आयडीएफसी फोकस्ड इक्विटी फंड

दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत सूर मारणारेसुद्धा असतात आणि नदीत जेमतेम पुरुषभर पाणी असतानासुद्धा पाण्याची भीती वाटणारेही असतात. आजच्या फंडाची शिफारस ही सेन्सेक्स ३० हजाराच्या पातळीवर असतानाही डोळसपणे  धोका पत्कारण्याची गुंतवणूक करून ३ ते ५ वर्षांत दोन आकडय़ांत परतावा मिळण्याची आशा धरणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे.

मागील आठवडय़ात मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने ३० हजारी टप्पा गाठल्याचा प्रसंग ३० किलोचा केक कापून साजरा करण्यात आला. बाजारात रस घेण्यास सुरुवात केली तेव्हा निर्देशांक १००० होता. ज्यावेळी निर्देशांकाने १०००चा टप्पा गाठला तो क्षणसुद्धा मैलाचा दगड ठरावा असा होता. आपण गुंतवणूक केलेल्या फंडांची मालमत्ता वाढ, त्या फंडाची एनएव्ही, या सर्व गोष्टीचा आनंद घेतला तर त्या समाधान देणाऱ्या निश्चितच असतात.

सेन्सेक्स ३० हजाराच्या टप्प्यावर असताना नवीन गुंतवणूक करावी किंवा कसे, असा प्रश्न नवख्या गुंतवणूकदारांना पडण्याची शक्यता आहे. हा प्रश्न कुंपणावर बसलेल्या गुंतवणूकदारांना नेहमीच पडतो. या मनोवृत्तीचे गुंतवणूकदार डिसेंबर-जानेवारी महिन्यात निफ्टी ८,००० च्या टप्प्यावर असताना निफ्टी ७,५०० होण्याची वाट पाहात होते. शेअर बाजारातील मागील चार महिन्यांत प्रमुख निर्देशांकाचा प्रवास ज्या वेगाने झाला ते पाहता काठावर बसलेल्या गुंतवणूकदारांना भोवळच यावी. ज्या मंडळींना बाजाराचा फोबिया असतो, त्या मंडळींना बाजार कायमच धोकादायक वाटत असतो. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत सूर मारणारेसुद्धा असतात आणि नदीत जेमतेम पुरुषभर पाणी असताना सुद्धा पाण्याची भीती वाटणारेही असतात. आजच्या फंडाची शिफारस ही सेन्सेक्स ३० हजाराच्या पातळीवर असतानाही डोळसपणे धोका पत्करण्याची गुंतवणूक करून ३ ते ५ वर्षांत दोन आकडय़ांत परतावा मिळण्याची आशा धरणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे.

काही दिवसांपासून फोकस्ड फंड ही संकल्पना या फंड घराण्यात मूळ धरू लागली आहे. ही संकल्पना डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांपेक्षा वेगळी आहे. डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांच्या गुंतवणुकीत ८ ते १० उद्योग क्षेत्रातील ६० ते ७५ समभागांचा समावेश असतो. तर फोकस्ड फंडात ५ ते ७ उद्योग क्षेत्रातील मिळून २५ ते ३० समभाग असतात. फोकस्ड फंड हे धोका पत्करून गुंतवणूक करणारे व डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडांपेक्षा अधिक परतावा मिळविणारे फंड असतात.

आयडीएफसी फोकस्ड इक्विटी फंडाच्या गुंतवणुकीत २६ समभागांचा समावेश आहे. यापैकी २५ समभाग भारतीय शेअर बाजारात नोंदलेले आहेत. कॉग्निझंट टेक्नोलॉजी ही कंपनी अमेरिकेत न्यूजर्सी येथे मुख्यालय असलेली माहिती तंत्रज्ञानातील बहुराष्ट्रीय कंपनी असून भारतातील माहिती तंत्रज्ञानातील एक प्रमुख कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे. भारतीय म्युच्युअल फंडांना त्यांच्या एकूण मालमत्तेच्या ५ टक्के गुंतवणूक परकीय चलनात करण्याची मुभा आहे. या गोष्टीचा फायदा घेऊन कॉग्निझंट टेक्नोलॉजीच्या नॅसडॅक शेअर बाजारात नोंद झालेल्या समभागात ही गुंतवणूक केली आहे. फंडाने गुंतवणुकीसाठी सात उद्योग क्षेत्रे निश्चित केली आहेत. एकूण मालमत्तेपैकी २५ टक्के गुंतवणूक बँका आणि ११.४७ टक्के गुंतवणूक गैरबँकिंग वित्तीय कंपन्यात केली असून त्याखालोखाल ९.५१ टक्के आरोग्यनिगा, ९.३१ टक्के गुंतवणूक भांडवली वस्तू,  ८.५९ टक्के गुंतवणूक वाहन व वाहन पूरक उद्योगांतून केली आहे. सर्वात कमी २.९५ टक्के गुंतवणूक सेवा क्षेत्रातील कंपन्यांत केली आहे.

फंडाची ५७ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप, ३० टक्के मिड कॅप व १०.१७ टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप प्रकारच्या समभागात केली आहे. मागील महिन्याभरात फंडाच्या गुंतवणुकीत एक्साइड इंडस्ट्रीज, आरबीएल बँक व अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केट या तीन समभागांचा नव्याने समावेश केला. तर हिंदुस्थान पेट्रोलियम, भारतीय स्टेट बँक, हिरो मोटोकॉर्प, हिंडाल्को, बीएसई लिमिटेड हे समभाग गुंतवणुकीतून विकून टाकले. अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केट या नव्याने बाजारात नोंद झालेल्या कंपनीचे एकूण गुंतवणुकीत ४.५७ टक्के प्रमाण आहे. प्रसंगी परताव्यासाठी गुंतवणुकीतील धाडस करण्यास फंड व्यवस्थापन कचरत नसल्याचे यातून आढळून येते. सुमित अग्रवाल हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. त्यांना गुंतवणूक व्यवस्थापनाचा १२ वर्षांचा अनुभव आहे. व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले सुमित अग्रवाल यांनी कंपनी सचिवाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.  आयडीएफसी म्युच्युअल फंडात २०१६ मध्ये येण्यापूर्वी ते मिरे असेट म्युच्युअल फंडात मिरे टॅक्स सेव्हर या फंडाचे निधी व्यवस्थापक होते त्यापूर्वी ते एनाम सेक्युरिटीजमध्ये समभाग विश्लेषक होते.

या फंडाची मालमत्ता १२० कोटी दरम्यान आहे. कमी मालमत्ता असणाऱ्या फंडात गुंतवणूक करावी का असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या सदरातून याच फंड घराण्याचा २३ मे २०१६ रोजी सुचविलेल्या आयडीएफसी क्लासिक इक्विटी फंडाची मालमत्तासुद्धा १२० कोटी होती. एका वर्षभरात फंडाची मालमत्ता ३१ मार्च २०१७ रोजी ८५२ कोटी झाली आहे. कमी एनएव्ही असलेले चांगले फंड हुडकून या फंडांची वाचकांना शिफारस करण्याचा आजपर्यंतचा शिरस्ता या फंडाबाबतीतसुद्धा पाळलेला आहे.

१ मे २०१२ रोजी या फंडात सुरू केलेल्या १,००० रुपयांच्या नियोजनबद्ध मासिक गुंतवणुकीतून फंडात ६० हजार गुंतविण्यात आले असून या गुंतवणुकीचे बाजार मूल्य २८ एप्रिलच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ८४,३४६ रुपये झाले आहे. म्हणूनच सेन्सेक्स ३० हजार व निफ्टी ९ हजाराच्या टप्प्यावर असताना मागील ५ वर्षांच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीवर १३.८६ टक्के वार्षिक परतावा देणाऱ्या फंडाची ही शिफारस केली आहे. याच कालावधीत निफ्टीतील नियोजनबद्ध गुंतवणुकीने ११.६६ टक्के परतावा दिला आहे.

गुंतवणुकीतील धोका आणि परतावा यांचा समतोल साधणाऱ्या या फंडाचा समावेश आपल्या सल्लागाराच्या शिफारसीने करायचा आहे.

गुंतवणुकीची पाच पसंतीची उद्योग क्षेत्रे

*   बँकिंग क्षेत्र                   २५.००

*  गैरबँकिंग वित्तसंस्था   ११.४७

*  आरोग्य निगा               ९.५२

*  भांडवली वस्तू                ९.३१

*  वाहन उद्योग                ८.५९

गुंतवणूक पद्धती व आघाडीचे समभाग

*  लार्ज कॅप    ५७.००

*  मिड कॅप     ३०.००

*  स्मॉल कॅप   १०.१७

फंडाच्या गुंतवणुकीत २६ समभागांचा समावेश आहे. पैकी २५ समभाग भारतीय शेअर बाजारातील तर एक नॅसडॅक शेअर बाजारात नोंदलेली कॉग्निझंट टेक्नोलॉजी ही कंपनी.

(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)
shreeyachebaba @gmail.com