फंडाचा ‘फंडा’.. : बदलत्या कार्यसंस्कृतीचा लाभार्थी!

भारत हा इंटरनेट वापरकर्त्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेला देश आहे.

अतुल कोतकर
भारत हा इंटरनेट वापरकर्त्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेला देश आहे. ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार देशभरात रोज ७४.९ कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. इंटरनेट वापरकर्त्यांच्या यादीत भारत रोज नवे उच्चांक प्रस्थापित करीत असून हा आकडा २०४० पर्यंत १.५ अब्ज वापरकर्त्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची ऑनलाइन बाजारपेठ आहे. देशातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी बहुसंख्य लोक त्यांच्या मोबाइल फोनद्वारे इंटरनेट वापरतात. देशभरात नेटकऱ्यांइतकेच स्मार्टफोन वापरणारे आहेत. मोबाइल डेटाची स्वस्त उपलब्धता, डेस्कटॉप आणि टॅब्लेटच्या तुलनेत स्मार्टफोन वापरस्नेही असणे ही त्यामागे कारणे आहेत. इंटरनेट साक्षरता आणि तांत्रिक ज्ञानामुळे देशातील प्रौढांपेक्षा तरुणांचा डेटा वापर हा उपलब्ध डेटा मर्यादेपेक्षा अधिक होत आहे.

टाटा डिजिटल इंडिया फंड हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक संधींचा लाभ घेणारा फंड आहे. गुंतवणुकीचा परीघ मर्यादित असल्याने फंडाच्या गुंतवणुकीत ३० ते ३५ कंपन्यांचा समावेश असतो. समभाग केंद्रित गुंतवणुका असल्याने ‘धाडसी’ गुंतवणूकदारांनी या फंडात गुंतवणुकीचा विचार करावा. जोखीम सहिष्णुता कमी असल्यास या फंडात गुंतवणूक टाळावी.

फंडाचा मानदंड असलेल्या एस अ‍ॅण्ड पी बीएसई आयटी निर्देशांकाने २४ ऑगस्ट रोजी वार्षिक ८७.७५ टक्के परतावा दिला आहे. मानदंडाच्या तुलनेत फंडाचा संदर्भ परतावा १०७.३५ टक्के आहे. इतका घसघशीत परतावा मिळण्यास अनेक कारणे आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कंपन्यांच्या उत्सर्जनाच्या वृद्धीत बँकिंग आणि वित्तीय सेवा-उद्योगाचा मोठा वाटा असतो. मागील दोन वर्षांपासून या क्षेत्रातून कामाची मागणी अतिशय कमी प्रमाणात नोंदविली जात होती. करोनापश्चात सर्वच उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना तंत्रज्ञानबदल अपरिहार्य झाला आहे. सर्वच उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना जे बदल अंगिकारावे लागत आहेत ते पाहता माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना पुढील तीन-चार वर्षे सुगीची असतील. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे ग्राहक ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यसंस्कृतीशी सुसंगत तंत्रज्ञान मंचावर संक्रमण करीत आहेत. उपलब्ध मर्यादित परिघातील कंपन्यांची निवड करण्यासाठी निधी व्यवस्थापक अतिशय कठोर निकष लावतात. मूलभूतदृष्टय़ा सुदृढ व्यवसाय उत्सर्जनात वृद्धी दृष्टिपथात आहे आणि ज्या कंपन्या वाजवी मूल्यांकनावर उपलब्ध आहेत अशा कंपन्यांची निवड निधी व्यवस्थापिका करीत असतात.

निधी व्यवस्थापक कंपन्यांची गुणात्मक तसेच व्यवस्थापनाचा दर्जा, धोरणात्मक आणि व्यवसायिक संधी, स्पर्धात्मक फायदे, आपल्या सेवा किंवा उत्पादनाची किंमत निश्चित करण्याची क्षमता आणि ताळेबंद विश्लेषण करून गुंतवणुकीत समावेश करण्याचा किंवा वगळण्याचा निर्णय घेतात. मागील सहा महिन्यांत, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो इन्फोटेक, ईक्लर्क, रेलटेल, टाटा कम्युनिकेशन्स, मास्टेक आणि नव्याने सूचीबद्ध झालेला झोमॅटो या व इतर कंपन्यांचा समावेश फंडाने गुंतवणुकीत केला आहे. नियामकांनी फंडाला २० टक्क्य़ांपर्यंत परदेशात गुंतवणूक करण्याची अनुमती दिली असून सध्या अमेझॉन इन्कचा गुंतवणुकीत समावेश असून उपलब्ध संधीनुसार परदेशातील गुंतवणुकीत वाढ करण्याचा निधी व्यवस्थापकांचा मानस आहे.

कंपन्यांचे व्यवस्थापन आणि समभाग विश्लेषक यांचा माहिती-तंत्रज्ञान उद्योगाच्या वृद्धीबाबतचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. कंपन्यांच्या तिमाही निकालाचे विश्लेषण केले असता मागील तिमाहीत नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या (अ‍ॅट्रिशन रेट) ३० टक्कय़ांदरम्यान आहे. याचाच अर्थ माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना नवीन कंत्राटे मिळत असल्याने कंपन्या कर्मचाऱ्यांची भरती करीत आहेत. म्हणूनच आपल्या गुंतवणुकीत एक आयटी उद्योगाशी संबंधित फंड असावा या दृष्टिकोनातून ही शिफारस.

atulkotkar@yahoo.com

मिता शेट्टी, निधी व्यवस्थापिका, टाटा डिजिटल इंडिया फंड

भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाची मागील काही वर्षांतील वार्षिक वृद्धीदराची सरासरी ८ टक्के होती. परंतु आता करोनापश्चात येत्या दोन-तीन वर्षांसाठी भारतीय माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचा वार्षिक वृद्धीदर दोन अंकी असेल. डिजिटलायझेशन, आयओटी, क्लाउड मायग्रेशन, अ‍ॅनालिटिक्स इत्यादीमुळे भारतीय माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

टाटा डिजिटल इंडिया फंड

६  फंड गट  इक्विटी – सेक्टोरल (आयटी)

६  फंडाची सुरुवात   २८ डिसेंबर २०१५

६  फंड मालमत्ता २,१७९ कोटी (३१ जुलै २०२१ रोजी)

६  मानदंड एस अ‍ॅण्ड पी बीएसई आयटी टीआरआय

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Beneficiary changing work culture india internet online market ssh

ताज्या बातम्या