पण एक मात्र खरे की आपण शाश्वत अशा दीर्घकालीन तेजीच्या बाजारात आहोत. म्हणूनच हे अधूनमधून येणारे उतार खरे तर संधी हुकलेल्यांसाठी चालून आलेला योग ठरावा.
गेल्या तीसेक वर्षांचा मुंबई शेअर बाजार निर्देशांकाचा आढावा घेतला तर जाणवेल की लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीनंतर बाजारात तेजीची धारणा निर्माण होऊन निर्देशांकात दुपटीने वाढ झालेली आहे. सोबतच्या तक्त्यावरून नजर फिरविल्यास हे लक्षात येईल.
तक्त्यावरून स्पष्टपणे जाणवते की लोकसभेच्या निवडणुकानंतर स्थिर सरकार येऊन अर्थव्यवस्थेस चालना मिळणार हे गृहीत धरलेलं असतं. (देवेगौडाचा अपवाद वगळता).
या वेळेला मात्र लोकसभेच्या निवडणुकांअगोदरपासूनच बाजारात ‘तेजीचा वारु’ उधळला आहे. विशेषत: गेल्या वर्षीच्या २०१३च्या उत्तरार्धात चारपकी तीन राज्यांत भाजपला बहुमत मिळाल्यापासून तेजीला सुरुवात झाली. तेव्हा मुंबई शेअर बाजार निर्देशांक १९,३०० व निफ्टी ५,७०० वर होता. त्यानंतर निवडणूकपूर्व चाचण्यांनी व प्रत्यक्ष निकालांनी भर टाकून आतापर्यंत सेन्सेक्सने २६,३०० आणि निफ्टीने ७,८३५च्या शिखरापर्यंत मजल मारली आहे. सेन्सेक्समध्ये तब्बल सात हजार अंशांची तर निफ्टीमध्ये २,१०० अंशांची वाढ दिसून आली आहे.

अर्थातच ज्या गुंतवणूकदारांना या तेजीत सहभागी होता आले नाही, त्यांनी कुठल्या स्तरावर / पातळ्यांवर खरेदी करावी? व ही तेजी शाश्वत आहे ना? की आम्ही शेअर्स खरेदी केल्यावर मार्केट कोसळणार! वगैरे प्रश्न सतावत असतील. या पाश्र्वभूमीवर या तेजीचा संभाव्य उच्चांक काय असेल? व तो कधी गाठला जाईल (अवधी), याचा आढावा आपण मूलभूत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेऊ. प्रथमत: ही तेजी शाश्वत आहे, हा निष्कर्ष खालील दोन मुद्दय़ावरून स्पष्ट होईल.
१)    शेअर बाजारात नेहमी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. व लोकसभेच्या निवडणुकीनंतर तेजीची धारणा निर्माण होऊन एखाद- दोन वर्षांत निर्देशांक दुप्पट होतो. हे वरील तक्त्यातून आपण बघितले. आपल्याकडे आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. २००८ ते २०१३ या पाच वर्षांत सेन्सेक्ससाठी २१,२०६ व निफ्टीसाठी ६,३५७ या पातळ्या म्हणजे भरभक्कम अडथळा होत्या. पाच वर्षांत निर्देशांकांना हे उच्चांक ओलांडता आले नाहीत, पण आता तो अडसर दूर झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षांत संभाव्य उच्चांक हा २१,२०० च्या दुप्पट ४२,४०० च्या आसपास असेल व निफ्टीसाठी १२,७०० असेल (येणाऱ्या काही वर्षांमध्ये सेन्सेक्स ४०,००० होणार याची बाजारात वदंता होती त्याचे हे गणित.)
आता मूलभूत विश्लेषणाकडे (फंडामेंटल अॅनालिसिस) वळूया. यात आपल्याला ज्ञात असलेल्या आकडेवारीचाच आधार घेऊया.
गेल्या दहा वर्षांच्या नराश्यमय वातावरणातून येणाऱ्या १२ ते १८ महिन्यात अर्थव्यवस्था ‘कात टाकून’ फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयींच्या काळातलीच ज्ञात आकडेवारी घेऊ या. तेव्हा अर्थव्यवस्थेच्या विकासाचा अर्थात जीडीपी दर हा ८% होता. आताचा जीडीपी दर ४.९% वरून ८% वर जाणे म्हणजे ६०% वृद्धी होणे अपेक्षित आहे. जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा असल्याने इथे मी उद्योगधंद्याशी संबंधित अशा सेन्सेक्सच्या पी/ई (किंमत व उत्पन्न यांचे गुणोत्तर) व ईपीएस (प्रति समभाग उत्पन्न) यामध्ये अर्धीच म्हणजे जीडीपी दरात अपेक्षित ६०% वृद्धीच्या तुलनेत अर्धी म्हणजे ३०% गृहीत धरतो.  
आताचा सेन्सेक्स या निर्देशांकाचा पी/ई हा १५ पट आहे. त्यात ३०% वृद्धी म्हणजे ४.५ म्हणजे १५ + ४.५ = १९.५ भविष्यातील पी/ई असेल.
सेन्सेक्सचा आताचा ईपीएस हा १७३० आहे.  त्यात ३०% वृद्धी म्हणजे ५१९ अंकांची वाढ. म्हणजे १७३० + ५१९ = २२४९ असा  भविष्यातील म्हणजे पुढील दोन ते तीन वर्षांचा ईपीएस (फॉरवर्ड अìनग) असेल.
मूलभूत विश्लेषणांतर्गत येणाऱ्या दोन ते तीन वर्षांतील संभाव्य उच्चांक काय असेल त्याचा आढावा घेतला, जो बरोबर आपल्यावरील तक्त्याशी साम्य दर्शवतो. (निवडणुकांनंतर तेजीची धारणा निर्माण होऊन सेन्सेक्समध्ये दुपटीच्या घरात वाढ होण्याशी साम्यता दर्शवितो.)
दुसरा महत्त्वाचा मुद्दा  : किती अवधीत?  किती वर्षांत?  
तांत्रिक आलेखांवरच विसंबून राहायचे, तर दर आठ वर्षांनी निर्देशांकाचा नवीन उच्चांक प्रस्थापित होत असतो. ‘आठ वर्षांची सायकल’ असा शब्दप्रयोग त्यासाठी प्रचलित आहे. हे खालील तपशिलावरून स्पष्ट होईल.
वरील दोन गोष्टींनी आपली खात्री होईल की आपण शाश्वत अशा दीर्घकालीन तेजीच्या बाजारात आहोत व ‘घातक उतारांना सामोरे जाणे’ हे तर तेजीच्या बाजाराचे व्यवच्छेदक लक्षणच आहे. मग यासाठी कारणं म्हणजे अपुरा पाऊस, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय भू-राजकीय संकटे, जागतिक आर्थिक घडामोडी अथवा विशिष्ट कंपनीबद्दल अवास्तव अपेक्षा बाळगून प्रत्यक्ष निकालाने निराशा होणे वगैरे. या एक एक अथवा सर्वाचा एकत्रित परिणाम हा घातक उतारांमध्ये दिसू शकतो.
आता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या तेजीच्या वारूवर कधी स्वार व्हायचे अर्थात मार्केट खाली आल्यावर कुठल्या पातळ्यांवर खरेदी करायचे ते बघू या.
आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकांवर ७,४५० ते ७,५०० आणि सेन्सेक्ससाठी २५,०००चा (५० दिवसांची चलत सरासरी- ५० डीएमए) भरभक्कम आधार आहे. या स्तरावरून बाजार पुन्हा ७,८५०/ २६,४०० ला गवसणी घालण्याचा प्रयत्न करील व तो भरभक्कम अडथळा दूर करण्यात बाजार यशस्वी ठरले की निफ्टी निर्देशांक ८०५० ते ८१०० आणि सेन्सेक्सकडून २७,३०० ते २७,५०० चा नवा उच्चांक प्रस्थापित केला जाणे अपेक्षित आहे. येथे गुंतवणूकदारांनी प्रत्येक वरच्या पातळ्यांवर म्हणजे निफ्टीच्या ७८०० ते ८१०० दरम्यानच्या प्रवासात आपल्याजवळच्या २५-२५% समभागांची नफारूपी विक्री करावी.
कृपया या पातळ्यांवर नवीन समभागांची खरेदी करू नये.  कारण.
तांत्रिक विश्लेषणाच्या ‘डो’ संकल्पनेप्रमाणे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये एक उच्चांक अपेक्षित आहे. गेल्या वर्षी बरोबर २८ ऑगस्ट २०१३ रोजी निफ्टी ५,११८चा तर सेन्सेक्सने १७,४५० नीचांकाला फेर धरून, वर्तमान तेजीची सुरुवात झाली आहे. येत्या ऑगस्ट २०१४ ला या तेजीच्या आवर्तनाला एक वर्ष पूर्ण होत आहे.
गेल्या वर्षभरात सेन्सेक्सचे १०,००० अंक आणि निफ्टीचे ३,००० अंक हे फक्त ‘अपेक्षांवर’ वाढले. प्रत्यक्षात अपेक्षित अर्थव्यवस्थेतील विकास व वृद्धी आहे कुठे?  (अर्थव्यवस्थेचा रुतलेला गाडा विकासमार्गावर येण्याकरिता, नरेंद्र मोदी यांच्या नवीन सरकारला किमान १२ ते १८ महिने द्यायची नितांत गरज आहे).
येणाऱ्या तीन महिन्यांकरिता निफ्टी व सेन्सेक्सची अनुक्रमे ७,४५० ते ७,५००/ २५,००० ही ‘कल निर्धारण पातळी’ (ट्रेंड डिसायडर लेव्हल) राहणार आहे.  यावरती निर्देशांक म्हणजे तेजीची पालवी कायम आहे असे समजा. ज्या वेळेला ७,४५०/ २५,००० ला नकारात्मक छेद देऊन निर्देशांक खाली यायला सुरुवात होईल तेव्हा प्रथम ७,०५० ते ७,२०० / २३,५०० ते २३,८०० असा आधार असेल.  (गॅप व १०० डीएमए- १०० दिवसांची चलत सरासरी) व एकदा का निर्देशांक ७,००० / २३,५००च्याही खाली जायला लागला की, ६,५०० ते ६,८०० / २२,५०० ते २३,००० (२०० डीएमए- २०० दिवसांची चलत सरासरी आणि फिबोनासी फॅक्टरचे ५०%) वर मार्केट स्थिरावेल अथवा या स्थरावर दीर्घकालीन तेजीचा पाया रचला जाईल. आधी उल्लेखलेल्या प्रमाणे २०१६ ते २०१७ पर्यंत सेन्सेक्स ४० ते ४५ हजार आणि निफ्टी निर्देशांक १३ ते १५ हजारांवर झेपावेल ही अपेक्षा.

तेजीचे आठ वर्षांचे चक्र
साल        उच्चांक व त्याचा तपशील
१९९२    हर्षद मेहताची तेजी : सेन्सेक्सचा उच्चांक ४,५४६;
               नंतर घोटाळा बाहेर आल्यावर बाजार कोसळला.
२०००     ‘डॉट कॉम’चा फुगा :  सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्यांची         
               उदा. इन्फोसिस, सत्यम, विप्रो ऐतिहासिक उच्चांकावर,     सेन्सेक्सचा उच्चांक ६,१५०
२००८     जागतिक महामंदीच्या अगोदर १० जानेवारी २००८ ला   सेन्सेक्सकडून २१,२०६ चा  उच्चांक
२०१६      आता आपण २०१४ मध्ये आहोत आणि तांत्रिक व मूलभूत विश्लेषणाच्या आधारे २०१६ मध्ये
              ४०,००० च्या आसपास  उच्चांक अपेक्षित.  

महत्त्वाची सूचना:  येत्या दिवसांत निर्देशांकाची संभाव्य वाटचाल कशी असेल याचा वेध लेखात घेण्यात आला आहे. लेखातील अनुमानांच्या आधारे खरेदी-विक्री यापैकी कोणत्याही व्यवहाराचा निर्णय तज्ज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनाने घेणे उचित ठरेल व त्याची संपूर्ण जबाबदारी पूर्णपणे संबंधित वाचकाची असेल.