एस्सेल समूहाची झी लर्न ही शिक्षण क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी असून ‘के-१२’ (केजी ते बारावी) शिक्षण प्रकारामध्ये अग्रणी आहे. माऊंट लीटेरा झी स्कूल आणि आशिया खंडातील एक मोठी प्री स्कूल ‘किड्झी’ हे कंपनीचे यशस्वी प्रकल्प म्हणावे लागतील. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण देणाऱ्या माऊंट लीटेरा झी स्कूलच्या देशभरात ८० शहरांतून ९० शाळा असून किड्झीची सुमारे १५०० केंद्रे भारतातील ५५० हून अधिक शहरात आहेत. आपली वाढती लोकसंख्या पाहता सध्या जगातील सर्वात मोठा ‘के-१२’ विद्यार्थी घटक भारतात आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत देशांतर्गत शिक्षणाचे महत्त्वही वाढले असून आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतीनुसार शिक्षणाचा दर्जा तसेच शिक्षण क्षेत्रही वेगात विस्तारत आहे. या प्रक्रियेत प्री स्कूल तसेच प्ले स्कूल, ई लर्निग आणि चांगल्या खासगी शाळा यांचे महत्त्व सर्वच शहरातून वाढताना दिसते. महापालिका आणि सरकारी शाळांची दुरवस्था पाहता दर्जेदार शिक्षणासाठी खासगी शाळा वाढत जाणार हे नक्की. झी लर्नसारख्या कंपन्यांना याचा फायदा न झाला तरच नवल. डिसेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ३०.४८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६.४५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला असून तो गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी अधिक आहे. हे निष्कर्ष पाहता, आगामी कालावधीतही कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. येत्या दोन वर्षांत कंपनीची उलाढाल आणि नफ्याचे प्रमाण दुपटीवर जाण्याची शक्यता आहे. काळाची पावले ओळखून शिक्षण क्षेत्रात योग्य वेळी पदार्पण करणाऱ्या काही मोजक्या कंपन्यांमध्ये झी लर्नचा समावेश करावा लागेल. एस्सेल समूहाचे उत्तम व्यवस्थापन, प्रवर्तकांची यशस्वी कारकीर्द आणि गुंतवणूक पाठिंबा पाहता या क्षेत्रातही या समूहाची ही कंपनी बाजी मारणार हे निश्चित. येत्या अर्थसंकल्पात देखील शैक्षणिक क्षेत्रासाठी खास तरतूद येण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी मध्यम ते दीर्घकालीन धारणेसाठी या स्मॉल कॅपचा नक्की विचार करावा.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.