सोन्याची किंमत २५,००० वरून अल्पावधीत ३१,००० वर गेली. जवळपास सहा महिन्यांत तोळ्याला ६,००० रुपयांचा हा फायदा आहे. परंतु आपला लॉकर म्हणजे एटीएम मशीन नाही जे सोन्याचे रूपांतर रोख रकमेत करेल. हा फायदा घेण्यासाठी आपण ते सोने लॉकरमधून बाहेर काढून बाजारात विकले पाहिजे तरच तो आपला खरा फायदा होईल. सोने हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय जरूरच, पण आपण ते वेळीच विकून मोकळे होणार असू तेव्हाच!
गेल्याच आठवडय़ात ‘लोकसत्ता’त पहिल्या पानावर बातमी होती. ‘समभागांपेक्षा सोनेच अधिक लाभदायी.’ सोने सात महिन्यांत ४९ टक्के परतावा, त्या उलट समभागांनी ८ टक्के लाभवाढ दिली या वस्तुस्थितीवर ही बातमी बेतली होती. स्वाभाविकच मनात विचार आला खरंच सोन्यात गुंतवणूक करणे योग्य काय?
आपण भारतीय लोक सोने नेहमीच खरेदी करीत असतो. लग्न कार्यासाठी, सणावाराला, वाढदिवसाला भेट देण्यासाठी शिवाय अक्षय्य तृतीया, धनत्रयोदशी असे साडेतीन मुहूर्त आहेतच. आपल्या सगळ्यांनाच सोने खरेदी करणे आवडते आणि आपली अशी समजूत की सोन्यात गुंतवणूक म्हणजे उत्तम गुंतवणूक! ‘सेफ हेवन’ हे सोने गुंतवणुकीला चिकटलेले बिरूद. आपण पिढय़ान्पिढय़ा सोने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करीत असतो. जे आपल्या आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी केले तेच बरोबर असे समजून आपण ती प्रथा पुढे चालवत राहतो. पण हे करणे खरोखरच बरोबर आहे काय? आपण कधीही हे तपासून बघत नाही. आपल्या आधीच्या पिढय़ांनी हे केले कारण त्यावेळी गुंतवणुकीसाठी अतिशय कमी पर्याय उपलब्ध होते आणि लग्नकार्यात सोने देणे हे प्रतिष्ठेचे समजले जायचे, तसेच आता जितकी चोरीमारीची भीती आहे तेवढी पूर्वी नव्हती. त्यामुळे सर्व जण सर्रास सोने अंगाखांद्यावर वापरू-मिरवू शकायचे. पण आता तसे नाही. म्हणून आता आपण तपासून बघितले पाहिजे की, ‘सोन्यातील गुंतवणूक ही खरेच उत्तम गुंतवणूक आहे काय?’
जगातील सर्वात श्रीमंत माणूस गुंतवणूक गुरू वॉरेन बफे याच्या मते, ‘‘सोन्यात केलेली गुंतवणूक म्हणजे मृत गुंतवणूक (Dead Investment) आहे.’’ हे असे का ते समजून घेण्याचा प्रयत्न करू या :
आपण सोन्यात गुंतवणूक करतो आणि विचार करतो की, माझ्या अडी-अडचणींसाठी किंवा मुलांसाठी मालमत्ता म्हणून मी हे सोने विकत घेत आहे. पण आपण नीट विचार करून बघितला तर आपल्या लक्षात येईल की, आपण विकत घेतलेले सोने कधीही विकत नाही तसेच आपण अजून एक चूक करतो की आपण दागिने खरेदी करतो जे विकायला गेलो तर आपले नुकसानच होते. खरी अडचण ही की, भावनिकरीत्या त्या गुंतवणुकीत आपण इतके गुंतलेलो असतो, अडचणीच्या प्रसंगी किंवा लग्नासाठी, घर घेण्यासाठी पैसे हवेत म्हणून सोने विकणारे फारच थोडे निघतात.
सोने हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय, जर आपण ते विकणार असू तर. म्हणजे बघा आता सोन्याची किंमत २५,००० वरून अल्पावधीत ३१,००० वर गेली आहे. म्हणजे मग आपल्याला वाटते की, तोळ्याला ६००० रुपयांचा फायदा झाला आहे. पण आपण हे तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा आपण तो फायदा खरोखरच सोने विकून गाठीशी बांधून घेऊ आणि कमावलेला हा पैसा अन्य दीर्घकालीन पर्यायात गुंतवू. पण नेहमी काय घडते – सोने लॉकरमध्ये पडून राहते आणि आपल्याला फक्त तोंडदेखला तात्पुरता नफा दिसतो आणि आपण खूश होतो. आपला लॉकर म्हणजे एटीएम मशीन नाही जे सोन्याचे रूपांतर रोख रकमेत करेल आणि आपल्याला देईल. हा फायदा घेण्यासाठी आपण ते सोने लॉकरमधून बाहेर काढून बाजारात विकले पाहिजे, तरच तो आपला खरा फायदा होईल. पण आपण तसे करत नाही.
सोने न विकण्याचे अजून एक कारण म्हणजे आपल्याला वाटते की, आपण सोने विकले तर लोकांना काय वाटेल. सोने विकण्याची पाळी येणे म्हणजे भिकेचे लक्षण असे आपल्यावरील पंरपरागत होत आलेले संस्कार आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे आपणा बहुतांशांकडील सोने हे दागिन्यांच्या स्वरूपात असते आणि त्याच्याशी आपल्या भावना जोडलेल्या असतात. ‘ही आजीची माळ’ किंवा ‘आईच्या पाटल्या’ इत्यादी. ‘सोनं ही एक मृत गुंतवणूक’ त्याला ही अशी कारणे आहेत. बरेचदा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कुटुंबाचा वारसा म्हणून हे दागिने दिले जातात. याला हरकत असण्याचे कारण नाही. पण मग त्या सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहता कामा नये.
आता आपल्यापैकी बरेच जण म्हणू शकतात की, माझी सोन्यातील गुंतवणूक दीर्घ मुदतीची आहे. बरोबर आहे पण आपण समभागात किंवा स्थावर मालमत्तेमध्ये जी गुंतवणूक करतो ती देखील दीर्घ मुदतीची असते. पण तरी तिच्यापासून आपल्याला काही ना काही परतावा निरंतर मिळत असतो – जसे समभागांतून लाभांश, बोनस शेअर्स किंवा स्थावर मालमत्तेतून भाडे जे आपण स्वत:साठी, पुर्नगुतवणूक करण्यासाठी वापरू शकतो. सोन्याच्या बाबतीत असे काहीच घडत नाही. असा परतावा मिळण्यासाठी आपल्याला ते विकावे लागेल जे आपण कधीच करत नाही.
आपल्याला वाटते कीभारतीय अर्थव्यवस्था भ्रष्टाचार, सट्टेबाजी, परकीय अर्थव्यवस्था, बाह्य़ जोखीम घटक यामुळे खिळखिळी होत आहे. पण आपल्या देवळांच्या भांडारांमध्ये साठवून ठेवलेले सोने हेच जर वापरात आले तर अर्थव्यवस्था नक्कीच मजबूत होईल.
अजून एका कारणासाठी सोन्याला गुंतवणूक /मालमत्ता मानता येणार नाही. जरी आपण सोन्याची वळी, बारच्या स्वरूपात सोने घेतले तरी १० ग्राम सोन्याचे दागिने बनवताना त्यामध्ये कारागिरी करताना घट येतेच. दागिना कधीही १० ग्रामचा बनत नाही. वर अधिकची घट द्यावी लागतेच. जरी आधी घेतलेले सोने स्वस्त पडत असले तरी ही घट जमेस धरल्यास परतावा खूप खाली येऊ शकतो.
कोणी असेही म्हणेल की, सोन्यावर कर्ज काढता येऊ शकते. या कारणामुळे तरी ती मालमत्ता (अ‍ॅसेट) आहे. पण जर आपण कर्ज काढले तर ती मालमत्ता न राहता आपले दायित्व बनते. कारण त्यावर नियमित व्याज द्यावे लागते.
पण म्हणजे सोने विकत घ्यायचेच नाही का? तर नाही, असे नक्कीच नाही. तुम्ही जरूर सोने खरेदी करा. पण जसे रॉबर्ट कियोसाकीने आपल्या ‘Rich Dad, Poor Dad’ पुस्तकात सांगितले आहे- ज्यापासून आपल्याला काहीही परतावा मिळत नाही ते खर्च म्हणूनच मोजले पाहिजे. त्यानुसार तुम्ही सोने गुंतवणूक म्हणून नाही तर खर्च म्हणून नक्कीच खरेदी करू शकता.

हे सुवर्णमंत्र आवर्जून लक्षात घ्या..
१ सोने एक गुंतवणूक पर्याय म्हणून नक्कीच चांगला आहे फक्त आणि फक्त जर तुम्ही ते विकायला म्हणजे नफा रोखीत रुपांतरीत करायला तयार असाल तरच. लॉकरमध्ये ठेवणार असाल तर नाही.
२ जर तुमच्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या लग्नासाठी सोने विकत घेणार असलात तर ट्रेंड बघून आताच दागिने खरेदी करा.
३ जर गुंतवणूक म्हणून सोने घेणार असाल तर ही गुंतवणूक वळी, नाणी, पदके, गोल्ड-ईटीएफ या स्वरूपात खरेदीतून व्हायला हवी. आणि अर्थातच वेळोवेळी नफा गाठीशी बांधायला विसरू नका.
नाहीतर तुमची खरेदी गुंतवणूक न राहता मृत गुंतवणूक (Dead Investment) होईल.

russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
Chahal, Bhide to be transferred after ECI orders
चहल, भिडे यांची बदली अटळ; राज्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली
Accidental death of a 9 year old boy after a rickshaw with more than capacity passengers overturned panvel
पनवेल: क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची रिक्षा कलंडल्याने ९ वर्षीय बालकाचा अपघाती मृत्यू

स्वाती शेवडे cashevade.swati@gmail.com
(लेखिका सनदी लेखपाल असून त्या पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणूनही कार्यरत होत्या.)