वसंत कुलकर्णी

समभाग गुंतवणूकदरांसाठी २०१९ हे वर्ष संस्मरणीय ठरले. या वर्षांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांचे पडसाद गुंतवणुकीवरील परताव्यात उमटले. भारतात लोकसभेच्या निवडणुका, निकालासंबंधाने अनिश्चितता, जागतिक व्यापार युद्ध, त्यामुळे प्रमुख आर्थिक निर्देशांकांत वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत वेगाने झालेली घट या परिणामी वर्षांरंभी निर्देशांकांचा प्रवास खालच्या दिशेने सुरू होता. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी फेब्रुवारीत गाठलेला तळ आणि निवडणुकांच्या निकालानंतर मे महिन्यांत सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श करणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीने अर्थसंकल्पानंतर पुन्हा दिशा बदल करीत सप्टेंबर महिन्यांत नीचांक गाठला. सरकारने अर्थसंकल्पापश्चात कंपनी करात केलेली कपात, स्थावर मालमत्ता उद्योगातील रखडलेल्या प्रकल्पांसाठी विशेष निधीची स्थापना यासारख्या उद्योग क्षेत्राला दिलासा देणाऱ्या घोषणांमुळे वर्षांच्या शेवटच्या तीन महिन्यांत सेन्सेक्सने झालेला तोटा दुप्पट वेगाने भरून काढला. या कारणांनी हे वर्ष मागील काही वर्षांतील सर्वात अस्थिर वर्ष ठरले. गुंतवणूकदारांची अवस्था ‘रोलर कोस्टर राइड’ घेणाऱ्यांसारखी झाली. त्याचे प्रतिबिंब ‘अ‍ॅम्फी’च्या मासिक आकडेवारीत उमटले. विक्रमी पातळीवर असलेल्या म्युच्युअल फंड मालमत्तेत समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडातील मुदतपूर्व बंद केलेल्या किंवा मुदतीनंतर नुतनीकरण न झालेल्या ‘एसआयपीं’ची महिन्यागणिक वाढती संख्या गुंतवणूकदारांचा विश्वास ढळल्याचे द्योतक आहे. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडातील एकरकमी गुंतवणुकीचे ओघ आटल्याचेही आकडेवारीत दिसून आले. नोव्हेंबरअखेरीस म्युच्युअल फंडांची मालमत्तेने सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली असली तरी मालमत्ता वाढीचा वृद्धीदर घटल्याचा निष्कर्ष ही आकडेवारी सांगत आहे. अर्थव्यवस्थेच्या मरगळलेल्या स्थितीचे प्रतिबिंब म्युच्युअल फंडाबाबतदेखील दिसून येते. मागील वर्षी फंड गुंतवणूकदारांच्या संख्येत १.३० कोटींची भर पडली याचे अप्रुप मानायचेच. पण मग २०१० सालच्या ११ महिन्यांत फंड गुंतवणूकदरांची संख्या ६२ लाखांनी वाढून ८.६५ कोटींवर गेली होती, हे कौतुकास्पद नव्हते काय?

या वर्षांत समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांपैकी लार्ज-कॅप फंड गटातील फंडांची कामगिरी उजवी ठरण्यास अनेक कारणे होती. त्या पैकी महत्वाचे कारण म्हणजे मोजक्या समभागांत झालेली गुंतवणूक हे होय. लार्ज कॅप फंड गटात २७ डिसेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार अ‍ॅक्सिस ब्लूचीप हा फंड सर्वाधिक परतावा देणारा फंड ठरला तर यूटीआय मास्टरशेअर, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचीप, आदित्य बिर्ला सनलाईफ फ्रंटलाईन इक्विटी. निप्पॉन लार्ज कॅप, एचडीएफसी टॉप १०० हे फंड क्रमवारीत तळाला आहेत. लार्ज कॅप समभागातील ध्रुवीकरणामुळे, मिड कॅप आणि मल्टी कॅप फंड परताव्याच्या क्रमवारीत मागे पडले. ज्या फंडांनी चांगला परतावा दिला आहे, अशा फंडांनी समभागकेंद्रित गुंतवणूक करण्याची जोखीम स्वीकारून परतावा मिळविला आहे. ज्या फंडांनी मानदंडाला अनुसरून गुंतवणूक केली अशा फंडातील गुंतवणूकदारांना मोठय़ा अपेक्षाभंगाला सामोरे जावे लागले. अग्रस्थानी असलेला अ‍ॅक्सिस ब्लूचीप फंडाने केवळ २५ समभागात गुंतवणूक केली आहे तर तळाला असलेल्या आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ६२ कंपन्यांत आहे. सरत्या वर्षांत सर्वच फंड गटात समभागकेंद्रित धोका पत्करणारे फंड अव्वल स्थानी, तर फंडाच्या मानदंडाशी साधम्र्य साधणारी गुंतवणूक असलेल्या फंडांची कामगारी निराश करणारी आहे. मिरॅ लार्ज कॅप फंडाने वर्षांच्या सुरुवातीला लावलेला धडाका पुढील काळात टिकला नाही. सप्टेंबरनंतर या फंडाच्या क्रमवारीत सातत्याने घसरण होत गेली. एलआयसी एमएफ लार्ज कॅप, पीजीआयएम इंडिया लार्ज कॅप सारख्या दुर्लक्षित फंडांची कामगिरी लक्षवेधी ठरली. कामगिरी सुधारात सातत्य राखत या फंडांनी प्रस्थापितांना मागे सारले. आयडीबीआय टॉप १०० या फंडाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवला. नवीन वर्षांत आयडीबीआय टॉप १०० आणि पीजीआयएम इंडिया लार्ज कॅप या फंडांच्या कामगिरीत चमत्कार घडू शकेल. मिड आणि स्मॉल कॅप फंड गटात परताव्याच्या क्रमवारीत, अ‍ॅक्सिस मिड कॅप अग्रस्थानी तर तळाला आदित्य बिर्ला मिड कॅप, एसबीआय मिड कॅप, एल अ‍ॅण्ड टी मिड कॅप हे फंड आहेत. अर्थमंत्र्यांच्या सप्टेंबरमधील घोषणेनंतर मिड आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये थोडे चतन्य आले तरीही १ जानेवारी २०१६ रोजी उपलब्ध मिडकॅप फंडांच्या एसआयपी कामगिरीचा विचार केला तर, अ‍ॅक्सिस मिडकॅप १२.५ टक्के परताव्यासह पहिल्या स्थानी, डीएसपी मिडकॅप ४.९४ टक्के परताव्यासह द्वितीय स्थानी तर तळाला आदित्य बिर्ला (-३.८७ टक्के) एसबीआय मिडकॅप (-२.९९ टक्के) हे फंड होते. ज्यांनी जानेवारी २०१७ मध्ये ‘एसआयपी’ला सुरुवात केली अशा २० मिड कॅप फंडांपैकी सात फंडातील गुंतवणूक आजही तोटय़ात आहे. सहा फंडांनी शून्य ते ३.५ टक्के परतावा दिला आहे तर आठ फंडांनी ३.८५ ते १२.५ टक्के या दरम्यान परतावा दिला आहे. स्मॉल कॅप फंड गटात, मागील एका वर्षांच्या परतावा क्रमवारीत, अ‍ॅक्सिस स्मॉल कॅप अग्रस्थानी तर आदित्य बिर्ला सनलाईफ स्मॉल कॅप फंड तळाला आहे.

ज्या वर्षांत भारतीय बाजारपेठत गुंतवणूक करणाऱ्या फंडाची कामगिरी चिंताजनक असताना आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या फंडांची कामगिरी चमकदार झाली आहे. विशेष म्हणजे भारतीय बाजारपेठत गुंतवणूक करणारे फंड आपल्या मानदंडापेक्षा उजवी कामगिरी करण्यासाठी कडवा संघर्ष करत असताना अमेरिकेसह चीन, जपान या सारख्या देशांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडाची कामगिरी उल्लेखनीय आहे. या फंड प्रकारात निप्पॉन इंडिया यूएस इक्विटी अपॉच्र्युनीटीज फंडाचा नक्कीच विचार करायला हवा.

देशांतर्गत गुंतवणूक करणाऱ्या लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मल्टी कॅप फंड गटात अ‍ॅक्सिस फंड घराण्यांच्या योजना अग्रस्थानी तर तळाला आदित्य बिर्ला फंड घराण्याच्या योजना आहेत. अव्वल कामगिरीमुळे वर्षांच्या सुरुवातीला अग्रस्थानी असलेले फंड वर्ष संपेपर्यंत परताव्यात सातत्य न राखता आल्यामुळे अग्रक्रम गमावून बसतात. आघाडीच्या फंडांचा गुंतवणुकीसाठी विचार करण्यापेक्षा नवीन वर्षांत आदित्य बिर्ला सनलाईफ फंड घराण्याच्या फंडांकडून सुधाराची अपेक्षा असल्याने गुंतवणुकीसाठी नवीन वर्षांत या फंड घराण्याचा विचार करावा. या वर्षीच्या क्रमवारीचे वैशिष्टय़ असे की, ज्या फंडांकडे मोठी मालमत्ता आहे असे फंड तळाला तर नवखे आणि कमी मालमत्ता असणारे फंड अग्रस्थानी राहिले. नवीन वर्षांत या चित्रात बदल होण्याची अपेक्षा असून जुने जाणते आणि मोठी मालमत्ता राखणारे फंड क्रमवारीत अग्रस्थानी येण्याचा प्रयत्न करतील. हे वर्ष अ‍ॅक्सिस आणि मिरॅ या फंड घराण्यांना चांगले गेले. तर आदित्य बिर्ला सनलाईफ आणि आयसीआयसीआय प्रूडेन्शियल या फंड घराण्यांच्या फंडांना मानदंडाइतपत सुद्धा कामगिरी करता आलेली नाही.

सरलेले वर्ष पुलंचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने पुलंच्या साहित्य संपदेतील पात्रांच्या सध्याच्या पिढीच्या माध्यमातून वेगवेगळ्या फंडांची शिफारस केली. ही सर्व मंडळी मनाला भावलेली आणि जनसामान्यांच्यात रुजलेली असल्याने आशय वाचकांपर्यंत नेण्यासाठी यापेक्षा योग्य साधन मिळाले नसते. काही फंड घराण्यांतील रोखे विश्लेषकांच्या कामचुकारपणा आणि निष्काळजीपणामुळे रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांना मोठा तोटा सहन करावा लागला. पुलंचे ‘रावसाहेब’ असते तर नक्कीच ‘भ’काराने सुरू होणाऱ्या शिवीने संबोधून करून म्हणाले असते, ‘‘तुमच्या फंडात पैसे तुमच्या बापाने गुंतविले नाहीत. लोकांच्या कष्टाचे पैसे आहेत. भो०*न उलटं टांगून ०**!’’ पुलंचे ‘रावसाहेब’ राहून गेल्याची खंत या निमित्ताने का होईना काही प्रमाणात कमी झाली, आणि या कामचुकार विश्लेषकांच्या वरचा राग पण निवळला.

shreeyachebaba@gmail.com