आसाराम लोमटे

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

वडिलांनी अत्यंत कष्टातून उभारलेल्या व्यवसायात वृद्धी करून तो अनेक अर्थाने व्यापक करण्याचे उदाहरण म्हणून सेलूच्या जयप्रकाश बिहाणी यांच्या उद्यमशीलतेकडे पाहावे लागेल. चिकाटी, परिश्रम आणि काळाची पावले ओळखून काबीज केलेली उद्योगांची विविध क्षेत्रे ही बिहाणी यांच्या उद्यमशीलतेची साक्ष आहेत. त्यातही कृषी प्रक्रिया उद्योगात असलेली त्यांची लक्षणीय कामगिरी ही या क्षेत्रातल्या नव्या उद्योजकांसाठी एक आदर्श असा वस्तुपाठ आहे. कापसावर प्रक्रिया करणारा जिनिंग-प्रेसिंग व्यवसाय, दालमिल, ‘प्लास्टिक बेस्ड फॅब्रिक्स’ अशा उद्योगांमध्ये बिहाणी कुटुंबाने मोठी प्रगती केली आहे. अर्थात हे यश आज दिसत असले तरी त्यामागे गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळाची साधना आहे.

परभणी जिल्ह्य़ातील सेलू ही त्या काळी अगदीच छोटी बाजारपेठ होती. बद्रिनारायणजी बिहाणी यांचा सुरुवातीला सेलूच्या बाजारपेठेत भुसार मालाच्या किरकोळ खरेदीचा व्यवसाय होता. ग्रामीण भागात याला फडीवर माल घेणे, असे म्हणतात. यात छोटे शेतकरी आडतीवर न जाता आपला शेतमाल फडीवर विकतात. या व्यवसायात चिकाटीने काही वर्षे काम केल्यानंतर बद्रिनारायणजी यांनी आडत व्यवसायात प्रवेश केला. या व्यवसायात काम करत असतानाच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे राहिले. आज अमृतमहोत्सवी वाटचाल केलेल्या सेलूच्या नूतन शिक्षण संस्थेचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. वडिलांची सचोटी, परिश्रमाच्या जोरावर निर्माण केलेली स्वतंत्र ओळख हाच जयप्रकाश बिहाणी यांचा आदर्श आहे. आडत व्यवसायात केवळ मालाची खरेदी-विक्री असते. त्यात नवे काही निर्माण करण्याला वाव नसतो. या खरेदी-विक्रीच्या पलीकडे जाऊन आपण उद्योग क्षेत्रात नवे काही करून दाखवावे, ही जिद्द जयप्रकाश बिहाणी यांच्या मनात निर्माण झाली. १९८० साली वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केल्यानंतर चार लाखांचे भांडवल घेऊन विजय इंडस्ट्रीज या नावाने त्यांनी १९८१ साली ऑइल मिलचे एक युनिट सुरू केले. लातूरचे उद्योजक भुतडा यांची प्रेरणा या कामी अत्यंत महत्त्वाची होती, असे ते आवर्जून नमूद करतात. १९८४ साली लहान बंधू विजयकुमार यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेही मदतीला आले. पुढे या दोन्ही बंधूंनी कृषी प्रक्रिया उद्योगात मोठी झेप घेतली. आजवरच्या यशात या बंधूंचा वाटा नक्कीच महत्त्वाचा आहे, अशी भावना जगदीश बिहाणी व्यक्त करतात. ऑइल मिल, नंतर कृषी प्रक्रिया उद्योग म्हणून बिहाणी यांनी दालमिल स्थापन केली.

मधु अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून १९९६ साली अद्ययावत अशी ऑइल मिल सुरू केली, तर २००० साली मातोश्री ऑइल इंडस्ट्रीजची स्थापना करण्यात आली.

परभणी जिल्हा कापूस उत्पादन क्षेत्रात राज्यात अग्रेसर आहे. सेलू तालुका व परिसरात कापसाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात होते. जयप्रकाश बिहाणी यांनी कापसावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगावर लक्ष केंद्रित केले. वडील व्यापार करायचे तेव्हा कापूस एकाधिकार खरेदी योजना होती. त्यामुळे या क्षेत्रात नवे काही करून दाखविण्यास वाव नव्हता. २००२ साली एकाधिकार योजना संपुष्टात आली आणि कापूस हा व्यापाऱ्यांसाठी खुला झाला. तोवर भाडेतत्त्वावर एक जिनिंग चालवण्याचा अनुभव बिहाणी यांच्या गाठीशी होता; पण त्या जिनिंगची क्षमता कमी आणि उत्पादनातील गुणवत्ताही जेमतेम असायची. त्याच वेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने कमी मनुष्यबळ आणि मोठी क्षमता, उत्तम गुणवत्तेचे उत्पादन या गोष्टी लक्षात घेऊन कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चालना दिली. यात काही सवलती होत्या. बिहाणी यांनी या क्षेत्रात काम करायचे ठरविले, मात्र जागेची अडचण होती. सेलूच्या बिनायके यांची जागा शहरालगत होती. त्यांना या उद्योगात भागीदार म्हणून सोबत घेतले. त्यातूनच २००४ साली सेलू शहरालगत दहा एकर जागेवर अद्ययावत अशा ‘बिहाणी बिनायके कोटेक्स प्रा. लि.’ (बीबीसी) या कंपनीची सुरुवात झाली. साडेतीन ते चार कोटी रुपये या प्रकल्पाची किंमत होती. परभणी जिल्ह्य़ात कापसाचे उत्पादन विक्रमी होत असल्याने अडचण नव्हती. या उद्योगात गुणवत्ता राखली तर कापसाच्या गाठीची निर्यात विदेशातही होऊ शकते हे यानिमित्ताने सिद्ध झाले. २००६ साली या प्रकल्पाची क्षमता दुप्पट करण्यात आली. अनुभवानंतर कापसाच्या जिनिंग-प्रेसिंग या व्यवसायाचे गणित बिहाणी यांना जमले आणि या क्षेत्रात त्यांची घोडदौड सुरू झाली. त्यानंतर महाराष्ट्र-आंध्र सीमेवरील भोकर येथे २००८ साली व्यंकटेश कॉटन कंपनीची स्थापना करण्यात आली. या भागात अतिशय चांगला कापूस होतो. देवानंद धूत यांच्या मदतीने बिहाणी कुटुंबाने भोकरला हे युनिट सुरू केले. तीन ऑइल मिल, दोन जिनिंग एवढा प्रक्रिया उद्योगाचा विस्तार केल्यानंतर कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये असलेले सर्व बारकावे लक्षात आले. सामान्यपणे सरकी, सोयाबीन यापासून तेल बनत असले तरीही पशुखाद्याची निर्मिती या प्रक्रिया उद्योगात मोठय़ा प्रमाणात होते. सरकीपासून १० टक्के तेल, तर ९० टक्के पशुखाद्य तयार होते. बिहाणी यांच्या प्रक्रिया उद्योगांमधून तयार होणारे पशुखाद्यही चांगल्या गुणवत्तेचे असल्याने ते हरियाणासह अनेक राज्यांमध्ये जाते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, कपात होऊ नये यासाठी शेतमालाच्या थेट खरेदीचे परवाने मिळाल्यानंतर ‘बीबीसी’ या कंपनीच्या वतीने सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांची खरेदी केली जाते. कोणतीही कपात न करता शेतकऱ्यांना योग्य तो भाव दिला जातो. मालाच्या प्रतवारीसाठी ग्रेडर नियुक्त केले आहेत. ते प्रतवारी निश्चित करतात आणि शेतकऱ्यांना तातडीने त्यांच्या मालाचे मूल्य दिले जाते.

दीर्घकाळ कृषी प्रक्रिया उद्योगात काम केल्यानंतर बिहाणी कुटुंबाने एका नव्या उद्योग क्षेत्रात प्रवेश केला. २०१२ साली ‘प्लास्टिक बेस्ड फॅब्रिक्स’ या व्यवसायात पदार्पण केले. सेलूचे नंदकिशोर बाहेती, कचरूलालजी कासट यांना सोबत घेऊन औरंगाबाद येथे ‘आर्चिड फोम अँड बबल प्रा. लि.’ या उद्योगाची स्थापना करण्यात आली. प्लास्टिकपासून बनणाऱ्या वस्तूंची निर्मिती या ठिकाणी होते. मराठवाडय़ात या प्रकारचे हे पहिलेच युनिट आहे, तर महाराष्ट्रात पुण्यानंतर औरंगाबाद येथे सुरू होणारे हे दुसरे युनिट आहे. या उद्योगातले सर्व तंत्रज्ञान अद्ययावत आहे. चीनमधून आयात केलेल्या या तंत्रज्ञानाच्या आधारे प्लास्टिकपासून अनेक महत्त्वपूर्ण उत्पादने बनविली जातात. वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणाऱ्या वस्तूंपासून ते आकर्षक बॅगांपर्यंत उत्पादनांचा यात समावेश आहे. कच्च्या मालापासून ते उत्पादनापर्यंत सर्व टप्प्यांवर गुणवत्तेकडे लक्ष देणारी विशेष यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहे.

उद्योग क्षेत्रात बिहाणी कुटुंबातील तिसरी पिढीही अग्रेसर आहे. अविनाश, मधुसूदन, गौरव, धनंजय हे चौघेही तरुण आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. प्रत्येकाच्या कामाचे क्षेत्र आखून देण्यात आलेले आहे आणि प्रत्येकाची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. यातून ज्याच्या त्याच्या निर्णयक्षमतेलाही वाव मिळतो. हे सर्व उच्चशिक्षित आहेत. १९ सदस्यांचे हे संयुक्त कुटुंब आहे. आज ८५ वर्षे वय असलेल्या मातोश्रींचे आशीर्वाद आम्हाला एकत्र बांधून ठेवतात, अशी कृतज्ञता बिहाणी यांनी व्यक्त केली. आज बिहाणी कुटुंबाची सर्व उद्योगधंद्यांमध्ये असलेली वार्षिक उलाढाल साडेचारशे ते पाचशे कोटी रुपयांच्या घरात आहे. सेलूसारख्या ग्रामीण भागात राहून उद्योगाच्या क्षेत्रात बिहाणी कुटुंबाने घेतलेली झेप ही इतर उद्योजक तरुणांसाठीही मार्गदर्शक ठरावी अशीच आहे. सेलूच्या शैक्षणिक, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतही या कुटुंबाचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग-व्यवसाय नव्या अरिष्टातून जात आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे सावट उद्योगधंद्यावर आहे. अशाही परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे वेतन देत आहोत. वर्षांनुवर्षे जे लोक आपल्या सोबत आहेत आणि ज्यांच्या परिश्रमातून व्यवसाय बहरला आहे अशा माणसांना कठीण काळात सोडून देणे बरोबर नाही, या भावनेतून आम्ही हे करीत आहोत, असे जयप्रकाश बिहाणी आवर्जून सांगतात. शासनाने अशा वेळी उद्योगांवर असलेल्या कर्जाचे व्याज माफ करायला हवे, वीज बिलातही सवलत द्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्योगधंद्यांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो आणि ज्या परिसरात उद्योग चालतात तिथे अर्थकारणालाही चालना मिळते हे तर आहेच; पण उद्योगासोबतच सेवाकार्याच्या भावनेतून शिक्षण, अध्यात्म या क्षेत्रांशी आम्ही जोडून घेतले आहे. केवळ अर्थकारण महत्त्वाचे नाही, तर आपण सामाजिक भावनेतून काही उत्तरदायित्व पार पाडले पाहिजे या उद्देशाने आचार्य किशोरजी व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य सुरू आहे, अशी माहितीही बिहाणी यांनी दिली.

जयप्रकाश बिहाणी / विजयकुमार बिहाणी

’ व्यवसाय –    कृषी प्रक्रिया उद्योग, प्लास्टिक बेस्ड फॅब्रिक्स

’ कार्यान्वयन : सन १९८१ (विजय इंडस्ट्रीज)

’ मूळ गुंतवणूक  :  साधारण चार लाख रुपये

’ सध्याची उलाढाल : सर्व उद्योगसमूहांची मिळून ४५० ते ५०० कोटी रुपये

’ डिजिटल अस्तित्व :  www.orchidfomes.com