अर्थ वृत्तान्तमध्ये दर सप्ताहाला प्रसिद्ध होणाऱ्या ‘कत्रे म्युच्युअल फंडां’च्या यादीचे दरवर्षी पुनरावलोकन केले जाते. मूळ पन्नास फंडांचा समावेश असलेल्या यादीचे संक्षिप्त रूपच दर सोमवारी अर्थ वृत्तान्तमधून प्रसिद्ध होते. या वर्षीचे पुनरावलोकन नुकतेच पूर्ण झाले. या पुनरावलोकनातून निकषात न बसणारे काही फंड या यादीतून गाळले गेले तर काहींचा नव्याने समावेश झाला. या फेरबदलासंबंधी ‘फंड्स सुपरमार्ट डॉट कॉम’च्या  संधोधन प्रमुख डॉक्टर रेणू पोथेन यांनी ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’शी केलेली ही बातचीत.
* या वर्षी शिफारस केलेल्या फंडांच्या यादीबद्दल काय सांगाल?
– आमच्या यादीत पन्नास फंड आहेत. यामध्ये २९ समभाग गुंतवणूक करणारे (इक्विटी) फंड, १६ रोख्यात गुंतवणूक करणारे (डेट) फंड व दोन्ही प्रकारच्या गुंतवणूक असणाऱ्या पाच (बॅलेन्स्ड) फंडांचा या यादीत समावेश आहे. या वर्षीची धक्कादायक बाब अशी की, २०११ पासून या यादीत समावेश असलेले फ्रँकलिन टेम्पल्टन ब्लूचीप व यूटीआय अपॉच्र्युनिटी या दोन लार्ज कॅप फंडांचा नव्या यादीत समावेश नाही. आमचे फंड शिफारस करण्याचे जे मॉडेल आहे, त्या मॉडेलमध्ये काही शर्ती आहेत. हे दोन फंड या शर्तीची पूर्तता करू न शकल्याने या फंडांना बाहेर जावे लागले. तसेच २०१३ मध्ये या यादीत समावेश झालेल्या एसबीआय इमìजग बिझनेसेस फंडही यावर्षीच्या यादीतून बाहेर गेला. आमच्या मिडकॅप फंडांच्या यादीतील हा अत्यंत यशस्वी फंड होता.
* जे फंड यादीतून बाहेर गेले त्यांच्यासाठी हा ‘एग्झिट  कॉल’ समजायचा का?
– तसे नाही. तुम्ही एकदा का निकष ठरविले की या निकषांची पूर्तता करणाऱ्यांनाच या यादीत स्थान मिळते. साहजिकच निकषांची पूर्तता न झाल्याने या फंडांना यादीबाहेर जावे लागले. या फंडाचे निधी व्यवस्थापक हे देशातील अव्वल निधी व्यवस्थापकांपैकी आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या फंडात आधीच गुंतवणूक केली आहे किंवा ज्यांच्या एसआयपी सुरु आहेत, त्यांनी या फंडांतून बाहेर पडण्याची किंवा आपल्या एसआयपी थांबविण्याची आवश्यकता नाही.
* एसबीआय इमìजग बिझनेसेस हा अव्वल परतावा देणाराही फंडदेखील यादी बाहेर कसा गेला?
– आमच्या यादीत २०१३ पासून असलेल्या ‘एसबीआय इमìजग बिझनेसेस फंडा’चा परतावा मागील दोन वर्षांत अव्वल आहे. आमच्या निकषांवर हा फंड आता निव्वळ मिड कॅप फंड राहिलेला नाही. सध्याच्या या फंडाच्या गुंतवणुका पाहता हा मल्टि कॅप फंड बनलेला आहे. साहजिकच ३५ टक्के निधी हा लार्ज कॅप प्रकारच्या गुंतवणुकीत आहे. येत्या काही वर्षांत निव्वळ मिड व स्मॉल कॅप गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या तुलनेत या फंडाच्या परताव्याचा दर कमी असेल. या फंडाचे व्यवस्थापन हे निश्चितच एका द्रष्टय़ा निधी व्यवस्थापकाच्या हाती आहे.  त्यांच्या निधी व्यवस्थापनाबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही. परंतु फंडाच्या उद्दिष्टांनुसार गुंतवणूक करणे हा आमचा एक निकष आहे. फंडाची उद्दिष्टे व सध्या असलेल्या गुंतवणुका यात तफावत आढळल्याने आम्ही या फंडाचा आमच्या शिफारस प्राप्त फंडांच्या यादीत समावेश केलेला नाही. अशीच गोष्ट अ‍ॅक्सिस इक्विटी म्युच्युअल फंडाची आहे. या फंडाच्या गुंतवणुका ७० टक्के लार्ज कॅप व ३० टक्के मिड कॅप शेअर्समध्ये आहेत. आम्हाला या फंडाच्या भविष्यातील परताव्याच्या दराबाबत शंका नाही. आम्ही मल्टि-कॅप फंड म्हणून यापुढेही या फंडाची शिफारस करत राहू.
* आणखी कुठल्या फंडाची कामगिरी विशेष उल्लेख करावा अशी होती?
– मिरॅ अ‍ॅसेटच्या दोन्ही फंडांची कामगिरी विशेष उल्लेख करावा अशी आहे. मिरॅ अ‍ॅसेट इमर्जिग ब्लूचीप व मिरॅ अ‍ॅसेटच्या अपॉच्र्युनिटीज् या फंडांची कामगिरी उल्लेखनीय म्हणावी लागेल. गोपाल अग्रवाल हे या दोन्ही फंडांचे निधी व्यवस्थापक आहेत. आमचे फंड शिफारस करण्याचे जे निकष आहेत त्या सर्व निकषांची तीन वष्रे व पाच वष्रे कालावधीसाठी पूर्तता करणारे हे फंड आहेत. या फंड घराण्यांची मालमत्ता १,८१४ कोटी असून या पकी १,६०० कोटी समभाग गुंतवणुका आहेत. हे या फंड घराण्याचे वैशिष्टय़ आहे. फंड लहान असो किंवा मोठा, जर बाजारात मंदीतही अव्वल परतावा देणारा फंड असेल तर गुंतवणूकदार अशा फंडात नेहमीच गुंतवणूक करतात. कोणी कितीही अपप्रचार केला तरी गुंतवणूकदार अव्वल कामगिरी करणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहतात.     
* डीएसपी ब्लॅकरॉक मायक्रो-कॅप फंडाची दोन वर्षांनतर घर वापसी झालेली दिसते..
डीएसपी ब्लॅकरॉक मायक्रो-कॅप फंड जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा हा फंड मुदतबंद (क्लोज एंडेड) फंड होता. २५ जून २०१० पासून हा फंड गुंतवणुकीसाठी कायम खुला झाल्यानंतर आम्ही या योजनेचा समावेश आमच्या शिफारस फंडांच्या यादीत केला. आमच्या निकषांमध्ये हा फंड न बसल्याने २०११ मध्ये या फंडाला यादीतून वगळण्यात आले. या फंडाचा परतावा अव्वल असल्याने व या फंडाने गुंतवणुकीस कायम खुली असलेली योजना म्हणून चार वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याने आम्ही या फंडाचा समावेश आमच्या यादीत केला आहे. या फंडाचा परतावा अव्वल आहेच परंतु हा फंड आपल्या गुंतवणूक उद्दिष्टांशी प्रामाणिक असलेला म्हणजे खऱ्या अर्थाने मायक्रो-कॅप फंड आहे. मध्यंतरी एका वेळी एकाच गुंतवणूकदाराची कमाल दोन लाख इतकीच गुंतवणूक हा फंड स्वीकारत होता. या फंडाने नवीन मोठय़ा गुंतवणुका स्वीकारणे बंद केले होते.  आम्ही या फंडाची शिफारस ‘एसआयपी’साठी करीत आहोत.        
* नव्या यादीची फंड घराण्यांच्या नुसार काय परिस्थिती आहे?
– आयसीआयसीआय प्रुडेन्शियल हे फंड घराणे आपल्या आठ फंडांच्या कामगिरीच्या जोरावर प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कॅनरा रोबेको व रिलायन्स म्युच्युअल फंड या फंड घराण्यांचे प्रत्येकी सहा फंड आहेत. तिसऱ्या क्रमांकावर प्रत्येकी चार फंडासह बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड व फ्रँकलिन टेम्पल्टन आहेत. आम्ही अशी शिफारस २००९ पासून करीत आहोत. या वर्षी पहिल्यांदाच कोटक म्युच्युअल फंडाच्या ‘कोटक सिलेक्ट फोकस’ या योजनेमुळे कोटक म्युच्युअल फंडाला या यादीत पहिल्यांदा स्थान मिळाले आहे.