scorecardresearch

माझा पोर्टफोलिओ: शहर पायाभूत सुविधांतील ‘अनन्यता’ लाभकारी

गेल आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने १९९५ मध्ये स्थापन झालेली महानगर गॅस लिमिटेड ही शहर गॅस वितरणाच्या (सीजीडी) व्यवसायात गुंतलेली आहे.

अजय वाळिंबे

गेल आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने १९९५ मध्ये स्थापन झालेली महानगर गॅस लिमिटेड ही शहर गॅस वितरणाच्या (सीजीडी) व्यवसायात गुंतलेली आहे. गेल ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील कंपनी आणि भारतातील सर्वात मोठी नैसर्गिक गॅस ट्रान्समिशन कंपनी आहे. सध्या मुंबई शहरासह लगतच्या भागात आणि महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात महानगर गॅस घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवते. कंपनीचे कार्बन स्टील आणि पॉलिथिलीन पाइपलाइनचे जवळपास ६,००० किमीचे विस्तृत जाळे असून सुमारे १८.३ लाख घरगुती ग्राहक आहेत. कंपनी सुमारे ४,३०० व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना देखील सेवा देते.

महानगर गॅसची २८१ सीएनजी स्टेशन्स तसेच १,६८८ डिस्पेंसिंग पॉइंट्सचे सुस्थापित जाळे मुंबई आणि त्याच्या लगतच्या भागात पसरलेले आहे. सध्या, कंपनी आपल्या बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भाईंदर तसेच रायगड जिल्हा इ. भौगोलिक भागात सुमारे ८.५ लाख सीएनजी ग्राहकांना सेवा देते.

कंपनीला सीएनजी आणि घरगुती पीएनजीसाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि गेलकडून प्रामुख्याने प्रशासकीय किंमत यंत्रणा अंतर्गत नैसर्गिक वायू प्राप्त होतो. हे औद्योगिक / व्यावसायिक पीएनजी विभागांसाठी प्रामुख्याने बीपीसीएल, आयओसीएल, एचपीसीएल, गेल, जीएसपीसीएल, हाजिरा एलएनजी, इ. सारख्या विविध कंपन्यांकडून मुदतीच्या/ स्पॉट खरेदीतून मिळते. महानगर गॅस पाइपलाइनच्या सीजीडी नेटवर्कच्या विस्तृत नेटवर्कद्वारे नैसर्गिक गॅसचे वितरण करते, ज्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाच्या (सीटी किंवा स्थानिक नैसर्गिक वायू वितरणासाठी एक्सक्लुझिव्हिटी) त्यांना सीजीडी नेटवर्क बसविणे, तयार करणे, विस्तृत करणे आणि ऑपरेट करण्याचे विशेष अधिकार आहेत. मुंबई क्षेत्र आणि रायगड जिल्हा येथे २०४० पर्यंत कंपनीला ‘इन्फ्रास्ट्रक्चर एक्सक्लुसिव्हिटी’ आहे.

कंपनीचे डिसेंबर २०२१ साठी जाहीर झालेले आर्थिक निष्कर्ष तितकेसे चांगले नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीत उलाढालीत ५३ टक्के वाढ होऊन ती १,०२८ कोटी रुपयांवर गेली असली तरीही जागतिक बाजारपेठेत एपीएम गॅसच्या किमतीत झालेल्या भरमसाट वाढीमुळे नक्त नफ्यात तब्बल ७४ टक्के घट होऊन तो ५७ कोटी रुपयांवर आला आहे. रशिया – युक्रेन युद्धामुळे अनिश्चिततेचे सावट कायम असल्याने आताच्या तिमाहीतही कंपनीकडून फारशा चांगल्या अपेक्षा नाहीत. मात्र युद्धाचे सावट कायम राहणार नाही तसेच अत्यल्प कर्ज असलेल्या या कंपनीकडून सीएनजी आणि पीएनजी दरामध्ये पुन्हा वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून प्रत्येक पडझडीला घेण्यासारखा हा शेअर आहे. महानगर गॅसप्रमाणेच इंद्रप्रस्थ गॅस किंवा गुजरात गॅससारख्या कंपन्यांचाही अवश्य विचार करावा.

महानगर गॅस लिमिटेड(बीएसई कोड – ५३९९५७)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ७६९/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. १,२८४ / ६८०

बाजार भांडवल : रु. ७,५९२ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ९८.७८   कोटी शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

  • प्रवर्तक :      ३२.५०   
  • परदेशी गुंतवणूकदार : २५.३२   
  • बँक/ म्यु. फंड/ सरकार : २९.०५   
  • इतर/ जनता  :  १३.१३

संक्षिप्त विवरण

  •  शेअर गट     : स्मॉल कॅप
  •  प्रवर्तक         : गेल इंडिया लिमिटेड
  •  व्यवसाय क्षेत्र : सीएनजी/ पीएनजी
  •  पुस्तकी मूल्य : रु. ३५४.५०
  • दर्शनी मूल्य   : रु. १०/-
  • गतवर्षीचा लाभांश : २३०%

शेअर शिफारसीचे निकष

  •  प्रति समभाग उत्पन्न : रु. ६८.६३
  •  पी/ई गुणोत्तर :         ११.२
  •   समग्र पी/ई गुणोत्तर : २२.७५
  •   डेट इक्विटी गुणोत्तर : ०.०२
  •   इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :  १२८
  •  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :२६.६
  •   बीटा : ०.७

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Benefiting uniqueness infrastructure company business customer amy