|| अतुल कोतकर

मिड व स्मॉल कॅप फंडाच्या गुंतवणूकदारांसाठी मागील दोन वर्षे फारशी उत्साहवर्धक नव्हती. त्याच प्रवाहात २५ मार्च २०२० रोजी करोना विषाणूच्या प्रभावाने बाजाराने वार्षिक तळ दाखविला. परंतु ३१ डिसेंबर २०२० ला त्याने सार्वकालिक उच्चांकावर वर्षांला निरोपही दिला. या कालावधीत प्रामुख्याने लार्जकॅप फंडांनी सरस कामगिरी केली. सुरू झालेले नवीन वर्ष हे मिड व स्मॉलकॅपचे असावे या आशेने आजपासून सुरू झालेल्या या सदरातून पहिली गुंतवणूक शिफारस स्मॉलकॅप फंडाची आहे.

मागील पाच आणि १० वर्षे कालावधीत स्मॉलकॅप फंड गटात सरासरीपेक्षा आणि मानदंड निर्देशांकापेक्षा अधिकचा वार्षिक परतावा दिलेल्या फंडाच्या यादीत जे मोजके फंड आहेत त्यापैकी निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप हा एक फंड आहे. फंडाने १० वर्षे ‘एसआयपी’वर वार्षिक २०.२२ टक्के, ७ वर्षे ‘एसआयपी’वर वार्षिक १८.८२ टक्के, ५ वर्षे ‘एसआयपी’वर वार्षिक १२.९७ टक्के, ३ वर्षे ‘एसआयपी’वर वार्षिक १५ टक्के तर मागील वर्षभरातील एसआयपीवर ७१.४२ टक्के परतावा दिला आहे. फंडाची कामगिरी हा फंड ‘लोकसत्ता कर्ते’ यादीचा मागील आठ वर्षे भाग असल्याचे समर्थन करते.

गुंतवणूकदारांच्या जोखीम क्षमतेनुसार फंड निवडावेत असा संकेत असला तरी गत परताव्याच्या मागे लागून फंड निवड करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत स्मॉलकॅप फंडांना आवश्यकतेपेक्षा अधिक स्थान दिलेले असते. सर्वाधिक वृद्धीदर असलेल्या कंपन्या अस्थिर असल्याने गुंतवणुकीतील जोखीमसुद्धा जास्त असते. त्यामुळे स्मॉलकॅप फंडांचे गुंतवणुकीत प्रमाण ५ ते १० टक्क्य़ांपेक्षा अधिक असू नये असा संकेत आहे. या फंड प्रकारातील योजनांचा गुंतवणूकदारांच्या संपत्ती निर्मितीचा वेग सर्वाधिक असतो. स्मॉलकॅप समभागातील गुंतवणूक संधी मर्यादित असल्याने आणि उलाढाल कमी असल्याने या फंडांचा पोर्टफोलिओ ओव्हरलॅप अधिक असतो. त्यामुळे गुंतवणुकीत एकच स्मॉलकॅप फंड असावा.

atul@sampannanivesh.com

समीर राच निधी व्यवस्थापक

प्रत्येक गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलीओत त्याच्या जोखिमांकानुसार मिड आणि स्मॉल कॅप फंड असायला हवेत. गुंतवणुकीसाठी एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय आहे. बाजारात घसरणीतून थरकाप असतानाची वेळ ही खरेदीसाठी सर्वोत्तम तर बाजार उन्मादी अवस्थेत असताना बाहेर पडण्याची योग्य वेळ असते.