, दूरचित्रवाणीवर अग्रिम कर भरण्याच्या जाहिराती प्रसिद्ध होतात. प्राप्तिकर खाते अग्रिम कर भरण्याविषयी जनतेला आवाहन करीत असते. कारण १५ सप्टेंबर हा वैयक्तिक करदात्यांसाठी देय कराचा पहिला हप्ता आणि कंपन्यांसाठी दुसरा हप्ता भरण्याची वेळ आहे. प्राप्तिकर हा वेळेवर भरला नसेल तर त्यावर व्याज भरावे लागते. कर भरण्यास एक दिवस जरी विलंब झाला तरी एका महिन्याचे व्याज भरावे लागते. त्यामुळे कर कधी, कोणी आणि किती भरावा हे जाणून घेणे गरजेचे आहे. करदात्याच्या नावे जमा होणारा कर हा सामान्यत: खालील तीन प्रकारचा असतो.
१. पसे देणाऱ्याने कापलेला उद्गम कर (TDS)
२. अग्रिम कर (ADVANCE TAX)
३. स्व-निर्धारण कर (SELF ASSESSMENT TAX)
हे कर भरण्याविषयी प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी पाहू या :
उद्गम कराच्या तरतुदी या काही अपवाद सोडले तर जवळ जवळ सर्व प्रकारच्या देय रकमेवर लागू होतात. उदाहरणार्थ काही प्रकारच्या उद्गम कराच्या तरतुदी खालीलप्रमाणे :
* पगार: कर्मचाऱ्याला पगार देताना मालकाला त्यातून उद्गम कर कापूनच पगार द्यावा लागतो. पगारावर संपूर्ण कर कापण्याची जबाबदारी ही मालकाची असते. हा उद्गम कर कापताना प्राप्तिकर कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या वजावटी  मालकाला विचारात मात्र घ्याव्या लागतात. यासाठी कर्मचाऱ्याने मालकाला सर्व तपशील आणि गुंतवणूक केल्याचे प्रमाण सादर करावे लागतात. कर्मचाऱ्याला पगाराचेच उत्पन्न असेल तर त्यावरील कर हा मालकच कापून घेत असल्यामुळे विवरणपत्र भरताना वेगळा कर भरावा लागत नाही. परंतु कर्मचाऱ्याला पगाराव्यतिरिक्त काही उत्पन्न असेल तर त्याला त्यावर कर भरावा लागतो (जर एकूण उत्पन्न किमान करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर). मालकाला फॉर्म १६ नुसार कर्मचाऱ्याला प्रमाणपत्र द्यावे लागते.
* घरभाडे: काही ठरावीक व्यक्तींनी घरभाडे दिले तर त्यावर उद्गम कर कापावा लागतो. वार्षकि भाडे १,८०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तरच भाडय़ावर १०% इतका उद्गम कर कापला जातो. कंपनी, भागीदारी संस्था, धर्मादाय संस्था, इत्यादींना सर्व प्रकारच्या स्थावर मालमत्तेच्या भाडय़ावर या तरतुदी लागू होतात. आणि वैयक्तिक करदात्यांनी (ज्यांची मागील वर्षांतील उलाढाल ही ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त आहे) धंदा व्यवसायाच्या संदर्भात दिलेल्या भाडय़ावर उद्गम कराच्या तरतुदी लागू होतात. जर वैयक्तिक करदात्यांनी स्वतच्या किंवा कुटुंबाला राहण्यासाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी भाडे दिले असेल तर त्यावर उद्गम कर कापण्याची गरज नाही.
* व्याज: बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवीवर आणि आवर्ती ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर (व्याज उत्पन्न वार्षिक १०,००० रुपये किंवा जास्त) बँक १०% उद्गम कर कापून घेते. बचत खात्यावरील व्याजावर उद्गम कर कापला जात नाही. करदात्याच्या स्लॅबप्रमाणे बाकीचा कर अग्रिम कर किंवा स्व-निर्धारण कराच्या रूपात भरावा लागतो. पोस्टाच्या काही ठेवींवरील व्याजावर उद्गम कापला जात नाही. त्यामुळे असा गरसमज होतो की अशा ठेवींवरील व्याज हे करपात्र नाही. अशा ठेवींवरील व्याजावर करदात्याला (जर करपात्र उत्पन्न असेल तर) कर भरावा लागतो. करमुक्त व्याजाच्या उत्पन्नावर उद्गम कर कापला जात नाही. उदा. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) वरील व्याज.
* स्थावर मालमत्ता खरेदीवर: मागील वर्षांपासून ५० लाख रुपयांच्यावर खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेच्या (शेतजमीन सोडून) व्यवहारावर १% उद्गम कर कापण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा कर खरेदी करणाऱ्याला भरावा लागतो. पसे फॉर्म २६एएस सोबत भरावे लागतात आणि विक्री करणाऱ्याला फॉर्म १६बी मध्ये उद्गम कराचे प्रमाणपत्र द्यावे लागते. अनिवासी भारतीयाने जर स्थावर मालमत्ता विक्री केली असेल तर खरेदी करणाऱ्याने त्याच्या भांडवली नफ्यावर संपूर्ण देय कर उद्गम कर म्हणून कापावा लागतो.
याशिवाय लॉटरी, खेळ, कोडी, घोडा शर्यत, एलआयसी कमिशन इत्यादींवर सुद्धा उद्गम कर पसे देणाऱ्याला भरावा लागतो.
पसे देणाऱ्याने उद्गम कर कापल्यानंतर सरकारकडे जमा करावा लागतो आणि त्याचे त्रमासिक विवरण पत्र प्राप्तिकर खात्याकडे भरावे लागते. ते भरल्यानंतर उद्गम कराची रक्कम करदात्याच्या ‘पॅन’ खात्यात जमा होते. अशी जमा झालेली रक्कम फॉर्म २६एएस मधून वेळोवेळी तपासून बघता येते. जर कापलेली रक्कम २६एएसमध्ये दिसत नसेल तर कर कापणाऱ्याकडे विचारणा करावी.
अग्रिम कर
अग्रिम कर म्हणजे आíथक वर्षांचा कर ते वर्ष संपण्यापूर्वी आगाऊ भरणे. उदा. आíथक वर्ष २०१५-१६ चा अग्रिम कर हा ३१ मार्च २०१६ पूर्वी भरावा लागतो. हा कर तीन हप्त्यात भरावा लागतो. पहिला हप्ता हा १५ सप्टेंबर पूर्वी एकूण अंदाजित कराच्या ३०% एवढा भरावा लागतो. दुसरा हप्ता १५ डिसेंबरपूर्वी एकूण अंदाजित कराच्या ३०% (एकूण ६०%) एवढा भरावा लागतो. शेवटचा हफ्ता १५ मार्च पूर्वी एकूण अंदाजित कराच्या ४०% (एकूण १००%) एवढा भरावा लागतो. अग्रिम कराच्या तरतुदी ज्यांचा देय कर (उद्गम कर वजा करता) १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तरच लागू होतात. जर अग्रिम कर भरण्यात विलंब झाला तर दर महा १% प्रमाणे व्याज भरावे लागते. जर हा देय कर १०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर विवरण पत्र भरण्यापूर्वी (म्हणजेच ३१ जुलपूर्वी) स्व-निर्धारण कर भरता येतो. यासाठी व्याज भरावे लागत नाही.
ज्येष्ठ नागरिकांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू नाहीत. अशांनी कर विवरण पत्र भरण्यापूर्वी (३१ जुल पूर्वी) सर्व कर भरला तर त्यांना व्याज भरावे लागत नाही. ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नामध्ये धंदा किंवा व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश असेल तर त्यांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. या तरतुदी खालील उदाह रणाद्वारे थोडक्यात सांगता येतील :
स्व निर्धारण कर
विवरण पत्र भरतांना स्वत:हून भरलेल्या कराला स्व-निर्धारण कर म्हणतात. विवरण पत्र भरताना एकूण उत्पन्नावर देय कर संपूर्ण भरावा लागतो. कर भरल्याशिवाय विवरणपत्र दाखल केले तर ते विवरणपत्र सदोष म्हणून समजले जाते. म्हणून विवरणपत्र भरताना कर संपूर्ण किंवा देय करापेक्षा जास्त भरला असला पाहिजे. ज्यांचा देय कर (उद्गम कर वजा करता)     १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर स्व-निर्धारण कर भरताना त्यावर १% प्रमाणे १ एप्रिल पासून कर भरलेल्या महिन्यापर्यंत व्याज भरावे लागते. अग्रिम कर आणि स्व-निर्धारण कर हा २८० क्रमांकाच्या चलनाद्वारे भरता येतो.
व्याज आकारणी
वर सांगितल्याप्रमाणे अग्रिम कर, स्व-निर्धारण कर आणि विवरण पत्र विलंबाने भरल्यास व्याज भरावे. अग्रिम कर वेळेवर न भरल्यास कलम २३४सी प्रमाणे १% दरमहाप्रमाणे व्याज भरावे लागते. हे व्याज ३१ मार्चपर्यंतच आकारले जाते. ३१ मार्चनंतर अग्रिम कर भरता येत नाही. जर कर भरला तर तो स्व-निर्धारण कर म्हणून समजला जातो. या करावर व्याज कलम २३४बी प्रमाणे १ एप्रिलपासून सुरू होते. हे व्याज सुद्धा १% दरमहा आहे. देय कराच्या ९०% पेक्षा जास्त रक्कम अग्रिम कर आणि उद्गम कराच्या रूपाने भरली असेल तर हे व्याज भरावे लागत नाही. विवरण पत्र भरण्यास विलंब झाला तर देय कराच्या रकमेवर कलम २३४ए प्रमाणे १% अतिरिक्त व्याज भरावे लागते.
जर करदात्याला अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत असतील तर त्यांनी उद्यापर्यंत पहिला हफ्ता भरावा म्हणजे त्यांना व्याज भरावे लागणार नाही.
लेखक सनदी लेखाकार आहेत
pravin3966@rediffmail.com

pune, Young Man Arrested, Raping College Girl, Threatening with girl obscne Video, Pune Police Investigate, girl attempted suicide, crime in pune, pune news,
धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…