या तिघी..! अन् त्यांचा गुंतवणूक परीघ

आजकाल बहुतेक जणांचे नोकरीला लागण्यापूर्वी बचत खाते उघडलेले असते.

कवी केळकर (२६) ही अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवीनंतर भारतातील एका बहुव्यवसाय असलेल्या उद्योग समूहांत प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून मागील वर्षी नोकरीला लागली. प्रशिक्षण कालावधी संपून आता तेथेच नियमित नोकरी सुरू झाली आहे. नोकरीच्या सुरुवातीचे नव्हाळ्याचे दिवस संपल्याने चार पैसे खात्यात जमा होऊ  लागले आहेत. कवीच्या आई केतकी केळकर या एका राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीला आहेत. कवी तिची आई, बाबा किरण केळकर आणि आजी कुसुम जोशी (आईची आई) असे चारजणांचे हे कुटुंब. वडील व्यावसायिक आहेत. कवीच्या आईने आपल्या बचतीचे नियोजन बँकांच्या मुदत ठेवी, आवर्ती ठेव योजना आणि राष्ट्रीयीकृत कंपनीच्या विमा योजनांपुरती सीमित ठेवले होते. कालानुरूप अर्थविषयक मानसिकता आणि गुंतवणूक साधनेसुद्धा बदलायला हवीत हे पुरते जाणलेल्या केतकी केळकर यांनी घरातील तिघींच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली.

एखाद्या तरुण अथवा तरुणीने नोकरीला लागल्याचे विमा विक्रेते, म्युच्युअल फंड विक्रेते यांच्या नजरेतून सहसा सुटत नाहीत. त्यांनी ते विकत असलेली उत्पादने घ्यावीत यासाठी आग्रही असतात. तसेच कवी केळकरशीसुद्धा अनेक जणांनी संपर्क साधला. केतकी केळकर ‘लोकसत्ता’च्या वाचक असल्याने, आधी नियोजन नंतर गुंतवणूक असा त्यांचा सुज्ञ पवित्रा आहे. त्यांच्या भूमिकेनुरूप नियोजनाचे दायीत्व हाती घेतले. कवीची गुंतवणुकीची पाटी कोरी असल्यामुळे योग्य ते नियोजन करता आले. सामान्यपणे असे आढळून येते की भेटणारा पहिला विमा विक्रेता मोठय़ा रक्कमेचा हप्ता असलेली, (विमा छत्र नव्हे) योजना गळ्यात मारून जातो. असे घडल्यास आर्थिक नियोजनास फारसा वाव राहात नाही. कवीच्या बाबतीत सुदैवाने असे काही घडले नाही.

नियोजनाची सुरुवात म्हणून पहिले पाऊल मुदतीच्या जीवन विम्याने पडणे गरजेचे असते. कवीला मिळवती होऊन दीड वर्ष झाले आहे आणि तिचे उत्पन्न पाहता, तिला १ कोटी विमा छत्र असलेला आणि ३५ वर्षे मुदतीचे विमा कवच मिळू शकेल. नियोजनाची दुसरी पायरी म्हणजे आरोग्य विमा. कवीला तिच्या कार्यालयाकडून जरी आरोग्य विम्याची सुविधा असली तरी तिची स्वत:ची एक आरोग्य विमा पॉलिसी असावी.

आजकाल बहुतेक जणांचे नोकरीला लागण्यापूर्वी बचत खाते उघडलेले असते. आज बचत खात्याइतकेच म्युच्युअल फंड खाते (फोलिओ) असणे गरजेचे आहे. नोकरीला लागल्यावर पहिला पगार झाल्यावर सर्वप्रथम हा पगार लिक्विड फंडात जायला हवा. आणि गरजेनुसार लिक्विड फंडातून पैसे काढून घेण्याची सवय लागायाला हवी. सुरुवातीपासून ही सवय लागली की अतिरिक्त रक्कम बचत खात्यात शिल्लक राहात नाही. त्यामुळे बचत खात्याइतका लिक्विड फंडसुद्धा महत्त्वाचा आहे.

कवी पहिल्या पगारापासून आयकर करदाती असल्याने करनियोजन हा आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा घटक आहे. आयकराच्या कलम ८० (सी) खाली मिळणाऱ्या सवलतींचा फायदा घेताना स्वत:च्या संपत्तीनिर्मितीचा कवीने विचार करायला हवा. सध्या उपलब्ध असलेल्या करविषयक तरतुदीनुसार कवीने जास्तीत जास्त दोन लाखांची गुंतवणूक करायला हवी. आयकर कायद्याच्या कलम ८०(सी) खाली उपलब्ध असलेल्या तरतुदीनुसार कवीची सर्वाधिक गुंतवणूक कंपनीकडून थेट कापल्या जाणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफमध्ये होत आहे. कवीला प्रस्तावित केलेल्या मुदतीच्या आरोग्य विम्याचा हप्ता कलम ८०(सी) खालील तरतुदीनुसार कर वजावट प्राप्त आहे. या दोन गोष्टी मिळून एक लाख रुपयांची गुंतवणूक होते. उर्वरित ५० हजारांसाठी ईएलएसएस फंडाचा विचार करावा. न्यू पेन्शन स्कीम अर्थात एनपीएस खाते उघडून वार्षिक ५० हजार रुपये टियर-१ खात्यात भरल्यास या गुंतवणुकीवर अतिरिक्त कर वजावट मिळू शकेल. अशा प्रकारे एकूण ७० हजार रुपये कर वाचविता येणे शक्य आहे.

भविष्यात आणखीही कर वाचविण्यासाठीचे पर्याय उपलब्ध होतील. जसे की विवाहापश्चात घर घेणे, अपत्यप्राप्तीनंतर पाल्याच्या शैक्षणिक शुल्क कर वजावटीस प्राप्त आहे. त्यावेळी एनपीएस आणि ईएलएसएस यांचा समतोल साधावा लागेल.

आता कवीच्या काही आर्थिक ध्येयांकडे वळूया. वडिलांची गाडी असली तरी कवीला दोन वर्षांत स्वत:ची मोटार घ्यायची आहे. कवी यासाठी रक्कम जमवत आहे. म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना या ‘नो लोड’ प्रकारच्या म्हणजे निर्गमन शुल्क न आकारणाऱ्या असतात. यापैकी एक योजना निवडून या योजनेत ‘एसआयपी’ करावी.

पहिल्या पगारापासून निवृत्ती नियोजन करायला हवे. ‘एनपीएस’ खाते उघडण्यामागचा मुख्य उद्देश कर वजावट हा आहे. महागाईवर मात करायची असेल तर समभाग गुंतवणूक असणाऱ्या फंडात ‘एसआयपी’ करायलाच हवी. निवृत्तीपश्चात उदरनिर्वाहासाठी निधी संकलनासाठी पगाराच्या किमान १० टक्के गुंतवणूक ही दीर्घकालीन असायला हवी. समभाग गुंतवणूक करणारे फंड हे संपत्तीची निर्मिती करतात. तरुण वयात गुंतवणुकीतील जोखीम स्वीकारणे शक्य असल्याने बँकेच्या मुदत ठेवी आवर्ती ठेवी यांना नियोजनात स्थान नकोच. महागाईवर मात करायची असेल तर म्युच्युअल फंडातील समभागसंलग्न (इक्विटी) योजनेत ‘एसआयपी’च्या मदतीने महागाईवर मात करून आपल्या बचतीची क्रयशक्ती टिकवून ठेवता येते. यासाठी दोन ते तीन म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’ सुरू करवी. वेळोवेळी नियोजन आणि गुंतवणुकीचा आढावा घेणे गरजेचे आहे.

केतकी केळकर (५२) वर्षांच्या असून सेवा निवृत्तीस अद्याप आठ वर्षे शिल्लक आहेत. कर नियोजनाच्या दृष्टीने त्यांनी खरेदी केलेल्या विमा योजना कर बचत करीत असल्या तरी या योजना संपत्ती नियोजनाच्या दृष्टीने कुचकामी आहेत. अशा योजना खरेदी करणे म्हणजे आपल्या कष्टाच्या पैशाने विमा विक्रेत्याला मालामाल करण्यासारखे आहे. केतकी यांनी खरेदी केलेल्या पॉलिसीचा शेवटचा हप्ता सेवानिवृत्तीपश्चात दोन वर्षांपर्यंत भरावयाचा आहे. सेवा निवृत्तीपश्चात हे विकतचे दुखणे घेण्यात काय हशील आहे? केतकी या राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करीत असल्याने त्यांना सेवा निवृत्तीवेतन असल्याने त्यांनी बचतीची क्रयशक्ती टिकविण्याची आवश्यकता आहे. सर्वात मोठा धोका असलेल्या महागाईवर मात करण्यासाठी समभाग गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत असणे गरजेचे आहे. आजच्या घडीला तुमच्या गुंतवणुकीतच नव्हे तर कुटुंबाच्या गुंतवणुकीत समभाग गुंतवणूक शून्य आहे. तुमच्यासारखी अनेक कुटुंबे आहेत जी समभाग गुंतवणुकीला आपला शत्रू मानतात. खरे तर निश्चित उत्पन्न देणारी मुदत ठेव, आवर्ती ठेव विमा योजना यांसारख्या गुंतवणूक साधनांना एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गुंतवणुकीत स्थान नको. परंतु बँकांच्या ठेवी आणि पोस्टाच्या योजना यांच्यातील सुरक्षिततेला प्राधान्य देताना महागाईच्या धोक्याकडे कायम दुर्लक्ष केले जात असते. एखाद्याच्या गुंतवणुकीत समभाग गुंतवणूक किती हवी याचे उत्तर १०० वजा त्या व्यक्तीचे वय असे देता येईल. ढोबळमानाने महागाईवर मात करण्यासाठी तुमच्या एकूण बचतीच्या ४८ टक्के बचत समभाग गुंतवणुकीत हवी. बँकेच्या ठेवी, पोस्टाच्या ठेवी, राष्ट्रीय बचत पत्र मिळून २५ लाखांचा निधी केतकी यांनी स्थिर उत्पन्न गुंतवणुकीत गुंतविला आहे. मुदत ठेवींच्या मुदतपूर्तीनंतर यापैकी किमान १२ लाख समभाग गुंतवणुकीत असायले हवेत. यात भविष्य निर्वाह निधी खात्यातील रक्कम जमेस धरता २० लाखांचा निधी समभाग गुंतवणुकीत असायला हवा.

सुखवस्तू कुटुंबातील कमल जोशी यांना तशी कशाची ददात नाही. परंतु अनेकदा अतिज्येष्ठ मंडळी विनाकारण सुरक्षिततेचा आणि वैद्यकीय खर्चाच्या कारणामुळे रोकडसुलभता आटवून बसतात. केतकी यांना बँकेकडून मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा योजनेचा लाभ कमल जोशी यांनाही आहे. ही योजना ‘कॅशलेस’ स्वरूपाची असल्याने तसे पाहता त्यांनी रोकडसुलभतेचा बाऊ  करणे अनावश्यक आहे. आज कमल जोशी यांना मिळणारी फॅमिली पेन्शन त्यांच्या मासिक खर्चापेक्षा अधिक आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची समभाग गुंतवणूक किमान १०० वजा वय असल्याने कमल जोशी यांच्या बचतीपैकी किमान २० टक्के रक्कम समभागसंलग्न असायला हवी. कमल जोशी यांच्याकडे एकूण १० लाखांचा निधी आहे. यापैकी ५० टक्के निधी बॅलंस्ड फंडात गुंतविल्यास जोखीम नियोजन आणि महागाईवर मात हे दोन्ही उद्देश सफल होतील. उर्वरित पाच लाखांच्या निधीचा विनियोग करण्यासाठी योग्य ते रोखे गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड निवडावेत.

arthmanas@expressindia.com

(सूचना : लेखातील कुटुंबाचे गुंतवणुकीचे नियोजन हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे.)

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Engineer kavi kalelkar financial planning after getting new job

ताज्या बातम्या