माझा पोर्टफोलियो : मालमत्ता व्यवस्थापनातील विश्वासार्हता

सध्या बाजारातील अभूतपूर्व तेजीमुळे शेअर बाजार आणि संबंधित गुंतवणूक साधंनांकडे ग्राहक वर्ग झपाटय़ाने वाढत आहे.

अजय वाळिंबे

गेल्याच आठवडय़ात भांडवली बाजारात सूचिबद्ध झालेली ‘आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी लिमिटेड’ (एबीएसएएमसी) ही १९९४ मध्ये स्थापन झालेली म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपनी असून तिची स्थापना आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि सन लाइफ एएमसी यांचा संयुक्त उपक्रम म्हणून केली गेली आहे. कंपनी प्रामुख्याने म्युच्युअल फंड सेवा, पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा, ऑफशोअर आणि गृहनिर्माण व्यवसायात आहे.

भारतातील पहिल्या चार मोठय़ा मालमत्ता व्यवस्थापन कंपनीमध्ये गणना होणाऱ्या या कंपनीकडे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत म्युच्युअल फंड (फंड ऑफ फंड्स योजना वगळता), पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा, ऑफशोअर आणि गृहनिर्माण या अंतर्गत एकूण २७३६.४३ अब्ज रुपयांची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) आहे. उपलब्ध माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०२० पर्यंत कंपनीने ३५ समभागसंलग्न (इक्विटी), ९३ रोखेसंलग्न (डेट), ५ ईटीएफ, ६ एफओएफ आणि २ लिक्विडसह सुमारे १३५ योजना व्यवस्थापित केल्या आहेत. कंपनीने कामकाजाचे अनेक पैलू स्वयंचलित आणि डिजिटल केले आहेत, ज्यात ग्राहक ऑनबोर्डिग, ऑनलाइन पेमेंट, निधी व्यवस्थापन, व्यवहार, लेखा, ग्राहक सेवा, डेटा विश्लेषण आणि इतर कार्ये यांचा समावेश आहे.

कंपनीने नुकतेच प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) बाजारात आपले समभाग सूचिबद्ध केले असून ते सध्या आयपीओपेक्षा कमी भावात म्हणजे साधारण ७०० रुपयांना उपलब्ध आहेत. प्रतिशेअर ७०७ रुपये अधिमूल्याने हे समभाग विक्रीस खुले झाले होते. मात्र या आयपीओची रक्कम कंपनीकडे जाणार नसून ती प्रवर्तकांनी त्यांचा हिस्सा विकल्यामुळे त्यांच्याकडे जाणार आहे. इतर आयपीओच्या तुलनेत या कंपनीच्या आयपीओला तितकासा चांगला प्रतिसाद मिळाला नाही तसेच पाहिल्याच दिवशी हा शेअरदेखील वितरित केलेल्या किमतीच्या (ऑफर प्राइस) खालीच नोंद झाला.

आदित्य बिर्ला समूहासारख्या अनुभवी प्रवर्तकांसह, विश्वासार्ह नाममुद्रा आणि भारतातील सर्वात मोठी बँकेशी संलग्नता नसलेली ही मालमत्ता व्यवस्थापन कंपनी उत्तम-वैविध्यपूर्ण उत्पादन, पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि नावीन्यपूर्ण योजनांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या बाजारातील अभूतपूर्व तेजीमुळे शेअर बाजार आणि संबंधित गुंतवणूक साधंनांकडे ग्राहक वर्ग झपाटय़ाने वाढत आहे. याचा चौथ्या क्रमांकावर असलेल्या आदित्य बिर्ला एएमसीला नक्की फायदा होईल. याच क्षेत्रात मोडणाऱ्या एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट, निप्पॉन एएमसी आणि यूटीआय एएमसीला शेअर बाजारात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सध्या ‘आयपीओ’ किमतीच्या खाली उपलब्ध असलेला हा समभाग मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून आकर्षक वाटतो.

आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी

(बीएसई कोड – ५४३३७४)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ६९७/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ७२१/६७२

बाजार भांडवल : रु. २०,०७८ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १४४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ८६.५०    

परदेशी गुंतवणूकदार *    —       

बँक/ म्यु. फंड/ सरकार * —       

इतर/ जनता *   —

* अनुपलब्ध

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    : लार्ज कॅप

* प्रवर्तक       : आदित्य बिर्ला कॅपिटल सनलाइफ (इंडिया) इन्क

* व्यवसाय क्षेत्र  :  मालमत्ता व्यवस्थापन

* पुस्तकी मूल्य : रु. ५९.२

* दर्शनी मूल्य : रु. ५/-

* गतवर्षीचा लाभांश : —

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :        रु. १८.२४

*  पी/ई गुणोत्तर :      ३८         

*  समग्र पी/ई गुणोत्तर : २४.३

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.०३

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    १०.४

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : ४४.६

*  बीटा :      ५.२

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aditya birla sun life amc company profile zws

Next Story
‘अर्थ’पूर्ण : जेवढय़ा लवकर सुरू कराल तेवढे चांगले!
ताज्या बातम्या