scorecardresearch

बंदा रुपया : संरक्षण सज्जतेत खारीचा वाटा

तांबोळी यांचे कुटुंब मूळचे भीमाशंकरजवळ असलेल्या घोडेगाव येथील

बंदा रुपया : संरक्षण सज्जतेत खारीचा वाटा
संग्रहित छायाचित्र

महापालिकेच्या शाळेतून केवळ इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण, पण हाताशी तांत्रिक क्षेत्रातील छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांत नोकरीचा अनुभव. असा एक तरुण सत्तरच्या दशकामध्ये पुण्यात स्वत:चे काही तरी मोठे करून दाखविण्याचे स्वप्न पाहात होता. तांत्रिक विषयातील मनापासूनची आवड आणि कोणतीही नवी गोष्ट आत्मसात करण्याची हातोटीही होती, पण हातात पैसा नव्हता. अगदी पाच रुपये रोज वेतनापासून नोकरीचा प्रवास सुरू झाला. पैशाअभावीच पुढचे शिक्षण होऊ शकले नव्हते. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून करीत असलेल्या नोकरीमध्ये कमालीचा प्रामाणिकपणा, चिकाटी होती. याच भांडवलाच्या जोरावर त्याने इतरांमध्ये सहज वेगळेपण उमटून येईल, असे कौशल्य आत्मसात केले. नंतर मोठे वेतन आणि कायम नोकरीची संधी मिळत असतानाही ती नाकारून आपले स्वत:चे काही तरी करून दाखविण्याची जिद्द कायम ठेवत त्याने १९८८ मध्ये व्यवसायात पाऊल ठेवले. त्यासाठी पाच हजार रुपयांचे एक जुने लेथ यंत्र, तीसएक हजारांचे कर्ज आणि भाडय़ाची जागा होती. मात्र दृढ आत्मविश्वासाचे सर्वात मोठे भांडवल त्याच्याकडे होते. त्यावरच व्यवसायाचा पाया रचला गेला. विविध नोकऱ्यांमधून आत्मसात केलेले कौशल्य, पूर्वीचेच प्रामाणिक कष्ट, चिकाटी आणि जिद्द याच्या जोरावर कधी काळचा हा नोकरदार तरुण अल्पावधीतच एक यशस्वी उद्योजक झाला आणि आज नावारूपालाही आला.

नजीर तांबोळी, असे या उद्योजकाचे नाव..  पुण्याच्या धायरीमध्ये पुणे-सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे ‘तांबोळी इंजिनीअर्स प्रा. लि.’ या नावाने त्यांचा उद्योग कार्यरत आहे. विशेषत: लष्करातील संरक्षणविषयक साहित्य आणि मशीन टुलिंगमध्ये त्यांचे काम वैशिष्टय़पूर्ण आहे. हवाईदलातील लढाऊ विमानांपासून, सीमेवरील तोफा, जहाजे आणि क्षेपणास्त्रात वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेतील महत्त्वाचे भाग तांबोळी यांनी तयार करून दिले आहेत. त्यांच्या या कामासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनेही (डीआरडीओ) त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविलेले आहे. डीआरडीओसह तांबोळी हे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एल अ‍ॅण्ड टी, भारत फोर्ज, सीमेन्स, अल्फा लावल आदींसाठी कामे करतात.

तांबोळी यांचे कुटुंब मूळचे भीमाशंकरजवळ असलेल्या घोडेगाव येथील. नजीर यांचे वडील पुण्यात स्थायिक झाले. लक्ष्मीनगरच्या महापालिकेच्या शाळेमध्ये ते सातवी उत्तीर्ण झाले. टेक्निकल विषयाची लहानपणापासूनच आवड असल्याने त्यांनी या विषयात मराठा हायस्कूलमध्ये आठवीला प्रवेश घेतला. मात्र ऐन परीक्षेला आजारी पडल्याने परीक्षा देता आली नाही. शिक्षण पुढे सुरूच ठेवायचे या इच्छेने शालेय शिक्षणाच्या वयात त्यांनी नोकरी सुरू केली. सुरुवातीला स्वारगेटच्या पंडित इंजिनीअर्समध्ये दोन रुपये रोजावर मजुरी, तर नंतर देसाई इंजिनीअर्समध्ये दिवसाला पाच रुपये वेतनाची नोकरी केली. याच दरम्यान थेट अकरावीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. वयाचे एक वर्ष कमी पडल्याने ती देता आली नाही. नियमित विद्यार्थी म्हणून परीक्षा देता येईल, असा सल्ला शिक्षकांनी दिला. पण त्यासाठी लागणारे ३५० रुपये काही केल्या जमले नाहीत. कुणी मदतही दिली नाही. त्यामुळे शिक्षण तिथेच थांबले.

रामवाडीच्या जॉली स्टीलमध्ये पुढील नोकरी सुरू झाली. घरापासून २५ किलोमीटर अंतर सायकलवरून जाणे आणि ओव्हरटाइम करून रात्री घरी येणे, हे पाच वर्षे सुरू राहिले. त्यानंतर पुन्हा नोकरी बदलली आणि ट्रॅम्फ इंजिनीअर्समध्ये काम सुरू केले. याच काळातच स्वत:चा छोटासा व्यवसाय करण्याचा विचार मनात घट्ट झाला. ट्रॅम्फमध्ये केएसबी पंप या मोठय़ा उद्योगासाठी जॉबवर्क केले जात होते. त्याच्या उत्पादनाचे सर्व काम तांबोळीच पाहात असल्याने केएसबीतील काही अधिकाऱ्यांशी त्यांची ओळख झाली होती. मनात सर्व गणिते जुळून आली होती आणि आता नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा विचार पक्का झाला होता. हा विषय तांबोळी यांनी केएसबीमधील उत्पादन विभागाच्या प्रमुखांना सांगितला. त्यांनी केएसबीमध्ये कायमची नोकरी, दुप्पट वेतनाचा प्रस्ताव ठेवला. नोकरीत सुरक्षितता असली तरी त्यामुळे आपले व्यवसायाचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे माहीत असल्याने या प्रस्तावाला तांबोळी यांनी काही वेळ घेऊन नकार दिला आणि व्यवसायाची जुळवाजुळव सुरू झाली.

ट्रॅम्फ इंजिनीअर्सच्या वरिष्ठांशी बोलून त्यांच्याकडील एक जुने लेथ मशीन पाच हजार रुपयांना, तेही उधारीवर घेतले. धायरीमध्ये छोटेसे शेड मिळाले. लगेचच नोकरी न सोडता दिवसा नोकरी आणि रात्री स्वत:चे काम सुरू केले. आठ महिन्यांनंतर मात्र नोकरी सोडून संपूर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रित केले. सुरुवातीच्या काळात कंपनीसाठी स्पिंडल्स बनविण्याचे काम सुरू केले. त्यांचे काम आवडल्याने काही कंपन्यांनी त्यांना अनेक प्रकारचे कम्पोनंट तयार करण्याचे काम दिले. त्यानंतर तांबोळी यांनी महाराष्ट्र इंजिनीअर्स हे नाव त्यांच्या व्यवसायास दिले. अपार मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हळूहळू व्यवसायात वाढ होत गेली. १९९५ मध्ये भारत फोर्जमधून कामे मिळण्यास सुरुवात झाली. व्यवसाय वाढत असताना अतिरिक्त जागेची गरजही भासू लागली. सुरुवातीला भाडय़ाने, तर नंतर नांदेड फाटा औद्योगिक भागात पाच हजार चौरस फुटांची जागा विकत घेऊन त्यावर उद्योग वसवला. त्यानंतर गरजेनुसार जागेची खरेदी सुरूच राहिली. वाढलेला व्यवसाय लक्षात घेऊन आज तांबोळी यांचा उद्योग ४० हजार चौरस फुटांमध्ये विस्तारला आहे. तज्ज्ञ आणि कुशल कामगार त्याचप्रमाणे कोटय़वधी रुपयांची यंत्रणा उद्योगात उभारण्यात आली आहे. २५ ते ३० हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेला हा उद्योग आता सुमारे ८० कोटी रुपयांच्या उलाढालीवर पोहोचला आहे.

सध्या कम्पोनंट आणि लष्कराच्या विविध साहित्यांसाठी काम करणाऱ्या मोठय़ा उद्योगांना तांत्रिक भाग तयार करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम तांबोळी यांच्या उद्योगात केले जाते. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या चार शाखांसाठी ते कामे करतात. डीआरडीओ आणि सीमेन्सच्या चेन्नई शाखेसाठी त्यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. संरक्षण साहित्यासाठी तांबोळी यांच्या उद्योगाला कच्च्या साहित्याची उपलब्धता करून दिली जाते. ते टायटेनियम आणि निकेलच्या धर्तीवर असल्याने अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे त्याच्या कामात मायक्रो-मिलिमीटरचीही चूक केली जात नाही. अशाच प्रकारे गुणवत्तापूर्ण कामे होत असल्याने संरक्षण विभागातील काही महत्त्वाचे साहित्य केवळ तांबोळी यांच्याकडूनच करून घेण्यास कंपन्या प्राधान्य देतात. कम्पोनंट बसविण्यामध्येही तांबोळी यांच्या उद्योगाचा हातखंडा आहे. काही दिवसांपूर्वी सीमेन्सने त्यांना एक नाकारलेला कम्पोनंट दिला आणि त्यावर काम करण्यास सांगितले. त्यात काही बदल करून तो कंपनीला पुन्हा पाठविला. त्याची तपासणी झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला, कारण कामातून गेलेला हा कम्पोनंट पुन्हा उपयुक्त झाला होता. त्यानंतर विंडमिलसाठी वापरले जाणारे कम्पोनंट तयार करण्याचे मोठय़ा प्रमाणावरील काम तांबोळी यांना मिळाले. त्यातून कंपनीची उलाढाल दुप्पट होऊ शकणार आहे. केवळ या कामासाठी तांबोळी यांनी सहा कोटी रुपयांची नवी यंत्रणा उभारली आहे. आजवर चीन आणि जर्मनहून आयात होणारे हे कम्पोनंट आता तांबोळी यांच्या उद्योगात तयार होत आहेत. संरक्षण साहित्यासाठी महत्त्वाचे काम आपल्याकडून होत असल्याबाबत अभिमान वाटत असल्याची भावना तांबोळी व्यक्त करतात. या कामासाठी आणखी मोठी यंत्रणा खरेदी करण्याचा आणि भारतात तयार न होणाऱ्या तांत्रिक गोष्टी भविष्यात तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. सामाजिक कामातही ते सातत्याने अग्रेसर असतात. पुण्यातील तांबोळी समाजाच्या अध्यक्षपदीही ते कार्यरत आहेत.

सातवीपर्यंतचे शिक्षण, पण केवळ अनुभवातून मिळालेल्या तांत्रिक शिक्षणाच्या आधारे तांबोळी यांनी उद्योगात मोठी भरारी घेतली आहे. त्यातून स्वत:ची प्रगती साधण्याबरोबरच ते देशाच्या संरक्षण सज्जतेतही खारीचा वाटा उचलत आहेत.

नजीर तांबोळी  तांबोळी इंजिनीअर्स प्रा. लि. धायरी, पुणे</p>

* व्यवसाय – संरक्षण साहित्यातील तांत्रिक भाग, मशीन टुलिंग

* कार्यान्वयन : १९८८ साली

* मूळ गुंतवणूक : सुमारे ३० हजार रुपये

* सध्याची उलाढाल : वार्षिक ८० कोटी रुपये

– पावलस मुगुटमल

* लेखक ‘लोकसत्ता’चे पुण्याचे प्रतिनिधी

pavlas.mugutmal@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-06-2020 at 01:05 IST