तृप्ती राणे

कमी खर्चात आणि आपल्याला झेपेल अशी जोखीम घेऊन ‘आपण आपलंच’ (डीआयवाय) आर्थिक नियोजन करून चांगली गुंतवणूक करू शकतो. मात्र अशा गुंतवणूकदारांना आपल्याला काय येतं यापेक्षा आपल्याला काय येत नाही हे माहीत असलं तर ते जास्त योग्य निर्णय घेऊ शकतील, हेही लक्षात घ्यावं.

डू इट योरसेल्फ – ‘डीआयवाय’ म्हणजेच स्वत: बनवलेलं किंवा तयार केलेलं! आपण जेव्हा स्वत:च्या ज्ञानानुसार, अनुभवातून किंवा इथं-तिथं वाचून/विचारून कुठलीही गोष्ट करतो त्यासाठी ‘डीआयवाय’ या संक्षेपाचा वापर केला जातो. आजकाल व्हॉट्सअ‍ॅप, गूगल आणि यूटय़ूबच्या कृपेमुळे आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. सततच्या माहितीच्या भडिमारामुळे आपल्यातील अनेक जण नवीन ‘ट्राय’ करायला उद्युक्तसुद्धा होतात. तसं पाहायला गेलं तर ही एक चांगली गोष्ट आहे असं म्हणता येईल. कारण आज सगळ्यांना माहिती मिळतेय जी गेली अनेक वर्ष काहींनाच मिळत होती. त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्यातून नक्कीच फायदा होऊ शकतो. शिवाय यासाठी फार खर्चसुद्धा करावा लागत नाही. आता वेळ बराच जातो. कारण कोणती माहिती उपयोगी आहे आणि कोणती नाही हे कळायला वाचन तर करावं लागतं. पण तरीसुद्धा मी म्हणेन की, काही काळानंतर आपल्याला समजायला लागतं की कोणती पोस्ट पूर्ण वाचायची आणि त्यानुसार कृती करायची आणि कुणाला डिलीट करून पुढे सरकायचं. एकंदर ‘डीआयवाय’ पद्धत कुठल्याही बाबतीत म्हणा, जसं की नवीन पदार्थ बनवण्यासाठी, जुन्या परंपरागत गोष्टी शिकण्यासाठी असो, बागकाम शिकण्यासाठी, घरातला पसारा आवरण्यासाठीसुद्धा, बऱ्याच अंशी फायद्याची वाटते.

या ‘डीआयवाय’ पद्धतीने आपल्याला आपली गुंतवणूक करणंसुद्धा खूप सोप्पं करून दिलं आहे. अनेक अशी संकेतस्थळं आहेत जिथं कधी कधी अगदी फुकट किंवा अतिशय कमी फी दिल्यावर माहिती मिळते. माहितीमध्ये कुठला म्युच्युअल फंड चांगला किंवा कुठला शेअर किती काळात किती टक्के परतावा देईल हे सांगितलं जातं. एवढंच नाही तर गुंतवणुकीचे इतर पर्याय जसं की, क्रिप्टोकरन्सी (बिटकॉइन), कमॉडिटीज, क्राऊडफंडिंग, पी२पी लेन्डिंग यामध्येसुद्धा कशी गुंतवणूक करून फायदा कमावला जाऊ शकतो हेसुद्धा दाखवलं जातं. त्यात जर आपण आपल्या फोनसारखेच स्मार्ट असू तर पटकन आपलं लॉगिन करून, हवी तशी माहिती पुरवून अगदी काही मिनिटांत आपण गुंतवणूक करू शकतो. इतकं सगळं झटपट होत असताना कशाला करायचं आर्थिक नियोजन आणि जोखीम व्यवस्थापन! तर आजच्या लेखातून आपण अशा ‘डीआयवाय’ पद्धतीचं विश्लेषण करणार आहोत.

तसं म्हणायचं तर गुंतवणूक व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन यामध्ये ‘डीआयवाय’ पद्धतीचा नक्की फायदा होऊ शकतो. आपल्या सर्वाना गुंतवणुकीचे मापदंड, आर्थिक नियोजनाचे महत्त्वाचे मुद्दे हे ठाऊकच असतात किंवा याची माहिती सहज मिळतेसुद्धा. शिवाय आपण आपल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार आपलं नियोजन करून घेता येतं. आपल्यासाठी योग्य काय आहे, त्यामध्ये किती गुंतवणूक केली पाहिजे आणि कधी त्यातून फायदा करून बाहेर पडलं पाहिजे – हे ज्याला कळतं त्याच्यासाठी ही पद्धत चांगलीच सोयीची होते. आपल्याकडे जर शिस्त आणि चिकाटी असेल तर नक्कीच या कमी खर्चाच्या पद्धतीचा फायदा करून आपण चांगल्या प्रकारे संपत्ती निर्मितीचा आनंद अनुभवू शकतो.

आता वळू या या पद्धतीच्या दुसऱ्या बाजूकडे. आपण सर्व हे जाणतो की नियमित व्यायाम आणि चांगल्या आहाराने आपण निरोगी राहू शकतो. आला दिवस आपल्याला वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप पोस्ट्समधून निरनिराळे सल्ले मिळत असतात. तेव्हा माहिती सगळ्यांना आहे पण सगळ्यांना त्याचा फायदा होतो का? कारण प्रत्यक्षात मात्र आपल्यातील जास्तीत जास्त जण हे यातील काहीही करत नाहीत. ना व्यायाम, ना जिभेला आवर. प्रत्येक नवीन वर्षांच्या पहिल्या आठवडय़ापुरता याबाबत निश्चय होतो आणि काहीच दिवसांत सगळा उत्साह आणि जिद्द गायब होते! तेव्हा वजन काही कमी होत नाही, परंतु वेगवेगळ्या डाएट्स करून शारीरिक आणि मानसिक संतुलन मात्र बिघडतं! अगदी असाच अनुभव अनेकांना ‘डीआयवाय’ पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीचा होतो. सुरुवातीला सगळं अगदी ठरवल्याप्रमाणे होतं, पण अनेकांच्या बाबतीत मात्र नंतर गुंतागुंतीचे अनुभव आले आहेत. काही वेळा अनेक शेअर्स किंवा म्युच्युअल फंड गोळा झालेले आहेत, तर काही वेळा आधी फायद्यात असलेली गुंतवणूक वेळेत बाहेर न पडल्याने तोटय़ात गेली आहे. काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त जोखमीच्या पर्यायात गुंतवणूक आहे, तर काही ठिकाणी गरज आणि गुंतवणुकीमध्ये काहीच ताळमेळ नाही. त्यात जर मार्च महिन्यासारखी परिस्थिती आली तर मात्र बहुतेकांची तारांबळ उडते आणि मग त्यातून पोर्टफोलिओला नुकसान होऊ  शकतं.

माहिती, अनुभव आणि शहाणपण या तीन वेगळ्या गोष्टी आहेत. फक्त माहिती मिळाली की आपण शहाणे झालो असं नसतं. शहाणपण हे अनुभव आणि चुकांमधून झालेल्या उपरतीमधून येतं. मुळात आर्थिक आराखडा हा प्रत्येकाचा वेगळाच असतो. कारण प्रत्येकाची गरज, ज्ञान, जोखीम क्षमता आणि मानसिकता वेगळी असते. प्रत्येक गुंतवणूकदाराच्या काही उणिवा असतात ज्या त्याच्या आर्थिक आराखडय़ावर आणि गुंतवणुकीवर परिणाम करत असतात. म्हणून ‘डीआयवाय’ पद्धतीचा अवलंब करायच्या आधी आपल्या उणिवा पहिल्या जाणून घ्याव्यात. जर आपण भरपूर चांगला प्लॅन आखू शकतो पण त्यानुसार वागू शकत नाही तर या भानगडीत पडू नये. जर आपल्याला नीट माहिती नसेल तर गुंतवणूक पर्याय स्वीकारताना जास्त खबरदार राहावं. कुठे, कसं, कधी आणि किती नुकसान होऊ शकतं हे नीट जाणून घ्यावं. बरं गुंतवणूक केल्यानंतर तिच्यावर लक्ष ठेवणं हे आलंच. तेव्हा जर नियमित पोर्टफोलिओचा आढावा घेता आला तर ठीक, पण तसं करता येत नसेल तर ‘डीआयवाय’ हे तुमच्यासाठी नाही!  शक्यतो रिटायरमेंटसाठी नियोजनात ‘डीआयवाय’ करू नये. कारण येथे नुकसान सोसायची क्षमता कमी असते आणि कधी कधी तर पैसे कमी पडायची शक्यता जास्त असते.

याउलट जर तुम्हाला चांगला अभ्यास करता येतो, वेळोवेळी गुंतवणुकीवर कोणत्या गोष्टींचा किती आणि कसा परिणाम होतो हे कळतं, जे गुंतवणूक ठरल्याप्रमाणे करून त्यावर लक्ष ठेवू शकतात त्यांनी नक्की ‘डीआयवाय’ पद्धतीचा वापर करावा. कधी कधी सल्लागाराचा खर्च आणि गुंतवणुकीसाठीची रक्कम याचा जर मेळ होत नसेल तरीसुद्धा ‘डीआयवाय’ करावं. परंतु असं करायच्या आधी व्यवस्थित माहिती मात्र नक्की मिळवावी.

‘डीआयवाय’ पद्धत अंगीकारताना काही नियम घालून घेतले तर त्यातून कमी खर्चात आणि आपल्याला झेपेल अशी जोखीम घेऊन आपण आपलं आर्थिक नियोजन करून चांगली गुंतवणूक करू शकतो. या ठिकाणी मला शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पोथीतील एक बोधवाक्य येथे सांगावंसं वाटतं – शक्याशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर! आपल्याला काय येतं यापेक्षा आपल्याला काय येत नाही हे माहीत असणारे गुंतवणूकदार  जास्त योग्य निर्णय घेतात. कारण जे माहीत आहे त्यासाठी ‘डीआयवाय’ आणि जे येत नाही त्यासाठी सल्लागार हे समीकरण ते स्वीकारतात आणि निर्णय घेऊन मार्गी लागतात. तेव्हा गुंतवणूक पद्धत कोणतीही असो – ‘डीआयवाय’ किंवा सल्लागाराच्या मदतीने, शेवटी फायदा आणि तोटा हा आपलाच असतो.

* लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com