मिरॅ अ‍ॅसेट इमìजग ब्लूचीप फंड

सध्या सुरू असलेल्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वाचक आपले प्रश्न थेट विचारतात. मुंबईत दादर येथे झालेल्या या कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे भांडुप येथील वाचक आनंद ताम्हणकर यांनी म्युच्युअल फंडाच्या निवडीच्या संदर्भात एक प्रश्न विचारला. प्रश्न असा की, ‘म्युच्युअल फंडांची ‘सिप’साठी निवड करताना फंडांच्या मालमत्तेला (एयूएम) किती महत्त्व असावे?’

हा प्रश्न विचारल्याबद्दल ताम्हणकर यांचे अभिनंदन करावेसे वाटते. बहुसंख्य गुंतवणूकदार केवळ पूर्व परताव्याच्या दराचा विचार करीत असताना ताम्हणकर यांना फंडाच्या मालमत्तेचा विचार करावासा वाटला हे त्यांच्या अर्थ सजगतेचे द्योतक आहे. मालमत्ता १,२०० कोटींपेक्षा थोडी कमी असूनही फंडाच्या सुरुवातीपासून म्हणजे ९ जुल २०१० पासून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराला त्यांच्या १,००,००० गुंतवणुकीचे १२ फेब्रुवारीच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार २,७१,३६० रु. बाजारमूल्य असणाऱ्या अर्थात गुंतवणुकीवर वार्षकि १९.५१% दराने परतावा देणाऱ्या व सुरुवातीपासून एसआयपी गुंतवणूक करणाऱ्याला २२.४५% परतावा देणाऱ्या ‘मिरॅ अ‍ॅसेट इमìजग ब्लूचीप’ची आजच्या फंड विश्लेषणासाठी निवड करावीशी वाटली.

Untitled-25

‘निफ्टी मिडकॅप इंडेक्स’ हा ‘मिरॅ अ‍ॅसेट इमìजग ब्लूचीप’चा संदर्भ निर्देशांक आहे. या फंडाने ३१ जानेवारी २०१६च्या गुंतवणुकीच्या विवरणानुसार फंडाचा निधी १०.४६% मेगा कॅप, २१.७७% लार्ज कॅप, ५५.६१% निधी मिड कॅप व १२.९% स्मॉल कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक केली आहे. सध्याच्या शेअर बाजारासाठी कठीण असणाऱ्या काळात ३३% गुंतवणूक मेगा कॅप व लार्ज कॅप प्रकारच्या समभागात असल्याने या फंडाला स्थर्य प्राप्त झाले आहे. तसेच ५५.६१% गुंतवणूक मिड कॅप व १२.९% गुंतवणूक मिड व स्मॉल कॅप प्रकारच्या समभागात असल्याने फंडाच्या स्थापनेपासून फंडाचा तिमाही परतावा मोठय़ा फरकाने संदर्भ निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा अधिक राहिला आहे. मागील एका वर्षांत संदर्भ निर्देशांकाने -३% परतावा दिलेला असताना फंडाचा परतावा ८% आहे. तीन वष्रे कालावधीत संदर्भ निर्देशांकाहून २२% तर पाच वष्रे कालावधीत संदर्भ निर्देशांकाहून १४.३% अधिक परतावा दिला आहे. याचा अर्थ निधी व्यवस्थापक नीलेश सुराणा हे गुंतवणूकदारांना संदर्भ निर्देशांकाहून अधिक परतावा (अल्फा)ची निर्मिती करण्यात यशस्वी झाले आहेत. मागील १८ महिन्यांपासून हा फंड परताव्याच्या बळावर पहिल्या पाचात असून सप्टेंबर डिसेंबर २०१५ या तिमाहीच्या परताव्यामुळे पहिल्या क्रमांकावर आहे. केवळ तेजीच्या दिवसांत नव्हे तर मंदीच्या काळात एनएव्हीमधील घट संदर्भ निर्देशांकाहून कमीच राहिली आहे.

येत्या वर्षभरात बाजाराची परिस्थिती सुधारल्यावर लार्ज कॅप गुंतवणुकीचा परतावा मिडकॅप परताव्यापेक्षा अधिक असेल असा अनेक फंड व्यवस्थापकांचा कयास आहे. असाच कयास या फंड व्यवस्थापनाचा असल्याने जेपी मॉर्गन मिड अँड स्मॉल कॅप, एचडीएफसी मिडकॅप अपॉच्र्युनिटी, फ्रँकलिन इंडिया प्रायमा, सुंदरम सीलेक्ट मिड कॅप या स्पर्धक फंडाच्या लार्ज कॅप गुंतवणुकीपेक्षा ‘मिरॅ अ‍ॅसेट इमìजग ब्लूचीप’ने अधिक गुंतवणूक लार्ज कॅप समभागात केली आहे.

Untitled-26

येत्या वर्षभराचा या फंडाचा परताव्याचा दर अन्य स्पर्धक फंडापेक्षा नक्कीच अधिक असेल. हा मिड कॅप फंड असल्याने जोखीम नियंत्रित करण्याच्या दृष्टीने हा फंड कुठल्याही एका समभागात पाच टक्क्यांहून अधिक गुंतवणूक करीत नाही ही विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. फेब्रुवारी महिन्याच्या गुंतवणूक विवरण पत्रानुसार औषध निर्मिती, बँका, वित्तीय सेवा, वाहन पूरक उद्योग, माहिती तंत्रज्ञान, ग्राहक पसंतीची उत्पादने, औद्योगिक वापराच्या वस्तू, तेल शुद्धीकरण, रसायने माध्यमे व मनोरंजन ही निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीसाठी पसंतीची असलेली प्रमुख उद्योग क्षेत्रे आहेत. ही यादी व अनुक्रमांक जानेवारी महिन्याच्या गुंतवणुकीच्या विवरणानुसार असल्याने व फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवडय़ांत बँकांच्या समभागात मोठी घसरण झाल्याने सद्य:स्थितीत क्रमवारी बदललेली असण्याची शक्यता आहे. अन्य फंड व्यवस्थापक वेगवेगळ्या कारणांनी नाकारत असलेले व सहसा न आढळणाऱ्या समभागांचा समावेश गुंतवणुकीत असल्याने निधी व्यवस्थापकाची गुंतवणुकीबाबतीत चिकित्सक वृत्ती दिसून येते. जसे की औषध निर्मितीक्षेत्रात सनोफी इंडिया, भांडवली वस्तू क्षेत्रातील व्हीएसटी टिलर व थरमॅक्ससारखे सहसा म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीत न आढळणारे किंवा गुंतवणुकीत असले तरी अल्प प्रमाणात असणारे, परंतु मागील दोन वर्षांत अव्वल परतावा दिलेले समभाग आहेत. गुंतवणुकीसाठी आघाडीची पसंती असलेले दहा समभाग गुंतवणुकीला स्थर्य प्रदान करतात. तर अल्प प्रमाणात असलेले परंतु आपली जबाबदारी चोख बजावलेल्या समभागामुळे मागील दोन वष्रे फंडाच्या परताव्याचा दर अव्वल राहिला आहे. फंड व्यवस्थापकांच्या मतानुसार २०१३ ते २०१६ दरम्यान मिडकॅप समभागांच्या किमतीत ज्या वेगाने वाढ दिसून आली त्या वेगाने यापुढे वाढ अपेक्षित नसल्याने गुंतवणूकदारांनी मिडकॅप फंडाची निवड काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. सध्या बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे मागील दोन वर्षांपासून कुंपणावर बसलेल्या गुंतवणूकदारांनी एसआयपी सुरू करण्याची संधी मिळाली आहे.

हा फंड मिडकॅप प्रकारचा फंड असल्याने एकाच वेळी गुंतवणूक करण्यापेक्षा दीर्घकाळ केलेली एसआयपी चांगला परतावा देऊ शकेल. सध्याची जगातील अनेक अर्थव्यवस्थांची परिस्थिती ध्यानात घेऊन एकूण गुंतवणुकीच्या पाच ते सात टक्क्यांहून अधिक रकमेची एसआयपी या फंडात करणे टाळावे असे सुचवावेसे वाटते.

थोडक्यात सांगायचे तर फंडाची मालमत्ता किंवा फंडाने दिलेला परतावा यापकी एकाच निकषाचा विचार न करता सर्वार्थाने विचार करूनच एसआयपीसाठी फंडाची निवड करावी.

shreeyachebaba@gmail.com