वसंत माधव कुळकर्णी

पीजीआयएम इंडिया इमर्जिग मार्केट्स इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड

सत्तापालट झालेल्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (निकाल लागण्याआधी) फेडरल ओपन मार्केट्स कमिटीची (एफओएमसी) ४ आणि ५ नोव्हेंबरला बैठक झाली. या बैठकीत व्याज दर शून्य ते ०.२५ टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. हे पतधोरण अमेरिकेच्या सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी असल्याचे फेडरल रिझव्‍‌र्हचे प्रमुख जेरॉम पॉवेल यांनी सांगितले. प्रसंगी महागाई वाढली तरी बेरोजदारीचा दर नियंत्रणात आणला जाण्यासाठी दीर्घकाळ नीचांकी व्याजदर ठेवणे आवश्यक असल्याचे समितीचे म्हणणे आहे. त्यांच्या या ताज्या वार्तालापाचा व्हिडीओ यूटय़ूबवर उपलब्ध असून ‘डीआयवाय’ सांप्रदायिकांनी हा व्हिडीओ आवर्जून पाहावा असा आहे.

अमेरिकी मध्यवर्ती बँकेने चलन आणि रोकड सुलभतेसह सर्व प्रमुख धोरणात बदल घडवून आणला आहे. या धोरणाचे समर्थन करताना जेरॉम पॉवेल यांनी हे धोरण निम्न-उत्पन्न कुटुंबांच्या हिताचे असून त्यामुळे अधिक रोजगार उत्पन्न होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. जेरॉम पॉवेल यांनी भाषणात असे ही सांगितले की, काही काळ महागाई वाढीचा दर दोन टक्क्यांपेक्षा अधिक राहिला तरी रोजगाराची निर्मिती हे फेडचे उद्दिष्ट असल्याने महागाई आणि बेरोजगारी वाढ यापैकी वाढत्या महागाईने रोजगारीचा दर वाढणार असेल तर व्याजदर न वाढवणे आवश्यक आहे.

समष्टी अर्थशास्त्र (मॅक्रो इकोनॉमिक्स) आणि मुद्रा अर्थशास्त्र (मॉनेटरी इकोनॉमिक्स) या अर्थशास्त्राच्या दोन शाखांचा असा सिद्धांत आहे की अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यासाठी लोकांना कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक असते. कमी व्याजदर हे इच्छुक कर्जदारांना कर्ज घेण्यास प्रोत्साहित करतात. परंतु कमी व्याजदरामुळे अधिक परताव्यासाठी गुंतवणूकदार अधिक साहसी गुंतवणुकांचा मार्ग चोखाळतात. प्रगत अर्थव्यवस्थेतील नीचांकी व्याजदरामुळे या अर्थव्यवस्थांतील गुंतवणूकदार त्यांच्या देशाबाहेर गुंतवणूक करण्याच्या संधीचा शोध घेत असतात. अमेरिकेतील साहसी गुंतवणूकदारांच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी पीजीआयएम (प्रुडेन्शियल ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर) या अमेरिकेतील आघाडीच्या म्युच्युअल फंडाने २०१४ मध्ये पीजीआयएम जॉन्सन इमर्जिग मार्केट्स इक्विटी अपॉच्र्युनिटीज फंड सुरू केला. मागील महिन्यांत हा फंड पीजीआयएमच्या भारतातील उपकंपनीमार्फत भारतीय गुंतवणूकदारांना पीजीआयएम इंडिया इमर्जिग मार्केट्स इक्विटी अपॉच्र्युनिटीज फंडाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.

पीजीआयएम जॉन्सन इमर्जिग मार्केट्स इक्विटी अपॉच्र्युनिटीज फंड हा उभरत्या अर्थव्यवस्थांमधील लार्जकॅप समभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. मागील पाच वर्षांत फंडाने १२० टक्के भांडवली वृद्धी दिली आहे. ‘एमएससीआय ईएम’ हा फंडाचा मानदंड असून, हा निर्देशांक उभरत्या १० अर्थव्यवस्थांचे प्रतिनिधित्व करत असून या निर्देशांकात संबंधित अर्थव्यवस्थांमधील लार्जकॅप आणि मिडकॅप कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेत फंडांची पत निश्चित करणाऱ्या ‘लिपर’ आणि ‘मॉर्निगस्टार’ या दोन्ही पतनिश्चिती कंपन्यांनी या फंडाला ‘फाइव्ह स्टार’ रेटिंग दिले आहे. फंड गुंतवणुकांच्या ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार फंडाच्या चीन (४८.०६ टक्के), तैवान (११.७ टक्के), ब्राझील (६.५ टक्के), अमेरिका (६.२ टक्के), दक्षिण कोरिया (६.१ टक्के), भारत (५.१२ टक्के), अर्जेटिना (२.१ टक्के), पोलंड (१.६ टक्के), हॉगकाँग (१.४ टक्के), इंडोनेशिया (०.९ टक्के) आणि थायलंड (०.६ टक्के) अशा भौगोलिक प्रदेशांत गुंतवणुका आहेत. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक विवेकी ग्राहकाभिमुख (३२ टक्के) आणि आरोग्य निगा (२४ टक्के) या उद्योगात आहे. उर्वरित गुंतवणुका इंटरनेट आधारित उद्योग, दळणवळण या क्षेत्रांत आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या  निवडणुकानंतर भू-राजकीय जोखीम कमी होत असल्याने अमेरिकी डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आहे. बायडेन प्रशासन आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाबाबत असुरक्षितता (टेरिफ हाइक) कमी झाल्याने कमकुवत डॉलरची अपेक्षा आहे. जगाची कठोर व्यापार धोरणातून सुटका झाल्याचा सर्वाधिक फायदा उदयोन्मुख बाजारपेठेला होईल. शुक्रवारी डॉलरचा अन्य प्रमुख देशांच्या चलनांच्या तुलनेत मागोवा घेणारा ‘यूएस डॉलर इंडेक्स’ तीन महिन्यांचा नीचांकी पातळीवर आला आहे. निवडणूक निकालानंतर चिनी युआन आणि अन्य आशियाई चलन डॉलरच्या तुलनेत वधारलेले आढळून आले. शुक्रवारी अमेरिकेत बाजार बंद होताना चिनी युआन दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. घसरत्या डॉलरचा परिणाम गुंतवणूकदार डॉलर-नामांकित मालमत्तांतून बाहेर पडून आपला मोर्चा उदयोन्मुख बाजारपेठांकडे वळवतील. बायडेन प्रशासनाचा कल चीनबरोबर संघर्षांपेक्षा व्यापारी संबंध सुधारण्यावर असल्याने ‘रिस्क प्रीमियम’ कमी होण्यात होईल.

गेल्या आठ-दहा महिन्यांतील निरनिराळ्या देशांच्या आर्थिक प्रगतीचा (वा अधोगती) आढावा घेतल्यास, ज्या देशांचा मृत्युदर कमी आहे त्या देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात कमी घट झाली असल्याचे दिसते. अमेरिका, स्वीडन, डेन्मार्क व पोलंड या देशांमध्ये साधारण सारख्याच प्रमाणात सकल राष्ट्रीय उत्पन्नात घट झाली. या देशांचे मानवी जीव वाचविण्यासाठी अर्थव्यवस्थांकडे दुर्लक्ष झाले. ज्या देशांनी नागरिकांचे जीव वाचविण्यात तसेच आर्थिक घसरण कमीत कमी पातळीवर ठेवण्यात यश मिळविले, त्या देशांनी उपाययोजनांमधील तत्परता, अल्पकालीन टाळेबंदी, सरकारकडून पुरेशा प्रमाणात मिळालेली आर्थिक मदत याचसोबत निर्यात क्षेत्राला लवकरात लवकार गतिमान करण्यात यश मिळविल्याचे दिसते. अधिक रोजगार निर्मिती करण्यावर चीनने लक्ष दिल्याने असंख्य तरुणांसाठी रोजगार निर्माण केला; यात मुख्यत्वे वस्त्रोद्योग, तयार कपडे, पादत्राणे, घरगुती वापराच्या वस्तू, निर्यातप्रधान वस्तूंच्या उत्पादनाचा समावेश आहे. भारतात मात्र रोजगार निर्माण करण्याची क्षमता नसलेले उद्योग सुरू झाल्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या नुकसानाविषयी मौन बाळगून ‘आत्मनिर्भरते’चा डंका वाजवला जात आहे. सैन्य जसे भाकरीवर चालते आणि अन्नाची रसद तोडली की शत्रू शरण येतो. तसेच अर्थवृद्धीसाठी रोजगारनिर्मिती करण्याऱ्या उद्योगांची गरज असते. चीनने उच्च तंत्रज्ञानाशी संबंधित निर्यातीत पाय रोवण्यापूर्वी अनेक दशके किमान कौशल्यांवर आधारित वस्तू निर्माण करण्यावर भर दिला व रोजगार निर्मितीतून तसेच विदेशी चलनाच्या कमाईतून आर्थिक प्रगती साधली. सध्याचे सरकार आत्ममग्न असल्याने ‘व्होकल फॉर लोकल’चे तुणतुणे वाजवत आहे.

यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी ‘टिप्स’ नाही तर कठोर परिश्रम, सखोल विश्लेषण, बाजारपेठेचा कल समजणे आवश्यक असते. देशातील मुद्रा बाजारात विपुल रोकडसुलभता आणि नीचांकी व्याजदर असताना रुपया वधारणार नाही. गुंतवणुकीत परतावा हा दृश्य असतो तर पोर्टफोलिओतील जोखीम ही अदृश्य असते. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी बाजाराप्रति नम्रता आवश्यक असते. अनेक यशस्वी गुंतवणूकदार समभाग निवडीच्या पद्धतीविषयी बढाया मारत नाही. समभाग गुंतवणुकीतील भविष्यातील अनिश्चिततेमुळे त्यांची विद्यमान रणनीती भविष्यात अयशस्वी ठरू शकेल याची त्यांना पूर्ण जाणीव असते. आजची शिफारस बायडेन प्रशासनाच्या अपेक्षित धोरणांवर आधारित आहे. या अंदाजाला वर उल्लेख केलेल्या आधार बिंदूंचा भक्कम पुरावा आहे. महामारीपश्चात जग एका संक्रमणातून जात आहे. १० ते १५ टक्के गुंतवणूक २७ एप्रिलची शिफारस असलेल्या ‘पीजीआयएम ग्लोबल इक्विटी अपॉच्र्युनिटीज फंड’ आणि आजची शिफारस असलेल्या पीजीआयएम इंडिया इमर्जिग मार्केट्स इक्विटी अपॉच्र्युनिटीज फंडात गुंतवणूक करण्याची रणनीती गरजेची वाटते.

shreeyachebaba@gmail.com

*   म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर