फ्रँकलिन इंडिया टॅक्सशिल्ड फंड

मागील आठवडय़ात (लोकसत्ता, ‘अर्थसत्ता’ पानावर) दिवाळीत मिळालेल्या बोनसच्या रकमेचे नेमके काय करावे याबद्दल मान्यवरांनी आपले विचार मांडले एक अपवाद वगळता कोणीही ‘ईएलएसएस’ या करवजावटप्राप्त गुंतवणूक प्रकाराबद्दल विशेष सांगितले नाही. मागील ५ वर्षांत नियोजनबद्ध गुंतवणुकीवर वार्षिक परतावा कमाल २९ टक्के आणि किमान २१ टक्के परतावा दिलेला या फंड प्रकारासाठी गुंतवणुकीचा ठरावीक हिस्सा राखायला हवा. नोकरदार मंडळींनी, करवजावटीसाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीसाठी सक्तीच्या भविष्यनिर्वाह निधी कपातीनंतर शुद्ध विम्याच्या (टर्म इन्शुरन्स) हप्ता, पाल्याचे शैक्षणिक शुल्क यांसारख्या साधनांनंतर ईएलएसएस या करवजावट करणाऱ्या साधनाला प्राथमिकता द्यायला हवी. प्रत्यक्षात असे दिसते की गरज नसताना विमा विक्रेत्यांनी गळ्यात मारलेल्या आणि संपत्तीची निर्मिती करीत नाहीत अशा विमा योजनांची वाट चोखाळली जाते. मागील दहा वर्षे एका ईएलएसएस फंडाने ५ हजारांच्या नियोजनबद्ध ‘एसआयपी’तून गुंतलेल्या ६ लाखांतून १६.९४ लाख रुपयांच्या संपत्तीची निर्मिती केली आहे.

फ्रँकलिन इंडिया टॅक्सशिल्ड या फंडाची पहिली एनएव्ही १० एप्रिल १९९९ रोजी जाहीर झाली. या दिवशी या फंडात रेग्युलर ग्रोथ पर्यायामध्ये गुंतविलेल्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे १९ ऑक्टोबर २०१७च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार बाजारमूल्य ५२.४४ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर २३.९८ टक्के आहे. २००० ते २००५, २००६ ते २०१० आणि २०११ ते २०१५ या प्रत्येकी पाच वर्षांच्या कालावधीत अव्वल एसआयपी परताव्याच्या जोरावर पहिल्या तीन क्रमांकात असलेल्या फंडाची कामगिरी मागील वर्षभरात खालावलेली आहे. पंधरा वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक संपत्तीची निर्मिती करणाऱ्या या फंडाची मागील वर्षभरातील कामगिरी गुंतवणूकदारांना घोर लावणारी आहे. १९ ऑक्टोबर २०१५ रोजी या फंडात रेग्युलर ग्रोथ प्लानमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर ११.१० टक्के वार्षिक परतावा मिळालेला आहे. हा परतावा ईएलएसएस फंड गटातील सरासरी परताव्यापेक्षा कमी आहे. फंडाच्या गुंतवणुकीच्या पुनस्र्थापनेची प्रक्रिया पूर्ण होत आली असून येत्या दोन-तीन महिन्यांत फंडाच्या कामगिरीत बदल झालेला दिसू लागेल.

या फंडाची मालमत्ता २९ सप्टेंबर २०१७ रोजी ३,१९९ कोटी होती. लक्ष्मीकांत रेड्डी हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. या फंडातील गुंतवणूक आयकराच्या कलम ८० (सी) अंतर्गत कर वजावटीस पात्र आहे. मागील अठरा वर्षांत फंडाच्या वृद्धी पर्यायाच्या एनएव्हीत ५३ पट वाढ झाली आहे. सर्वसाधारणपणे कर नियोजनासाठी केलेली गुंतवणूक सेवानिवृत्ती पश्चातची तजवीज करण्यासाठी असा समज आहे. एखाद्याने नोकरीला लागल्यापासून (३० वर्षे) दरमहा ५ हजारांची नियोजनबद्ध गुंतवणूक केल्यास वार्षिक १२ टक्के दराने १८ लाखांच्या गुंतवणुकीवर १.७६ कोटी रुपये इतका करमुक्त निधी जमा होईल. फंडाच्या गुंतवणुकीत मागील तीन तिमाहीत सरासरी अनुक्रमे ५७, ५६ आणि ५४ समभाग होते. फंडाच्या गुंतवणुका लार्ज कॅप केंद्रित असून ७५ टक्के समभाग ‘सेबी’च्या नवीन वर्गीकरणानुसार लाज कॅप अर्थात भांडवली मूल्यांनुसार पहिल्या १०० समभागातील आहेत. २० टक्के मिड कॅप अर्थात १०१ ते ३०० दरम्यानचे समभाग आहेत. निधी व्यवस्थापक समभाग निवडीसाठी ‘बॉटम अप अप्रोच’ धोरणाचा अवलंब करतात. फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, महिंद्र अँड महिंद्र, येस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे अनुक्रमे सर्वाधिक गुंतवणूक असलेले समभाग आहेत.  बँका आणि वित्तीय सेवा, वाहन उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, औषध निर्मिती यांना निधी व्यवस्थापकांनी सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. आयसीआयसीआय लॉम्बॉर्ड जनरल इन्शुरन्ससारख्या नवख्या समभागाचा गुंतवणुकीत केलेल्या समावेशाची दखल घेणे गरजेचे आहे. निश्चलनीकरणाच्या घोषणेनंतर निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीचा ढाचा बदलला. या बदलांचा परिणाम फंडाची कामगिरी घसरण्यात झाला. घसरलेला बाजार अपेक्षेपेक्षा लवकर पूर्वपदावर आल्यामुळे गुंतवणूक मूळपदावर आणण्यासाठी निधी व्यवस्थापकांना उसंत मिळाली नाही. जून २०१७ पासून गुंतवणूक मूळपदावर आणण्यासाठी निधी व्यवस्थापकांना वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीदरम्यान घसरलेल्या बाजारामुळे संधी मिळाली. सध्या ८५ टक्के गुंतवणुका ऑक्टोबर २०१६ मधील गुंतवणूक ढाच्याच्या जवळपास नेण्यात निधी व्यवस्थापक यशस्वी झाले आहेत. ढासळलेले बुरुज सावरण्याचा निधी व्यवस्थापकांचा प्रयत्न सुरू झाला असला तरी क्रमवारीत सुधारणा दिसायला अजून दोन तिमाहींचा कालावधी जाणे आवश्यक आहे. ईएलएसएस फंडातील गुंतवणूक साधरणपणे तीन वर्षांसाठी केली जाते. तीन वर्षांपूर्वी निवडक ईएलएसएस फंडात केलेल्या गुंतवणुकीचे विवरण खाली दिलेल्या कोष्टकात दिले आहे.

कर वजावटीसाठी सर्वाधिक प्राथमिकता जीवन विमा उत्पादनांना मिळते. पारंपरिक विमा उत्पादनांचा परतावा सर्वात कमी असतो. त्यानंतर कर वजावटीसाठी करायच्या गुंतवणुकीसाठी पसंती सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीला (पीपीएफ) दिली जाते. अनेकदा आवश्यकता नसताना (गृहकर्जामुळे मिळणारी वजावट) आपल्या बचतीची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत मोठय़ा संख्येने गुंतवणूक करणारे आढळतात. सार्वजनिक भविष्य निधीसाठी चक्रवाढ व्याजाचे सामथ्र्य जाणणारे गुंतवणूकदार दुर्दैवाने ईएलएसएस फंडासाठी चक्रवाढ व्याजाचे समर्थनकरीत नाहीत. एक तर नियोजनबद्ध गुंतवणूक करणारे कमीच आढळतात. दरवर्षी नवीन फंडाची निवड करताना सर्वात चांगला परतावा असणाऱ्या फंडाची निवड करतात. सोबतच्या कोष्टकात विशद केलेल्या तळातील दोन फंड २०१४ मध्ये ‘टॉप क्वारटाइल’मध्ये होते. आयसीआयसीआय प्रु. लाँगटर्म इक्विटी फंडाचा सध्याचा परतावा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत मिळणाऱ्या व्याजाइतका सुद्धा नाही. मालमत्तेच्या हव्यासापायी ‘व्हॅल्यू फंडां’ची मालिका आणण्याच्या नादात आयसीआयसीआय प्रु. फंड घराण्याचे आपल्या आयसीआयसीआय प्रु. लाँगटर्म इक्विटी आणि आयसीआयसीआय प्रु. व्हॅल्यू डिस्कव्हरीसारख्या फंडाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पराताव्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसते. गुंतवणूक करते वेळी सर्वाधिक परताव्यापेक्षा परताव्यात सातत्य राखणाऱ्या फंडाची करबचतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीसाठी निवड करणे कधीही चांगले. हा फंड (सध्याच्या संक्रमणाचा काळ गृहीत धरूनदेखील) परताव्यात सातत्य राखणारा फंड असल्याने दीर्घकाल चिकाटीने गुंतवणूक करून मुलांचे शिक्षण, सेवानिवृत्ती पश्चात जमा करायच्या रकमेसाठी संपत्तीची निर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श पर्याय आहे. गुंतवणुकीत नेहमीच निश्चित उत्पन्न देणाऱ्या आणि समभाग संलग्न गुंतवणूक साधनांचा समावेश असावा. ज्यांनी २०१३ मध्ये समभाग आणि २०१४ मध्ये करबचतीसाठी सार्वजनिक भविष्य निधीची निवड केली त्यांना दोन्ही गुंतवणूक साधनांतून भरघोस परतावा मिळाल्याचे दिसते.

केवळ सार्वजनिक भविष्य निधी किंवा ‘ईएलएसएस फंडा’ची निवड न करता दोहोंचा सारासार विचार करून प्रसंगानुरूप वापर केल्यास परतावा महागाईच्या दराहून अधिक असतो. या कारणांमुळे कर बचतीसाठी करावयाच्या गुंतवणूक साधनांत सार्वजनिक भविष्य निधी आणि ईएलएसएस फंड यांचा योग्य तो मेळ घालणे आवश्यक आहे.

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी  shreeyachebaba@gmail.com