सचिन रोहेकर

खरोखरच अतिशय रंजक काळातून आपली वाटचाल सुरू आहे. निराशा, हताशा आहेच. पण बरोबरीने उद्याच्या नव्या, अतिशय वेगळ्या जगाबाबत उत्कंठाही आहे. काहीशा सक्तीने, परंतु नि:शंकपणे आपण काही नव्या गोष्टी स्वीकारू लागलो आहोत. किंबहुना स्वीकारल्या आहेत. आपल्या सामाजिक वर्तन आणि कार्यशैलीत वेगवान बदल या काळाने घडवून आणलाच आहे. इतकेच नाही तर अनेक आस्थापनांना त्यांच्या कार्यपद्धतीत सुव्यवस्थित बदलाचा मार्गदेखील या काळाने मिळवून दिला आहे. काळाचीच देण असलेल्या आणि आजवर अपरिचित राहिलेल्या या बदलांमधून, व्यवसायाची संधी शोधणारे कर्तबगारही आहेतच. विरल आणि दिशा डॉक्टर हे मुंबईकर दाम्पत्य त्यापैकीच एक. आडनावाप्रमाणे महानगरवासीयांसाठी ही मंडळी उपलब्ध जागेचे विशारद म्हणून भूमिका बजावत असून, घरातील किंवा कार्यालयातील इंच इंच जागा सार्थकी लावण्याच्या शहरवासीयांच्या प्रयत्नालाच त्यांनी व्यवसायाचे रूप प्रदान केले आहे.

स्थानांतरण असो किंवा घराचे नूतनीकरण, कुटुंबातील नवीन सदस्यासाठी जागा तयार करणे असो किंवा जुन्या फर्निचरची सुरक्षितता राखणे – कारणे काहीही असली आणि गरज अल्पावधीची अथवा दीर्घ कालावधीची असली तरी त्यावर यांच्याकडे तोडगा आहे. विरल आणि दिशा डॉक्टर यांनी २०१७ मध्ये सुरू केलेल्या ‘योर स्पेस डॉक्टर’ नावाच्या व्यावसायिक उपक्रमाचे हे वैशिष्टय़च आहे. विकसित राष्ट्रांमध्ये रुळलेल्या ‘स्वयं भांडारण’ (सेल्फ स्टोरेज) अर्थात तात्पुरती साठवण गरजेवरील उपाययोजनेचे हे भारतीय रूप आहे.

सध्याची करोना आजारसाथ आणि लगोलग आलेल्या टाळेबंदीचा स्थानांतरण हा एक न टाळता येणारा परिणाम दिसला आहे. हातावर पोट असणाऱ्यांचेच नव्हे तर अनेक पांढरपेशा सुस्थित नोकरदारांनाही या स्थानांतरणाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अनेकांची कार्यस्थळे बदलली आहेत, तर अनेकांना घरातून काम करणे क्रमप्राप्त ठरले आहे. परिणामी अनेक कंपन्यांनी त्यांची कार्यालये हलविली, तर काहींनी कमी अथवा पूर्ण बंदच करून टाकली. घरातून काम करण्यामुळे बरेच कर्मचारी आपले मुंबई, पुण्यातील महागडे घर मालकाला परत देऊन आपापल्या गावी जाऊन काम करू लागले आहेत. या प्रत्येकाच्या सामानाचा प्रश्न या कंपनीने सोडवला आहे. अनेक व्यावसायिक, ऑनलाइन विक्रेते, लघुउद्योजक यांना त्यांची उत्पादने, वस्तू व सामग्री तात्पुरती सुरक्षित ठिकाणी राखून, ‘इन्व्हेंटरी मॅनेजमेंट’ची सेवाही योर स्पेसने टाळेबंदीच्या काळात दिली. जी त्यांना खूपच मदतकारकही ठरली. मागील काही महिन्यांत मागणीतील तिपटीने झालेली वाढ या सेवेची उपयुक्तता सिद्ध करते, असे दिशा डॉक्टर यांनी सांगितले. त्यांची ही कंपनी सध्या मुंबई, नवी मुंबई, पुणे, बडोदे या शहरांमध्ये आठ गोदामांद्वारे ही सेवा देत आहे.

कोणाची दुसऱ्या शहरात बदली झाल्यास घरातील सर्व सामान बरोबर घेऊन जाणे शक्य नसते. अशा वेळेला मागे राखलेले सामान सुरक्षित राहू शकेल अशी थोडी जागा कोणाकडून तरी मिळावी, अशी त्यांची धडपड असते. वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी- कामकऱ्यांना सुट्टीत आपल्या गावी परतताना तेवढय़ा दिवसापुरते सामान कुठे ठेवावे हा प्रश्न पडत असतो. कोणी परदेशात स्थलांतरित होत असेल तर घरातील सामान, दुचाकी, चारचाकी कुठे ठेवावी हा प्रश्न पडतो. घरात डागडुजीचे किंवा रंगकाम चालू झाले तर घरातील किमती सामान खराब होऊ नये म्हणून हे सामान कुठे ठेवावे, हा प्रश्न पडतो. अशा अनेक प्रसंगांमध्ये आपल्याला अतिरिक्त जागेची गरज भासते.

दस्त जतनाच्या क्षेत्रातील (ईसीआय रेकॉर्डस) धंद्याच्या वीस वर्षांच्या अनुभवातूनच डॉक्टर दाम्पत्याला या नवीन व्यवसायाची कल्पना सुचली. यामध्ये ग्राहकाला हवी तेवढी जागा हव्या तेवढय़ा काळासाठी भाडय़ाने दिली जाते. भाडेपट्टीने जागा म्हटली म्हणजे दलाली, अनामत (डिपॉझिट) स्वरूपात मोठी रक्कम ठेवावी लागते. योर स्पेस मात्र अशा कशाचीही मागणी करीत नाही. ग्राहकाला त्याच्या सामानाने व्यापलेली जागा आणि वापराच्या काळापुरतेच भाडे द्यावे लागते. अगदी प्रति चौरस फुटाला ९९ रुपये किमान भाडे दरमहा आकारून ही सेवा दिली जाते.

ग्राहकांकडून त्यांचे सामान त्यांच्यासमोर व्यवस्थित खोक्यांमध्ये भरून प्रत्येक सामानाला बार कोड लावले जातात आणि त्याचे फोटो काढले जातात. हे फोटो ग्राहकालाही दिले जातात. हे सामान गोदामात आणले जाते आणि चिन्हांकित केलेल्या जागेत ठेवले जाते. या गोदामात देखरेखीसाठी कॅमेरा, कीटक नियंत्रण व्यवस्था वगैरेसह, गरजेप्रमाणे तापमान आणि हवेतील आद्र्रतेचे प्रमाण सुनियंत्रित करणारी सुविधाही पुरविली जाते. सामानाबाबत हयगय अथवा मोडतोड वा नुकसान होणार नाही, याची खातरजमा करण्यासाठी ग्राहकाला विम्याचे संरक्षण मिळविण्याचा पर्यायही दिला जातो. हे सर्व व्यवहार कंपनीच्या वेबस्थळावर जाऊन ग्राहक घरबसल्या करू शकतो. वेबस्थळावर ग्राहकाला कंपनीविषयी, दिल्या जाणाऱ्या सेवेविषयी, आकारल्या जाणाऱ्या शुल्काविषयी सर्व माहिती पारदर्शी स्वरूपात मिळते. आपल्या घरातील सामान ठेवायला किती जागा लागेल हेसुद्धा ‘स्पेस कॅल्क्युलेटर’द्वारे जाणता येते. ग्राहक आपल्या सामानाची गोदामाला केव्हाही भेट देऊन तपासणी करू शकतो. ग्राहकाला हवे तेव्हा हे सामान परत त्याच्या घरी पोहोचवले जाते.

स्थानिक स्तरावरील मूव्हर्स अँड पॅकर्सच्या सेवांचे हे विस्तारित व मूल्यवर्धित रूप आहे, असे दिशा डॉक्टर सांगतात. अर्थात ‘सेल्फ स्टोरेज’ व्यवसायाची संकल्पना आपल्यासाठी अभिनव असली तरी विकसित पश्चिमी राष्ट्रांमध्ये ते तेथील लोकांच्या गतिमान जीवनशैलीचा एक अविभाज्य हिस्साच आहे, असे त्या सांगतात. टाळेबंदीच्या गत सहा महिन्यांत मागणीतील वाढ पाहता, कंपनीने गोदाम क्षेत्रफळ १०,००० चौरस फुटांवरून, तिपटीने वाढवून ३२,००० चौरस फुटांवर नेले. काळाची अपरिहार्य गरज म्हणून आलेले हे व्यावसायिक परिवर्तन म्हणता येईल. तरी वाढते नागरीकरण पाहता कोणत्याही काळासाठी लागू पडणारी ही अत्यावश्यक गरज राहणार असून, येत्या काळात गोदाम क्षेत्रफळात आणखी विस्ताराचे आणि नव्या शहरांमध्ये प्रवेशाचे कंपनीचे नियोजन आहे. काळाच्या बदललेल्या प्रवाहात उदय पावलेला हा व्यवसाय काळाच्या ओघात टिकून राहील, हा विश्वास या नियोजनामागे आहे.

विरल आणि दिशा डॉक्टर                     

योर स्पेस डॉक्टर

* व्यवसाय :   सेल्फ स्टोरज

* कार्यान्वयन : २०१७  साली

* गोदाम क्षेत्रफळ (२०१७) : २,००० चौरस फूट

* सध्याचे गोदाम क्षेत्रफळ        : ३ २,००० चौरस फूट

* सध्याची उलाढाल : वार्षिक १ कोटी रुपये

* रोजगार निर्मिती :  १५५ कामगार