19 January 2020

News Flash

वित्त शेष : ख्वाईश लवकर निवृत्त होण्याची

स्वेच्छानिवृत्तीनंतर आपल्या वेळेचा उपयोग कसा करणार याचे गणित मांडावे लागते.

(संग्रहित छायाचित्र)

जयंत विद्वांस

नियमबद्ध नोकरी, तेच तेच काम करून आलेला कंटाळा आणि दुसऱ्या बाजूला मनाला येईल तसे करण्याचे स्वातंत्र्य या द्विधा परिस्थितीमध्ये नोकरी सोडण्याचा विचार केला जातो. ‘लवकर निवृत्त होणार’ असे म्हणणे ही आजच्या तरुण पिढीची क्रेझच बनली आहे. मात्र हा निर्णय आर्थिक नियोजनतज्ज्ञाकडून चाचपून घेणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजन करण्यास येणारी तरुण जोडपी हमखास असे सांगतात की, ‘पंचेचाळीसाव्या वर्षी नोकरी सोडून, वी वॉन्ट टू लिव्ह ऑन अवर ओन टर्म्स .’

म्हणजे नेमके काय? माहीत नाही! सध्याच्या काळात नवरा-बायको दोघेही नोकरीमध्ये व्यस्त असतात. पूर्वीसारखी आता आठ तासांची डय़ुटी नसते. १०-१२ तास रोज काम करावे लागते. प्रवासामध्ये २-३ तास सहज जातात. १२-१४ तास गेल्यानंतर शिल्लक वेळ फार कमी राहतो. तसेच कार्यालयात दररोज नवीन टाग्रेट्स साध्य करावी लागतात. प्रमोशनची चढाओढ असतेच. शिवाय बदलीची टांगती तलवार डोक्यावर असते. या सगळ्यात जीव मेटाकुटीला येतो आणि पंचेचाळीसाव्या वर्षीच या सर्व कटकटीमधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन जीवनाचा आनंद उपभोगूया असे विचार घोळू लागतात.

‘आयुष्य स्वतच्या मर्जीनुसार जगणे’ याची व्याख्या स्पष्ट असणे गरजेचे असते. आहे ही परिस्थिती नको म्हणजेच येणारी दुसरी परिस्थिती चांगली असेल असे होत नाही. सध्याची परिस्थिती चांगली नाही हे आपण आपल्या स्टँडर्डस्नुसार ठरवतो. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात, प्रचंड उकाडय़ात ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्यासाठी वातानुकूलन यंत्र काय साधा पंखासुद्धा नव्हता. त्यामानाने आपण थंड हवेत बसून काम करत असतो. सक्तीची सेवानिवृत्ती असेल तर नाइलाज असतो, पण स्वेच्छानिवृत्ती घेताना पुढील आयुष्यात पुरेल इतका पसा हाताशी आहे का याचा विचार आवश्यक असतो. हा विचार करताना आपले अपेक्षित आयुर्मान हे ८०-८५ इतकेच धरलेले असते. पुढील काळात वाढणाऱ्या महागाईवर आपले नियंत्रण नसते. पंचेचाळीसाव्या वर्षी सर्व जबाबदाऱ्या संपलेल्या नसतात. परिणामी उत्तर आयुष्यात पैसे कमी पडण्याची शक्यता असते.

स्वेच्छानिवृत्तीनंतर आपल्या वेळेचा उपयोग कसा करणार याचे गणित मांडावे लागते. सामाजिक कार्यात स्वतला वाहून घेण्यासाठी वेगळी कौशल्ये/ कल लागतो. ४५-५० व्या वयात तो नव्याने जोपासावा लागतो. खूपदा समाजकार्य म्हणजे नक्की काय याची चाचपणी केलेली नसते. खूपदा स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपले जुने छंद जोपासण्याची ख्वाईश असते. चित्रकलेची आवड असणाऱ्यांनी १५-२० वर्षांत ब्रश हातात धरलेला नसतो आणि वाचनाची आवड असणाऱ्यांनी रेल्वेच्या चौथ्या सीटवर बसून झोप येईपर्यंत रोजचे दैनिक चाळलेले असते. या आवडी नव्याने विकसित होण्यास काही काळ जावा लागतो.

आर्थिक बाबींचा विचार करायचा झाला तर तुम्ही उच्च उत्त्पन्न गटात असणे गरजेचे आहे. मासिक बचतीमध्ये निवृत्ती नियोजनासाठी मोठय़ा रकमेची ‘एसआयपी’ आवश्यक आहे. ज्यायोगे पुढील काळात लागणारी अपेक्षित पुंजी नोकरी-व्यवसायात असताना १०-१५ वर्षांत तयार होईल. तुम्हाला ४०-४५ व्या वयाच्या सुमारास नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याचे नियोजन ७-८ वर्षे आधी सुरू करावे लागते. सुरुवातीच्या काळात व्यावसायिक उत्पन्न कमी असते किंवा आपलेच पैसे व्यवसायात ओतावे लागतात. अशा वेळेस आपली पुढील एक-दोन वर्षांची घरखर्चाची तरतूद तरल गुंतवणुकीद्वारे करून ठेवावी लागते. व्यवसाय काय करणार याचे चित्र स्पष्ट असावे लागते.

समजा, तुमचे आजचे वय ३० वर्षे आहे. तुमचा मासिक खर्च ५० हजार रुपये  आहे. तुम्ही ४० व्या वर्षी निवृत्त होऊ इच्छिता. तुमचे अपेक्षित आयुर्मान १०० वर्षे आहे. महागाईचा दर पाच टक्के आणि गुंतवणुकीवर परतावा आठ टक्के धरल्यास तुमचा १० वर्षांनंतर मासिक खर्च ८१,५०० रुपये होईल. हा खर्च तुमच्या वयाच्या शंभराव्या वर्षांपर्यंत वाढत जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला निवृत्तीनिधी रुपये २.८७ कोटी रुपयांचा लागेल. हा निधी चालू १० वर्षांत जमा करण्यासाठी ८ टक्के परतावा दर जमेस धरल्यास, दरमहा १,५८,००० रुपये ‘एसआयपी’मध्ये गुंतवावे लागतील.

हेच निवृत्तीचे वय पाच वर्षांनी पुढे ढकलल्यास बाकी सर्व कंडिशन्स त्याच राहिल्यास तुम्हाला निवृत्तीनिधी ३.५४ कोटी रुपये लागेल आणि हा निधी १५ वर्षांत उभा करण्यासाठी १,०४,००० रुपये ‘एसआयपी’ करावी लागेल.

आजच्या काळात लवकर निवृत्त होणार असे म्हणणे ही तरुण पिढीत आलेली क्रेझ आहे. नियमबद्ध नोकरी, तेच तेच काम करून आलेला कंटाळा आणि दुसऱ्या बाजूला मनाला येईल तसे करण्याचे स्वातंत्र्य या द्विधा परिस्थितीमध्ये नोकरी सोडण्याचा विचार केला जातो. अशा वेळेस आर्थिक नियोजनतज्ज्ञाकडून खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी खालील बाबींचा विचार केला जायला हवा.

१) कर्जाचे हप्ते : घराचे कर्ज साधारणपणे वयाच्या चाळीस- पंचेचाळीसाव्या वर्षांपर्यंत चालू असते. एक कर्ज संपते तोवर जागा लहान पडू लागते. मोठी जागा घेण्यासाठी आधीचे घर विकून नवीन कर्ज काढले जाते. याच्या जोडीने वाहन कर्ज असते. निवृत्त होण्यापूर्वी सर्व कर्ज फेडली जाणे गरजेचे आहे.

२) इतर जबाबदाऱ्या :  मुलांचे शिक्षण, लग्न यासाठी योग्य तरतूद असणे गरजेचे आहे.

३) मेडिक्लेम : वाढत्या वयात वैद्यकीय खर्च वाढत जातात. असे म्हटले जाते की वैद्यकीय क्षेत्रात महागाई दरवर्षी १५-२० टक्क्यांनी वाढते. त्यानुसार मोठय़ा रकमेचा आरोग्य विमा आवश्यक आहे.

४) जीवनशैलीतील बदल :  आपल्या एकूण खर्चापैकी मोठा खर्च हा आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असतो. जीवनावश्यक गरजांसाठी फार कमी पसा लागतो. निवृत्तीनंतर आपल्या जीवनशैलीत बदल करून खर्च कमी करावा लागतो.

आयुष्यात शेवटी आनंद, समाधान हे महत्त्वाचे आहेच. पण आर्थिक सुबत्ता नसेल तर ते समाधान लटके पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

sebiregisteredadvisor @gmail.com

(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)

First Published on November 4, 2019 1:50 am

Web Title: wish to retire early term insurance scheme abn 97
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : रूपांतरण आणि पिकवण
2 क.. कमॉडिटीचा : शेतमालाच्या हमीभावाला ‘ऑप्शन्स’चा पर्याय
3 नावात काय? : अ‍ॅसेट बबल
Just Now!
X