|| आशीष ठाकूर

वर्षसांगतेच्या लेखात उल्लेख केलेले निर्देशांकाचे वरचे लक्ष्य म्हणजे सेन्सेक्सवर ४८,००० आणि निफ्टीवरील १४,०००चे लक्ष्य सरलेल्या सप्ताहात साध्य झाले. आजच्या लेखात आपण निर्देशांकाच्या वाटचालीचा प्रथम तिमाहीतील – जानेवारी ते मार्च आणि नंतर वार्षिक आढावा घेऊ या.

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाचा संभाव्य उच्चांक हा सेन्सेक्सवर ४८,१२१ ते ४८,९०० आणि निफ्टीवर १४,१०० ते १४,३०० असा असेल. ही तेजीची कमान अर्थात सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अनुक्रमे ४५,९८९ आणि १३,४५४ या पातळ्यांवर आधारलेली असेल. किंबहुना हा स्तर निर्देशांकाच्या तेजी – मंदीच्या वाटचालीच्या दृष्टीने ‘महत्त्वाचा वळणबिंदू – महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ असेल. भविष्यात हा स्तर राखण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास निर्देशांकांचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४३,८५७ आणि निफ्टीवर १२,८०८ असे असेल.

आताच आपण येणाऱ्या दिवसातील निर्देशांकाचे वरचे, खालचे लक्ष्य, तसेच तेजी-मंदीच्या दृष्टीने महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तराचा आढावा घेतला. वाचकांच्या दृष्टीने कळीचा प्रश्न या आकडेवारीच्या निष्कर्षांप्रत आपण पोहचलो कसे? तर ही ‘हवेतून आलेली आकडेवारी’ निश्चितच नाही. किंबहुना या प्रक्रियेत वाचकांनाच सहभागी करून घेतले तर..
तांत्रिक विश्लेषणातील विविध प्रमेयांचा साध्या, सोप्या भाषेत, तसे ज्ञात आकडेवारीच्या आधारे निर्देशांकाचे वरचे, खालचे लक्ष्य समजून घेण्याचा आज प्रयत्न करू या. या विविध विषयांच्या खोलात शिरण्यापूर्वी सरलेल्या सप्ताहातील निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स: ४७,८६८.९८
निफ्टी : १४,०१८.५०

प्रथम सेन्सेक्सवरील ४५,९८९ आणि निफ्टीवर १३,४५४ हा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर कसा काढला हे जाणून घेण्यासाठी सोमवार, २१ डिसेंबर २०२०चा दिवसांतर्गत उच्चांक आणि नीचांक केंद्रिभूत मानू या. त्यानुसार सेन्सेक्स आणि निफ्टीवरील उच्चांक सेन्सेक्सवर ४७,०५५ आणि निफ्टीवर १३,७७७ होता, तर त्याच दिवसाचा नीचांक सेन्सेक्सवर ४४,९२३ आणि निफ्टीवर १३,१३१ असा होता. २१ डिसेंबरचा दिवसांतर्गत उच्चांक आणि नीचांकातील फरक हा सेन्सेक्सवर २,१३२ अंशाचा (४७,०५५ उणे ४४,९२३) आणि निफ्टीवर ६४६ अंशाचा (१३,७७७ उणे १३,१३१)आहे. आता सेन्सेक्सवरील २,१३२ अंशांचे अर्धे १,०६६ अंश तर निफ्टीवर ६४६ अंशाचे अर्धे ३२३ अंश येतात.

सेन्सेक्सच्या २१ डिसेंबरच्या नीचांकात ४४,९२३ मध्ये १,०६६ अंश मिळवले असता ४५,९८९ आणि निफ्टीवर १३,१३१ च्या नीचांकात ३२३ अंश मिळवले असता १३,४५४ हा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर आपल्याला अवगत झाला.
आता निर्देशांकांच्या वरच्या लक्ष्यासाठी, आपण काढलेला महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर सेन्सेक्सवर ४५,९८९ आणि निफ्टीवर १३,४५४ केंद्रिभूत मानला पाहिजे. त्यामध्ये २१ डिसेंबरच्या दिवसांतर्गत उच्चांक आणि नीचाकांतील फरक हा सेन्सेक्सवर २,१३२ अंशाचा आणि निफ्टीवर ६४६ अंश मिळवले असता, सेन्सेक्सवर ४८,१२१ (४५,९८९ अधिक २,१३२ अंश) आणि निफ्टीवर १४,१०० (१३,४५४ अधिक ६४६ अंश) हे संभाव्य उच्चांक दृष्टिपथात येतात.

वरील सर्व संकल्पना या तांत्रिक विश्लेषणातील ‘फेबुनासी फॅक्टर’ या प्रमेयात येतात. ही संकल्पना साध्या, सोप्या भाषेत आज आपण जाणून घेतली. पुढील लेखात निर्देशांकाचे खालचे लक्ष्य व कालमापन पद्धत विस्ताराने जाणून घेऊ या.
आता आपण गुंतवणूकदारांच्या आवडत्या समभागांचे निकालपूर्व विश्लेषण जाणून घेऊ या.

१) इन्फोसिस लिमिटेड
० तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १३ जानेवारी २०२१
० १ जानेवारीचा बंद भाव- १,२६०.४० रु.
० निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर -१,२२० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,२२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,३०० द्वितीय लक्ष्य १,३५० रुपये.
ब) निराशादायक निकाल : १,२२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,१५० रुपयांपर्यंत घसरण.
२) विप्रो लिमिटेड
० तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १३ जानेवारी २०२१
० १ जानेवारीचा बंद भाव – ३८७.९५ रु.
० निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३७० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४०५ रुपये, द्वितीय लक्ष्य ४३० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ३७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३५० रुपयांपर्यंत घसरण.

– लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.