बहुतेक सर्व आíथक नियोजनकार आपल्या अशिलास मुदतीचा विमा (टर्म प्लॅन) घेण्यास सुचवतात. ही आता सर्वमान्य गोष्ट झाली आहे. तसेच विमा कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन मुदतीचा विमा घेतल्यास एजंट कमिशन वाचते. स्वाभाविकत: तुमचा वार्षकि हप्ता कमी होतो. आधीच मुदतीच्या विम्याचा हप्ता कमी, त्यावर मिळणारी दलाली दोन टक्के (इतर पॉलिसीवर दलाली खूप जास्त आहे) आणि तीसुद्धा वाचवण्याची वृत्ती मग एजंट नसेल तर तुम्हास मुदतीचा विमा कसा/किती निवडावा याचे मार्गदर्शन मिळत नाही. आपले आपणच मार्गदर्शक होण्याच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी ते पाहू.
बहुतेक सर्व लेखक सर्व आयुर्वमिा कंपन्यांचे ‘दावा पूर्ततेचे गुणोत्तर’ (क्लेम सेटलमेंट रेशो) बघावयास सांगतात. आज ज्यांचे दावे पूर्ततेचे गुणोत्तर चांगले आहे ते तसेच पुढे राहील असे सांगता येत नाही. तसेच ज्यांचे प्रमाण तितकेसे चांगले नाही ते नंतर सुधारू शकते. आपली पॉलिसी २० ते ३० वर्षांसाठी असेल तर इतक्या मोठय़ा कालावधीत हे प्रमाण कसेही कमी-जास्त होऊ शकते. आज वेगवेगळ्या वेबसाइटवर दावे पूर्ततेबाबतची माहिती थोडय़ाफार फरकाने बदलते, कारण गुणोत्तर काढण्यासाठीची आकडेवारी बदलते. काही जण दाखल झालेल्या दाव्यामध्ये मागील शिल्लकघेत नाहीत, तसेच दावे कोणत्याही कारणामुळे प्रलंबित असतील तर ते नंतर स्वीकारले/ मान्य होऊ शकतात. या दावे पूर्ततेच्या गुणोत्तरांतर्गत मुदतीच्या विम्याचे स्वतंत्र गुणोत्तर कोणत्याही विमा कंपनीतर्फे जाहीर केले जात नाही. मग मुदतीच्या विम्यासाठी हे प्रमाण मान्य करणे तसे बरोबर नाही. परंतु दरवर्षी ‘इर्डा’तर्फे जाहीर होणारी आकडेवारी मान्य करण्यास हरकत नाही.
कोणत्याही पद्धतीत गणित मांडले तरी आयुर्वमिा महामंडळाचे ‘दावा पूर्ततेचे गुणोत्तर’ इतर कंपन्यांपेक्षा खूप चांगले (+९८%) आहे. त्यांच्या अवाढव्य कारभारामुळे ते पुढील काही वष्रे असेच राहील. परंतु त्यांचा वार्षकि हप्ताही इतर संस्थांपेक्षा खूप जास्त (जवळपास दुप्पट) आहे. मग एजंट याला पर्याय अर्धवार्षकि हप्त्याचा देतात की रक्कम लहान दिसते. आज खासगी आयुर्वमिा कंपन्यांमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय, टाटा, बिर्ला अशी नामांकित संस्था/ उद्योगघराणी आहेत व त्यांचे ‘दावे पूर्ततेचे गुणोत्तर’ तसे चांगले आहे. यांचे ग्राहकांना विक्रीपश्चात सेवा देण्याचे प्रमाण तसे चांगले आहे. योजनाच फक्त वेबसाइटवरून विकली जात नाही तर इतर पुष्कळ सेवा ऑनलाइन दिल्या जातात.
सर्वात महत्त्वाचे आपण आपली संपूर्ण माहिती खरी सांगितली तर आपला क्लेम अस्वीकृत होण्याची शक्यता कमी असते. नवीन आयुर्वमिा कंपन्या सिगारेट ओढणारे व न ओढणारे यासाठी वेगळे वार्षकि हप्ते घेतात. हप्ता कमी बसावा म्हणून ही माहिती दडवली जाते. मधुमेह, रक्तदाब औषधे घेऊन आटोक्यात आणलेला असतो व विमा कंपनीला तब्येत ठणठणीत सांगितली जाते. एखाद्या गंभीर आजारपणात मृत्यू आल्यास वैद्यकीय अहवालात डॉक्टर लिहून ठेवतात, मागील २० वष्रे चेन स्मोकर किंवा मधुमेह/ रक्तदाब २० वष्रे आहे. परिणाम थोडासा हप्ता वाचवण्याच्या नादात आपण आपल्या वारसांचे आíथक भवितव्य धोक्यात घालतो. त्या वेळेस आपण नसतो.
काही जण मुदतीचा विमा वेगवेगळ्या संस्थांकडून घेतात- उदा. दोन कोटी विम्याची पॉलिसी एका संस्थेकडून न घेता, पन्नास लाखांच्या चार पॉलिसी चार संस्थांकडून घेतात. यामध्ये मोठय़ा रक्कमेच्या विम्यासाठी मिळणारी हप्त्यामधील सवलत (डिस्काऊंट) मिळत नाही. परंतु चार संस्थांच्या चार पॉलिसी वेगवेगळ्या महिन्यात/ वर्षी घेतल्यास चार वेळा वैद्यकीय तपासणी केली जाते. चारही चाचण्या वेगवेगळ्या चिकित्सालयात झाल्या व सर्व चाचण्या चांगल्या दिसल्यास क्लेम अस्वीकृतीची शक्यता जवळजवळ नाहीच. वेगवेगळ्या महिन्यात हप्ते आल्यास खर्चाची विभागणी होते. गरज नसल्यास एखादी पॉलिसी रद्द करता येते. चार पॉलिसी असतील तर संपण्याची मुदत वेगवेगळी घेता येते. उदा. आपल्या वयाच्या ५३व्या वर्षी, ५५व्या वर्षी, ५८व्या वर्षी व साठाव्या वर्षी एक-एक पॉलिसी संपेल. आपल्या वयाच्या त्या टप्प्यावर आपल्याजवळ तितका निधी जमा झाला असल्यास किंवा तितक्या जबाबदाऱ्या कमी झाल्या असल्यास त्या रक्कमेच्या विम्याची गरज नसते. मग त्या पॉलिसीपुरता हप्ता वाचतो.
मुदतीचा विमा कधी घ्यावा? आपल्या अर्थार्जनास सुरुवात झाल्यावर लगेचच घ्यावा. सुरुवातीस उत्पन्न कमी असेल तर जितका मिळणे शक्य असेल त्याप्रमाणे घ्यावा व ज्या प्रमाणात उत्पन्न वाढेल त्या प्रमाणात वाढवत जावा.
आयुर्वमिा रक्कम ठरवण्याचे काही मुद्दे
* जबाबदाऱ्या ओळखा-  आपल्यावर अवलंबित व्यक्ती कोण आहेत. आई, वडील, भाऊ, बहीण, इतर नातेवाईक, पत्नी, मुले, त्यांचा तुमच्यावर अवलंबून असण्याचा काळ किती आहे, त्यासाठी आíथक तरतूद किती आवश्यक आहे. त्यानुसार विम्याची मुदत व रक्कम ठरवावी. उदा. मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन ते नोकरी/ व्यवसायास लागल्यावर आपल्यावरील त्यांची जबाबदारी संपते. मग गरज नसताना विम्याचा हप्ता (खर्च) भरत राहण्यास अर्थ नाही.
* कर्ज- तरुणपणी कर्जाची रक्कम मोठी असते. घरासाठी कर्ज आज कमीत कमी २५-३० लाखांचे असते. त्याशिवाय आपल्या राहणीमानानुसार वाहन कर्ज, घरगुती वस्तूंसाठी कर्ज घेतलेले असते. हे सर्व कर्ज आकस्मिक मृत्यू उद्भवल्यास आपल्या वारसांस एक रक्कमी फेडून टाकता येईल इतका कमीत कमी विमा असलाच पाहिजे. आज वयाच्या चाळिशीपर्यंत घरासाठीचे पहिले कर्ज फिटलेले असते. त्यामुळे दुसरे घर किंवा हॉलिडे होम खरेदीचे विचार चालू होतात. मुदतीचा विमा तरुणपणी घेतल्यास हप्ता कमी बसतो, नंतरच्या कर्जासाठी आयुर्वम्यिाची सोय होते.
* आपले उत्पन्न व राहणीमान- आपले सध्याचे कुटुंबाचे उत्पन्न, राहणीमान, खर्च विचारात घेऊन आयुर्वमिा उतरवावा. आयुर्वमिा हा आपल्यासाठी नसतो. विनोदाने असे म्हटले जाते की, ‘‘तुम्ही जिवंत राहिलात तर आयुर्वमिा कंपनी फायद्यात व गेलात तर वारसदार!’’ आपल्या पश्चात आपले वारसदार आजच्याच प्रमाणे पुढील काळ त्याच राहणीमानानुसार राहू शकतील. इतका आयुर्वमिा हवा.
* वार्षकि हप्त्याचा अंदाज घ्या- म्युच्युअल फंड एजंट कितीही संस्थांचा एजंट म्हणून काम करू शकतो. या उलट आयुर्वमिा एजंट फक्त एकाच कंपनीचे प्रतिनिधित्व करू शकतो. स्वाभाविकत: तो ज्या संस्थेचा एजंट असेल ती संस्थाच फक्त कशी चांगली आहे आणि त्यांचाच विम्याचा हप्ता कसा सुयोग्य आहे हे तो सांगणार. तसेच दावा पूर्ततेचे प्रमाण (क्लेम सेटलमेंट रेशो) हा सुयोग्य निकष नसला तरी एक महत्त्वाचा निकष होऊ शकतो. मागच्या तीन-चार वर्षांचे दावा पूर्ततेचे प्रमाण बघून त्यात बदल चांगला असेल तर कंपनी निवडण्यास हरकत नसावी. सध्या विविध वेबसाइटवर कंपन्यांसंबंधी माहिती उपलब्ध असते. वार्षकि हप्ता व दावा पूर्ततेचे प्रमाण यांचा मेळ घालून मुदतीचा विमा स्वीकारावा.
* आपल्या आयुर्वम्यिाच्या गरजेचा दर चार-पाच वर्षांनी आढावा घ्या. आपल्या वाढीव उत्पन्नामुळे आपले राहणीमान उंचावले असल्यास आयुर्वमिा वाढवून घ्यावा.
* आज प्रत्येकजण एजंटचे कमिशन वाचवण्यासाठी ऑनलाइन, वेबसाइटवर जाऊन मुदतीचा विमा घेतात. पॉलिसी डिमॅट प्रकारात खात्यावर जमा होते. सर्व व्यवहार ईमेल द्वारा. पेपर वाचवण्याच्या नादात घरात फाइलमध्ये पॉलिसी नाही. वारसास याची संपूर्ण माहिती असतेच असे नाही. आपल्या पश्चात पॉलिसीची रक्कम मिळण्यात आपल्या वारसास कंपनीकडे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी धावाधाव करावी लागते. एजंट आपल्या सर्व अशिलांची सर्व माहिती जपून ठेवतो. एजंट ज्या सेवा पुरवतात त्या आपल्या आपण लक्षात ठेवून कराव्या लागतात. हप्ता भरण्याचे एखाद्या वर्षी राहून गेल्यास पॉलिसी रद्द होते. प्रत्येक आयुर्वमिा प्रतिनिधी जास्त कमिशनसाठी चुकीचा सल्ला देईल असे नाही. चांगल्या प्रतिनिधीस योग्य मोबदला नाकारू नये.
sebiregisteredadvisor@gmail.com
(लेखक सेबीद्वारा नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत)