सुकली पाने सोने लुटूनी
मोरू परतुनी आला
बहिण काशी करी तयारी
ओवाळाया त्याला
मोरूच्या बापाचा झाला
परी बहुत संताप
म्युन्सिपालटीवाल्या देई
शिव्या आणखी शाप
मोरूमाता पतीस वदली
डोळा आणून पाणी
‘‘दसऱ्यादिवशी नका विटाळू
शिव्या घालूनी वाणी’’
दसरा सणमोठा
नाही आनंदा तोटा
मंगेश पाडगांवकर यांच्या ‘लोकसत्ता- लोकरंग’ पुरवणीतून फेब्रुवारी १९९६ ते जुल १९९७ या कालावधीत कविता प्रसिद्ध झाल्या. या कविता त्यांनी ‘मोरू’ या काल्पनिक व्यक्तीरेखेला समोर ठेऊन रचल्या. मोरू ही व्यक्ती परिस्थितीने गंजलेली आहे. आपल्या सगळ्यांच्यात एक ‘मोरू’ असतोच. सतत समोरच्या परिस्थितीशी झगडत आपल्या स्वप्नांच्या मागे हा मोरू धावत असतो. अशाच एका ‘मोरू’ व ‘मोरू पत्नी’चे आजचे नियोजन. पाडगावकरांच्या या मोरूला नेहमीच काही प्रश्न पडतात. व या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी मोरू दामुअण्णांच्या बिऱ्हाडी जातो. त्या मोरूच्या सारखे प्रश्न या मोरूलाही पडले आहेत. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात एक भूमिहीन शेतमजूर म्हणून राबणारा हा ‘मोरू’ आज मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षक आहे. घर घेण्यासाठी २५ लाखांचे कर्ज घेऊन ते कर्ज पुढील २०-२२ वष्रे फेडणार आहे. साडेतीन मुहूर्तापकी एक मुहूर्त दसरा येत्या गुरुवारी आहे. दसरा ते दिवाळीदरम्यान घर खरेदीचे नवीन करार होतात. दसऱ्याच्या मुहूर्तावर घराच्या शोधात बाहेर पडलेल्या ‘मोरू’चे नियोजन जाणून घेऊ.
उमेश लहानू भोयर (३१) हे लोकसत्ताचे वाचक असून ते मुंबई महानगर पालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्या पत्नी रेखा (२७) या अनुदानप्राप्त खाजगी शाळेत शिक्षिका आहेत. उभयतांना नमन (१० महिने) हा मुलगा असून या दाम्पत्यासोबत त्यांचे आईवडील राहतात. उमेश हे मुळचे तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूरचे असून २००८ पासून नोकरीनिमित्त मुंबई परिसरात स्थायीक आहेत. उमेश व रेखा या दोघांचे मिळून वजावटीपश्चात मासिक वेतन ५३ हजार रुपये आहे. घरखर्च वजा जाता सरसरी दरमहा ३० हजारांची बचत होते. उमेश यांना शासनाची नवीन पेन्शन योजना लागू आहे. खाजगी शाळातील कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी किंवा तत्सम अन्य लाभ देण्याविषयीचा निर्णय महानगर पालिकेत प्रलंबित आहे. सध्या ते राहात असलेल्या सदनिकेसाठी त्यांनी घेतलेल्या कर्जापकी ४.६० लाखांची कर्जफेड अद्याप शिल्लक आहे. नोकरीच्या निमित्ताने त्यांना रोज बदलापूरहून मुंबईत यावे लागत असल्याने त्यांची कल्याण परिसरात घर घेण्याची योजना आहे. हे घर घेण्यासाठी ४० लाखांदरम्यान खर्च करावे लागतील. सध्याचे घर विकले तर त्यासाठी घेतलेले कर्ज फेडून १५ लाख शिल्लक रहातील. म्हणजे नव्या घरासाठी २५ ते २७ लाखांपर्यंत त्यांना कर्ज घ्यावे लागेल. त्यांच्या एकूण तीन आयुर्विमा पॉलिसी आहेत. या पकी एक मनीबॅक (न्यू बीमा गोल्ड) विमा छत्र १००,००० व एक पेन्शन देणारी (जीवन तरंग) विमा छत्र २००,००० आणि तिसरी एंडोमेंट (जीवन सरल) विमा छत्र २,२३,८१५ रुपये.
सर्वप्रथम उमेश यांचे अभिनंदन त्यांनी त्यांच्या नियोजनासाठी गुंतवणूक सल्लागार म्हणविणाऱ्या व प्रत्यक्षात विमा विक्रेता असणाऱ्या व्यक्तीकडे न जाता लोकसत्ता-अर्थ वृत्तांतकडे ते आले. त्यांचे नियोजन प्रसिद्ध करण्यासही त्यांनी अनुमती दिली. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात पती-पत्नी शिक्षक आहेत. उमेश यांच्या व अन्य शिक्षक कुटुंबियांच्या वित्तीय गरजा वेगळ्या असल्या तरीही या नियोजनाच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या नियोजनाची दिशा सापडेल असे मानावयास हरकत नाही.
उमेश यांच्याशी बोलणे झाल्यानुसार त्यांची प्राथमिकता, ही कल्याण परिसरात घर घेण्याला आहे. अशा परिस्थितीत बचत होत असलेल्या ३३ हजारांचा विनियोग हा गृहकर्जफेडीसाठी प्राधान्याने  असायला हवा. या कारणास्तव कुठलीही नवीन गुंतवणूक सुचविलेली नाही. त्यांनी नियोजनासंदर्भात विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे अशी-
* माझ्या सर्व विद्यमान विमा पॉलिसी बंद कराव्या का?
याचा निर्णय घेण्यापूर्वी आरोग्य विमा किंवा अन्य विम्याच्या प्रकारात व आयुर्विमा या प्रकारात एक मुख्य फरक जाणून घ्यायला हवा. अन्य विम्याच्या प्रकारात विमा कंपनी व विमा खरेदीदार यांच्यात दर वर्षी एक करार होत असतो व या करारापोटी विमा खरेदीदार आपली विशिष्ट जोखीम स्वीकारण्याबाबत विमा कंपनीला हप्ता देत असतो. आयुर्विम्याच्या बाबतीत हप्ता जरी प्रत्येक वर्षी दिला तरी एखाद्या हयात व्यक्तीच्या जीवाची जोखीम स्वीकारल्याचा करार हा २०-२२ वर्षांसाठी (विम्याच्या मुदतीइतका) असतो. साहजिकच हप्ता भरणे थांबविल्यास या कराराचा भंग होतो व विमाछत्र देण्याचे बंधन विमा कंपनीवर असत नाही. मोठे विमा छत्र घेऊन विमा छत्राचा प्रश्न सोडविला तरी उमेश यांनी भरलेल्या पशाचा पूर्ण मोबदला न मिळता भरलेले पसे वाया जाणार आहेत. हे वाया जाणारे पसे नेमके किती हे पॉलिसीच्या ‘सरेंडर व्हॅल्यू’वर ठरते. जर आज पर्यंत भरलेल्या पशावर पाणी सोडण्याची तयारी असेल किंवा कसे ते ठरवून वरील तीन पॉलिसी बंद किंवा सुरू ठेवण्याचा निर्णय उमेश यांनी करावयाचा आहे. विम्याची गुंतवणूक ही दीर्घमुदतीची असल्याने आधी आíथक नियोजन करून नंतर आपल्याला साजेसा विमा काढणे हिताचे असते. या निमित्ताने पारंपारिक किंवा मनी बॅक योजनांची खरेदी म्हणजे बचत नव्हे याची पुन्हा एकदा आठवण करून देणे गरजेचे वाटते.
* दोघांसाठी किती रकमेचा व कोणत्या विमा कंपनीचा मुदतीचा विमा घ्यावा?
सामान्यपणे वार्षकि उत्पनाच्या २० पट इतकाच विमा विमा कंपनी देत असते. या नियमांत विमा खरेदीदाराचे वय त्याची आरोग्य स्थिती यानुसार थोडे अधिक विमाछत्र विमा कंपन्या देतात. उमेश व रेखा यांची विमाछत्र पात्रता साधारण प्रत्येकी ५० ते ६० लाखांदरम्यान आहे. अव्वल क्लेम सेटलमेट रेशो असलेल्या विमा कंपनीकडे त्यांनी ७५ लाखांचा विमा खरेदी करण्यासाठी अर्ज करावा. विमा कंपनी तिच्या नियमानुसार त्यांचे विमाछत्र ठरवेल.
* अपघाती विमा कोणत्या कंपनीचा व किती रकमेचा असावा?
एसबीआय लाईफ केवळ एक हजाराच्या विमा हप्त्यात अपघाती मृत्यू आल्यास २० लाखांचे विमा छत्र देते. वय वष्रे १८ ते ७० दरम्यान कोणीही ही पॉलिसी खरेदी करू शकतो. स्टेट बँकेच्या खातेधारक असल्यास या पॉलिसीचे दरवर्षी स्वयंनूतनीकरण केले जाते. म्हणून ही पॉलिसी आपल्यासाठी योग्य वाटते.
* पत्नीसाठी ‘एनपीएस’ खाते उघडावे का?
या प्रश्नाचा व्यवहार्य पातळीवर विचार केला असता खाते उघडण्याची आवश्यकता नाही असेच उत्तर द्यावे लागेल. खाजगी शाळेत शिकवीत असल्याने एनपीएस लागू होण्याचा निर्णय संबंधितांनी अद्याप न घेतलेला असणे हे संकट न समजता कर्ज लवकर फेडण्याची संधी म्हणून पाहावे. उमेश व रेखा २५ लाखांचे कर्ज घेण्याच्या विचारात आहेत. हे कर्ज २० वष्रे मुदतीचे असेल. उमेश व रेखा यांनी आपली बचत कर्ज फेडण्यास वापरली तर कर्ज लवकर फिटेल व बँकेला कमी व्याज भरावे लागेल. राहिला प्रश्न रेखा यांच्या अर्थसुरक्षिततेचा. उद्या जर दुर्दैवाने उमेश यांचे काही बरे वाईट झाले तर उमेश यांच्या विम्याच्या रकमेतून सर्व कर्ज फेडूनदेखील काही रक्कम उरेल व उमेश यांचा भविष्य निर्वाह निधी व एनपीएसमधील जमा पूंजी रेखा यांना मिळेल. कर्ज न फेडता जास्त व्याज भरायचे की रेखा यांच्या सेवानिवृत्तीची सोय पाहायची याचा निर्णय उमेश व रेखा यांनीच करावयाचा आहे. अनेकदा गुंतवणूकदारांची मानसिकता विचित्र असते. वित्तीय नियोजनकाराला सुयोग्य वाटलेला पर्याय हा त्याच्या अशीलाला पटतोच असे नाही. म्हणून हा पर्याय उमेश व रेखा यांच्या मनाला पटला तर त्यांनी तो अवलंबवावा. पटला नसेल तर एक पर्याय सुचवावासा वाटतो.
दीर्घकालीन समभाग गुंतवणूक अव्वल परतावा देते हे सत्य आहे. सातत्याने ३० वष्रे दरमहा तीन हजाराची एसआयपी एखाद्या अव्वल फंडात केलीत व परताव्याचा दर १० टक्के धरला तर ३० वर्षांनतर १०.६३ लाख जमतील. चार हजाराची एसआयपी एखाद्या अव्वल फंडात केलीत व परताव्याचा दर ९ टक्के धरला तर ३० वर्षांनंतर १५.१३ लाख जमतील. या दोनपकी योग्य विकल्पाची पत्नीच्या सेवानिवृत्ती पश्चात उदरनिर्वाहाची सोय करण्यासाठी निवड करावी.
हे आजचे नियोजन आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या नियोजनात बदल करणे आवश्यक असते. पाच वर्षांपूर्वी एचडीएफसी इक्विटी हा अव्वल परतावा देत असणारा फंड होता. आज या फंडाच्या परताव्याचा दर सुमार असल्याने अनेक गुंतणूकदारांच्या मनातून हा फंड उतरला आहे. हे असे होतच असते. म्हणून दर तीन वर्षांनी आपल्या गुंतवणुकीचा तज्ञांकडून आढावा घेणे गरजेचे आहे.
shreeyachebaba@gmail.com