बंदा रुपया : ‘चहा’ची अशीही यशकथा

या चहावाल्या तरुणाने आपल्या कल्पकतेतून हाच दोन रुपयांच्या चहाचा व्यवसाय चक्क शंभर कोटींवर पोहोचविला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वडील भाजी विकायचे आणि आई गृहिणी. पण तो मात्र घरातल्या अंधाऱ्या खोलीत कसलीशी स्वप्न बघायचा! त्याचे स्वप्नही असे की त्याच्या पूर्तीसाठी त्याने चक्क चहाच्या टपरीचा पर्याय निवडला. साहजिकच त्याचा निर्णय ऐकून सारेच हसायला लागले. तो थोडा निराश झाला. या नैराश्याच्या मळकट धुक्याआडच त्याला त्याच्या जवळ येत असलेली एक अस्पष्ट प्रतिमा दिसली. ती त्याची आई होती. तिने घरचा स्टोव्ह त्याच्यापुढे धरला आणि हाच आईचा आशीर्वाद समजून त्याने तो स्वीकारला. पदरी असलेल्या शंभर रुपयांतून काचेचे दहा-पंधरा छोटे कप, चहाची भांडी विकत घेतली आणि दोन रुपये कप या दराने तो चहा विकायला लागला. या चहावाल्या तरुणाने आपल्या कल्पकतेतून हाच दोन रुपयांच्या चहाचा व्यवसाय चक्क शंभर कोटींवर पोहोचविला आहे. अशा या तेव्हाच्या स्वप्नाळू आणि आताच्या यशस्वी उद्योजकाचे नाव आहे अनिल अहिरकर. त्यांच्या अनिलकुमार टी कंपनीचा डंका आज केवळ नागपुरातच नाही तर परराज्यातही मोठय़ा दिमाखाने वाजत आहे.

महाविद्यालयीन शिक्षण १९७६ सालीच पूर्ण झाले, पण त्यानंतर अनिल अहिरकर यांना नोकरी करणे मान्य नव्हते. एक छोटा व्यवसाय असावा मात्र तो हक्काचा असावा, अशी त्यांची इच्छा होती. आपण बेरोजगारांच्या हाताला काम दिले पाहिजे, असा संकल्प त्यांनी स्वत:शीच केला होता. त्यामुळे पदवी प्राप्त झाल्यावर त्यांनी कुठे नोकरीसाठी प्रयत्न न करता नागपूरच्या गांजाखेत परिसरात एक चहाची टपरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. वडील भाजी विक्रेते आणि आई गृहिणी. त्यामुळे साहजिकच अनिल यांच्यावरच मोठी जबाबदारी होती. दोन रुपये कप चहा विकत त्यांनी आपला आयुष्यातील पहिला व्यवसाय सुरू केला.

एकूण गुंतवणूक केवळ शंभर रुपयांची. सुरुवातीला मिळकत कमी होती. फारसा व्यवसाय होत नव्हता. मात्र अहिरकर निराश झाले नाहीत. चहाची चव व गुणवत्ता असल्याने काही काळाने  व्यवसाय चांगला चालायला लागला. परिसरातील दुकाने, कार्यालयांत अहिरकर यांचा चहा जायचा. त्यामुळे या व्यवसायावरील त्यांचा विश्वास वाढला. आता याच व्यवसायात पुढे वाटचाल करायची असे ठरवल्यावर अहिरकर यांनी मोकळी चहा पावडर विकण्याचा निर्णय घेतला. गांजाखेत चौकातच एका हॉटेल मालकाने त्यांना सहा बाय सहाची जागा दिली. जागा मिळाल्यावर त्यांनी चहा पावडरचा व्यवसाय सुरू केला. अगदी माफक दरात आणि चांगल्या दर्जाची चहा पावडर मिळत असल्याने अहिरकर यांच्याकडील ग्राहक दिवसेंदिवस वाढत होते. परिणामी आर्थिक उलाढालही वाढली. दुकानात कर्मचारी आलेत. त्यांनी या उत्पादनाला अनिलकुमार टी कंपनी असे नाव दिले. कालांतराने व्याप वाढला आणि जागा अपुरी पडू लागली. १९८० साली त्यांनी आपले दुसरे दुकान सुरू केले. त्यासाठी गांधीबाग अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडून दहा हजारांचे कर्ज घेतले. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. ज्या ठिकाणी दुकाने चालत नाहीत ती दुकाने अहिरकर घेत गेले आणि मार्केटिंगसाठी युवा मुलांना रोजगार दिला. शहरातील प्रत्येक हॉटेल पिंजून काढले. १९८६ च्या दशकात अनिलकुमार टी कंपनी नागपुरात प्रसिद्ध झाली. दोनचे चार आणि चाराचे आठ अशी दालने वाढत गेली. अनिलकुमार टी कंपनी नागपूरकरांची पहिली पसंती ठरली. आज नागपुरात त्यांची तब्बल ५० दालने  सुरू आहेत. अहिरकर ही चहा पावडर ही दार्जिलिंग, कोची येथून आणतात. त्यावर विशेष प्रक्रिया केली जाते. दरवेळी चहा पावडर एकसारखी येत नाही. ऋतुप्रमाणे तिचा स्वाद व दर्जा बदलतो, मात्र ग्राहकांना एक सारखा स्वाद मिळावा यासाठी त्यावर विशेष प्रक्रिया केली जाते. यासाठी हिंगणा औद्योगिक वसाहतीमध्ये एक कारखाना टाकण्यात आला आणि विविध स्वादानुसार चहा पावडरचे उत्पादन होऊ लागले. यामध्ये दार्जिलिंग टी, लेमन टी, मँगो टी, ऑरेंज टी, जास्मिन गोल्ड टी, चॉकलेट टी, स्लीम टी, ग्रीन टी, स्ट्रॉबेरी टी अशी विविध उत्पादने आली. खुल्या चहा पावडरच्या विक्रीचा प्रघात असताना बाजारात पाकीटबंद चहा पावडर येऊ लागले. त्यामुळे अनिलकुमार टी कंपनीनेदेखील काळाची गरज ओळखून पाकीटबंद उत्पादन सुरू केले. आज केवळ विदर्भातच नाही तर महाराष्ट्रासह परराज्यातदेखील अनिलकुमार टी कंपनीचा शिक्का खणखणत आहे.

दरम्यान, दुसरा व्यवसाय सुरू करावा, अशी कल्पना अहिरकर यांच्या मनात आली आणि त्यांनी केबलचे काम सुरू केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. तरी ते सांगतात, अपयश जरी आले तरी शिकायला भरपूर मिळाले. त्यानंतर अहिरकर यांनी १९८४ साली हॉटेल उद्योगात नशीब आजमावले. मात्र याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपला लहान भाऊ प्रशांत अहिरकर यांच्यावर सोपवली. मार्गदर्शन अनिल यांचेच होतेच. त्यामुळे एकाचे दोन असे हॉटेल सुरू केले आणि आज पाच मोठे हॉटेल आहेत. गांजाखेत परिसरातून लहानाचे मोठे झालेले अहिरकर यांचा परिसर हा सावजी पदार्थासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. त्यामुळे  मसाल्याच्या उद्योगात त्यांनी पाऊल टाकायचे ठरवले आणि २०१२ पासून त्यांच्या कारखान्यात सर्व प्रकारचे मसाले तयार होत आहेत. यामध्ये मटण, चिकनसह भाजी मसाला, कसुरी मेथीपासून सर्व प्रकार तयार केले जातात.

उद्योगाचा उद्योग समूह होत असताना मुलगा स्वप्निलनेदेखील वडिलांच्या उद्योगाला हातभार लावला. मात्र २०१२ साली बांधकामक्षेत्रात मोठे यश मिळत असल्याने अहिरकर यांनी स्वप्निल यांना बांधकाम व्यवसायाची जबाबदारी सोपवली. आता स्वप्निल आपला व्यवसाय पुढे नेत आहेत. अनिल अहिरकर सांगतात, ‘‘घरातल्या प्रत्येक व्यक्तीने काम करणे काळाची गरज आहे. माझी मुलगी जीविका अहिरकर समूहातील इन्स्टंट फूडचे काम बघते, तर सून स्नेहा  निर्यातीची जबाबदारी यशस्वी पार पाडत आहे. उद्योगात मेहनत, जिद्द आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यास यश मिळवणे शक्य आहे.’’

अहिरकर केवळ उद्योजक नसून ते कराटेच्या प्रकारातील उत्कृष्ट खेळाडूदेखील आहेत. त्यांनी कॅरमसह विविध संस्थांचे अध्यक्षपददेखील भूषविले असून सामाजिक, राजकीय आणि क्रीडाक्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

अनिल अहिरकर  अनिलकुमार टी कंपनी

* व्यवसाय : चहा, मसाले उत्पादन

* प्राथमिक गुंतवणूक : १०० रुपये

* सध्याची उलाढाल: वार्षिक १०० कोटी रुपये

* रोजगार निर्मिती :  ४०० पूर्णवेळ कामगार

* शिक्षण :  पदवीधर

* सरकारी योजनेचा फायदा : नाही

* संकेतस्थळ : http://www.anilkumartea.com

– अविष्कार देशमुख

लेखक ‘लोकसत्ता’चे नागपूर प्रतिनिधी avishkar.deshmukh@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on anilkumar tea company abn

Next Story
स.पां.देशपांडे
ताज्या बातम्या