प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com
भेटी देणे आणि घेणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. विवाह, वाढदिवस, दिवाळी वगैरे प्रसंगात भेटी दिल्या अथवा घेतल्या जातात. प्राप्तिकर कायद्यानुसार भेटी देणे-घेणे म्हणजे कोणत्याही मोबदल्याशिवाय संपत्तीची देवाण- घेवाण करणे. मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित केलेले पैसे, स्थावर मालमत्ता किंवा ठरावीक जंगम मालमत्ता भेट म्हणून समजली जाते. भेटींचे काही व्यवहार अवैध रीतीने करदायित्व कमी करण्यासाठीसुद्धा वापरले जातात. अशा व्यवहारांद्वारे केल्या जाणाऱ्या करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीत वेळोवेळी बदल करण्यात आले आणि नवीन तरतुदी अमलात आणल्या गेल्या.

प्राप्तिकर कायद्यानुसार करदात्याला मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने मिळालेली संपत्ती त्याच्या करपात्र उत्पन्नात गणली जाते. या संपत्तीमध्ये रोकड, स्थावर मालमत्ता (जमीन, इमारत वगैरे), ठरावीक जंगम मालमत्ता यात समभाग, रोखे, सोने, चांदी, दागिने, चित्रे, शिल्प, वगैरेचा समावेश होतो.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?

भेट रोखीने मिळाल्यास : रोखीने मिळालेल्या भेटीची रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर ती करपात्र उत्पन्नात गणली जात नाही. ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोखीने मिळाल्यास संपूर्ण रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाते.

भेट स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात मिळाल्यास : मालमत्ता कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळाल्यास आणि मुद्रांक शुल्काच्या मूल्यांकनानुसार मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण मूल्य करपात्र आहे. मालमत्ता अपुऱ्या मोबदल्यात मिळाली असेल आणि मुद्रांक शुल्काच्या मूल्यांकनानुसार असणारे मूल्य हे मोबदल्यापेक्षा (अ) ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि (ब) मोबदल्याच्या १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी (‘अ’ आणि ‘ब’मधील जी जास्त रक्कम आहे ती) रक्कम उत्पन्नात गणली जाते.

भेट जंगम मालमत्तेच्या स्वरूपात मिळाल्यास : ठरावीक जंगम मालमत्ता कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळाल्यास आणि त्याचे वाजवी बाजार मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण मूल्य करपात्र आहे. मालमत्ता अपुऱ्या मोबदल्यात मिळाली असेल आणि मोबदला हा वाजवी बाजार मूल्यापेक्षा कमी असेल आणि हा फरक ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी रक्कम उत्पन्नात गणली जाते.

या भेटी ठरावीक नातेवाईकांकडून मिळाल्यास त्या करपात्र उत्पन्नात गणल्या जात नाहीत. या रकमेला कोणतीही मर्यादा नाही, ठरावीक नातेवाईकांमध्ये पती/पत्नी, आई/वडील, भाऊ/बहीण, पती किंवा पत्नीचा भाऊ  किंवा बहीण (आणि त्यांचे पती/पत्नी), आई किंवा वडिलांचा भाऊ  किंवा बहीण (आणि त्यांचे पती/पत्नी) आणि वंशपरंपरेतील व्यक्ती यांचा समावेश होतो.

याशिवाय लग्नात मिळालेल्या भेटी, वारसा हक्काने किंवा मृत्युपत्राद्वारे मिळालेली रक्कम किंवा मालमत्ता, धर्मादाय संस्थेकडून मिळालेली रक्कम ही भेट म्हणून करपात्र नसते.

अनिवासी भारतीयांसाठी मागील वर्षी प्राप्तिकर कायद्यात बदल करण्यात आला. या बदलानुसार निवासी भारतीयाने अनिवासी भारतीयाला मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्यात पैसे, भारतात असलेली स्थावर मालमत्ता किंवा ठरावीक जंगम मालमत्ता हस्तांतरित केल्यास असे उत्पन्न भारतात जमा झालेले किंवा स्वीकारलेले उत्पन्न म्हणून समजले जाईल. भारतात जमा झालेले किंवा स्वीकारलेले उत्पन्न अनिवासी भारतीयांना भारतात करपात्र आहे. पूर्वी असे उत्पन्न भारतात जमा झालेले किंवा स्वीकारलेले असे समजले जात नव्हते. परंतु ५ जुलै २०१९ नंतर अशा अनिवासी भारतीयांना मिळालेल्या भेटी भारतात करपात्र आहेत. अनिवासी भारतीयांना ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी किंवा लग्नात मिळालेल्या भेटी करपात्र नसतील.

आता वाचकांकडून आलेल्या प्रश्नांच्या समाधानाकडे वळू या.

* प्रश्न : मी मागील वर्षी सेवानिवृत्त झालो. मला एकूण ४० लाख रुपये निवृत्ती लाभापोटी मिळाले. मी यातील १५ लाख रुपये माझ्या पत्नीला भेट म्हणून दिले आहेत. या भेटीवर पत्नीला कर भरावा लागेल का?

– सुनील काळे

उत्तर : प्राप्तिकर कायद्यानुसार पत्नी ही ‘ठरावीक’ नातेवाईक असल्यामुळे तिला मिळालेली भेट ही करपात्र नाही. पत्नीने हे पैसे गुंतविले आणि या गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न मात्र पत्नीला करपात्र नसून ते उत्पन्न तुम्हाला करपात्र आहे. त्यामुळे ठरावीक नातेवाईकांना भेटी देताना उत्पन्नाच्या क्लबिंगचा विचार करणे गरजेचे आहे.

* प्रश्न : मी नुकतीच एक सदनिका २६ लाख रुपयांना खरेदी केली. मुद्रांक शुल्काप्रमाणे या सदनिकेचे मूल्य २९ लाख रुपये इतके आहे. मला या व्यवहारावर कर भरावा लागेल का?

स्मिता काटकर

उत्तर : स्थावर मालमत्ता खरेदी करताना मुद्रांक शुल्काप्रमाणे मूल्य विचारात घेणे गरजेचे आहे. स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी दिलेला मोबदला हा मुद्रांक शुल्काप्रमाणे असणाऱ्या मूल्यापेक्षा कमी असेल तर मालमत्ता खरेदी करणाऱ्याला कर भरावा लागू शकतो. यासाठी दोन मापदंड आहेत. मोबदला आणि मुद्रांक शुल्काप्रमाणे मूल्य यामधील फरक ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि फरक मोबदल्याच्या १० टक्क्य़ांपेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी रक्कम ‘इतर उत्पन्न’ या सदरात गणली जाते. आणि करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो. आपल्याबाबतीत हा फरक ३ लाख रुपये (मुद्रांक शुल्काप्रमाणे मूल्य २९ लाख रुपये आणि मोबदला २६ लाख रुपये) आहे म्हणजेच मोबदल्याच्या १० टक्क्य़ांपेक्षा जास्त (२,६०,००० रुपयांपेक्षा) आहे. त्यामुळे ३ लाख रुपयांच्या फरकाची रक्कम आपल्या ‘इतर उत्पन्न’ या सदरात दाखवावी लागेल आणि त्यावर कर भरावा लागेल. मालमत्तेची विक्री केली तरच कर भरावा लागतो असे नाही तर खरेदी करताना योग्य काळजी न घेतल्यास खरेदीवरसुद्धा कर भरावा लागतो. ही सदनिका ज्या व्यक्तीकडून खरेदी केली त्यालासुद्धा भांडवली नफा गणताना २९ लाख हे विक्री मूल्य विचारात घ्यावे लागेल.

* प्रश्न :  मी एका कंपनीत व्यावसायिक तत्त्वावर सल्लागार म्हणून काम करतो. मला या कंपनीकडून दर वर्षी ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कंपनी या उत्पन्नावर १० टक्क्यांप्रमाणे ४०,००० रुपयांचा उद्गम कर (टीडीएस) कापते. माझे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे मला कर भरावा लागत नाही. मला हा ४०,००० रुपयांचा * उद्गम कर परताव्याचा दावा करून मिळवावा लागतो. मी कंपनीला उद्गम कर न कापण्याची विनंती करू शकतो का?

प्रकाश शिंदे

उत्तर : आपल्याला एकूण उत्पन्नावर कर भरावा लागत नसल्यामुळे आपण आपल्या प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे ‘फॉर्म १३’ मध्ये शून्य किंवा कमी दरात उद्गम कर कापण्याची विनंती करू शकता. या विनंतीनुसार अधिकारी कंपनीला शून्य किंवा कमी दराने उद्गम कर कापण्याची सूचना करू शकतो आणि त्यानुसार आपल्या उत्पन्नावर उद्गम कर कापला जाईल.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.