रुपयाच्या विनिमय मूल्याला स्थिरताही जरुरीचीच!

विनिमय दर अनेक कारणांमुळे कमी-जास्त होऊ शकतात. काही देश स्वत:हून आपल्या चलनाची किंमत कमी करतात.

महत्प्रयासाने महागाई दर समाधानकारक पातळीवर राखून साधली गेलेली आर्थिक सकारात्मकता धुळीस मिळू नये यासाठी रुपयाचे मूल्य मुख्यत: अमेरिकी डॉलरच्या तुलनेत किमान स्थिर पातळीवर राहील, हे पाहणे नितांत जरुरीचे आहे. गत सप्ताहात डॉलरमागे ६८च्या वेशीपर्यंत घसरलेला रुपया या चिंतेला गहिरे रूप देणारा आहे. रुपयाच्या मूल्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचा हा वेध..
देशाच्या अर्थव्यवस्थेत, चलनाच्या विनिमय दराचे केवढे महत्त्व असू शकते, याची सामान्यजनांना सर्वसाधारणपणे कल्पना असण्याची शक्यता नाही. ज्याप्रमाणे वस्तू विकल्या जातात अथवा खरेदी केल्या जातात, त्याचप्रमाणे चलनही विकले जाते व खरेदी केले जाते. जगात अनेक देशांची वेगवेगळी चलने आहेत. उदा. भारताचा रुपया, अमेरिका- अमेरिकी डॉलर, चिनी युआन, जपानचे येन, ब्रिटनचे स्टìलग पाऊंड, रशियाचे रूबल इत्यादी. एखाद्या चलनाच्या मोबदल्यात दुसरे चलन किती मिळेल? याला आपण विनिमय दर असे म्हणतो. तो दर अनेकदा देशांतर्गत अथवा बाह्य़ कारणांमुळे, अनेकदा बदलत असतो.
आजही जगात अमेरिकी डॉलरला खूप मागणी आहे. एक तर अमेरिका श्रीमंत देश आहे व अमेरिकेचे व्यापारी संबंध, जगभरातील अनेक देशांशी आहेत. जगातील अनेक मध्यवर्ती बँका, अमेरिकी डॉलर्स आपल्याजवळ रिझव्‍‌र्ह म्हणून ठेवतात. त्यामुळे डॉलरची किंमतही जास्त आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकदेखील सोने व ‘अमेरिकी डॉलर’ यांचा साठा करून ठेवते. भारतात जर रुपयाची किंमत, अमेरिकी डॉलरच्या बदल्यात प्रमाणाबाहेर कमी झाली तर मग रिझव्‍‌र्ह बँक काही प्रमाणावर डॉलर बाजारात आणते. त्यामुळे रुपया थोडा स्थिर होण्यास मदत होते. सध्या रुपया आणि अमेरिकी डॉलर याचा विनिमय दर ६२ रु. ते ७० रुपयांपर्यंत आहे. ज्या वेळी देशाच्या चलनाच्या विनिमय मूल्याचा विचार केला जातो, त्या वेळी त्या देशाची मूलभूत आर्थिक ताकद किती, हे पाहिले जाते. जेव्हा चालू विनिमय दरापेक्षा जास्त रुपये देऊन आपण डॉलर विकत घेतो, तेव्हा त्याला रुपया गडगडला असे म्हणतात. परंतु चालू विनिमय दरापेक्षा कमी रुपयांत एक डॉलर मिळाला तर रुपया वधारला असे म्हणतात. सर्वसामान्यांच्या राहणीमानावर विनिमय दर असा परिणाम करतो. गेले काही दिवस अनेक जागतिक कारणांमुळे खनिज तेलाच्या किमती कमी होत आहेत. बरोबरीने पेट्रोल अथवा डिझेल यांच्या किमती, काही प्रमाणात कमी झाल्याने वाहतुकीचे दर थोडे कमी झाले. त्यामुळे देशभरांतील प्रवास, रोज वाहनांतून वाहून न्यावे लागणारे अन्नधान्य, भाजीपाला यांची किंमत थोडी कमी झाली. बहुमूल्य परकी चलनांत थोडी बचत झाली. व्यापारी तूट कमी व चलनवाढीच्या दरात घट झाली, तर रुपयाची घसरण डॉलरच्या तुलनेत झाल्यास परदेशी शिक्षण/परदेशी प्रवास, परदेशांतून येणारी मशीनरी, आयात होणाऱ्या परदेशी वस्तू महाग होतात. परदेशी गुंतवणुकीवर परिणाम होतो. परदेशी कर्ज महाग होऊन ती थकण्याची शक्यता वाढते. आज जगभर अमेरिकी डॉलरचा प्रभाव व प्रबळता आहे, त्यामुळे वरील गोष्टी घडू शकतात.
विनिमय दर अनेक कारणांमुळे कमी-जास्त होऊ शकतात. काही देश स्वत:हून आपल्या चलनाची किंमत कमी करतात. देशातील राजकीय बदल, युद्धे, त्यांचे परदेशी राजकारण, आर्थिक धोरण व आर्थिक शिस्त, त्या देशातील शेती व उत्पादन स्थिती, सटोडिये यांचा प्रभाव विनिमय दरावर पडत असतो. १९९२ साली झालेल्या जागतिकीकरणामुळे बहुतेक सर्व अर्थव्यवस्था एकमेकांशी आर्थिकदृष्टय़ा जोडल्या गेल्या आहेत. ज्या प्रमाणात दोन देशांचा व्यापार जास्त वा कमी, त्या प्रमाणात त्याचा परिणाम एकमेकांवर होऊ शकतो. जगात अमेरिकी डॉलर खूप बलाढय़ झाला. त्याला शह देण्यासाठी युरोपीय समुदायाने ‘युरो’ हे चलन व्यवसायात आणले, परंतु त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. पूर्वी म्हणजे वस्तूंच्या मोबदल्यात वस्तूंची देवाण-घेवाण होत असे. काही वर्षांपूर्वी आपण रशियाला मशीनरीच्या बदल्यांत तांदूळ दिले.
अलीकडच्या काही वर्षांत चीनने आपल्या चलनाची म्हणजे ‘युआन’ची किंमत (विनिमय मूल्य) कृत्रिमरीत्या कमी केली. त्यामुळे चीनच्या वस्तू काही प्रमाणांत स्वस्त झाल्यामुळे चीनची निर्यात वाढली. व्यापार वाढावा व देशाचा विकास दर वाढावा म्हणून नुकतीच चीनने ‘युआन’ची किंमत पुन्हा कमी केली. जपानने येनची किंमत कमी केली. जपानमध्ये १९८० सालापासून मंदी चालू आहे. व्हेनेझुएलाने आपले चलन बोलीव्हरचे ३७% अवमूल्यन नुकतेच केले. कोणत्याही देशाचा विनिमय दर त्या देशाला नफा मिळविण्याच्या हेतूसाठी कमी-जास्त केला जातो.
जगात मंदीची वारे सुरू आहे. अमेरिकी डॉलर, तुलनेने इतर देशांतील चलनांच्या मानाने महाग आहे. त्यामुळे अमेरिकेत तयार केलेल्या वस्तू, अमेरिकेने आयात केलेल्या वस्तूंच्या तुलनेत महाग झाल्या. त्यामुळे आयात जास्त व निर्यात थोडी कमी झाली. यातून अमेरिकेच्या व्यापारी तूट किंवा जिला चालू खात्यावरील तूट (करंट अकाऊंट डेफिसीट- ‘कॅड’मध्ये) म्हणतात त्यात थोडी वाढ झाली. सर्वसामान्यपणे व्यापारी तूट वाढल्यास त्या देशाची अर्थव्यवस्था थोडी कमजोर होत आहे असे समजले जाते. अमेरिका श्रीमंत देश आहे. जेव्हा एखाद्या देशाच्या चलनाची किंमत कमी होते, तेव्हा त्या देशाची कर्ज परतफेडीची क्षमता कमी होते. भारताने प्रमाणाबाहेर परदेशी भांडवल उभारू नये असे तज्ज्ञांच्या इशाऱ्यामागे हेच कारण आहे.
देशाच्या एकूण आर्थिक व्यवहारांत आंतरराष्ट्रीय व्यापारात जितकी निर्यात अधिक, तितकी त्या देशाची आर्थिक अस्थिरता अधिक असे मानले जाते. जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया वगरे देशांना हा अनुभव आला आहे. ब्राझील देशाचे अर्थमंत्री मध्यंतरी म्हणाले, जागतिकीकरणामुळे चलन युद्ध होण्याची शक्यता आहे. Beggar My neighbour अशी धोरणे पुष्कळ देश स्वत:च्या प्रगतीसाठी आखू शकतील व त्याचा परिणाम त्यांच्याशी व्यापारी संबंध असणाऱ्या देशांवर होईल. चलन युद्ध जे म्हटले जाते ते असे लढले जाईल.
विकसनशील होणाऱ्या अर्थव्यवस्थांत भारताचे चलन सर्वात ‘वजनदार’ आहे असे म्हणतात. तज्ज्ञांच्या मते रुपयांची किंमत योग्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचेच आहे. देशाची चलने जसजशी मुक्तपणे, परिवर्तनीय होत आहेत, तसतसा नाणेबाजारही आंतरराष््रठीय होत आहे. देशांतर्गत व्यापार वाढणे फार जरुरीचे व महत्त्वाचे आहे, तसेच देशांतर्गत व आंतरदेशीय कर्ज, देशाच्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत असणे महत्त्वाचे असते, अशीही तज्ज्ञांची मते आहेत. थोडक्यात, चलनाचा विनिमय दर स्थिर असणे हे त्या देशाची आर्थिक स्थिती प्रतिबिंबित करणारे असते, त्यामुळे रुपयाची किमतीला स्थिरता जरुरीचीच ठरते.
सुमित्रा गोवईकर – bhaginibank@vsnl.net
(लेखिका पुणेस्थित भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सल्लागार )

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Importance of rupee exchange rate stability

ताज्या बातम्या