प्रत्येक वस्तूची, उत्पादनाची एक भूमिती असते. ती रचना बदलून चालत नाही. विशेषत: दुचाकी किंवा अन्य कोणत्याही वाहनाच्या इंजिनमध्ये नाना प्रकारचे सुटे भाग असतात. ते एकमेकांमध्ये बसवताना त्यांनी अपेक्षित तेवढीच हालचाल किंवा काम करणे अभिप्रेत असते. अशी बांधणी करून त्याची भूमिती बिघडू न देता दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी क्षेत्रातील ‘फिक्स्चर’ उत्पादने तयार करण्याच्या उद्योगात श्रीधर नवघरे काम करतात. रस्त्यावर धावणाऱ्या कोणत्याही दुचाकी आणि चारचाकीमध्ये त्यांनी संकल्पित केलेला भाग नसेल असे होणार नाही, असा त्यांचा दावा आहे.

मायक्रॉनमधील मोजणींच्या आधारे प्रत्येक रचना जिथल्या तिथे राहावी म्हणून नवघरे यांच्या तीन कंपन्यांमध्ये काम सुरू आहे, पण व्यवसाय कधीच फक्त पैशाने उभा करता येत नाही, तर त्यासाठी सातत्याने पारदर्शी निर्णय घेण्याची क्षमता, आव्हानात्मक काम स्वीकारून पुढे जाण्याची वृत्ती असावी लागते. सुधीर नवघरे यांचा उद्योजकतेचा प्रवास या सूत्राच्या आधारे सुरू आहे.

मोठा उद्योग सुरू करू असे स्वप्न पाहणेही श्रीधर नवघरे यांना शक्य नव्हते. उस्मानाबादच्या तेरणा अभियांत्रिकी विद्यालयात १९९१ साली पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक मोठय़ा कंपन्यांमध्ये नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न केले,. पण ती बहुतेकांनी नाकारली. व्यवसाय करावा असे कधी मनात नव्हतेच. त्यामुळे गिरीश इंजिनीअरिंग या लघू उद्योगात त्यांना नोकरी मिळाली. सुरुवातीला अगदीच कमी वेतनावर नोकरी करतानाही एखादा कामगार सुट्टीवर असेल तर ती मशीन चालविण्याचे काम करणे हा त्यांचा छंद होता, पण नोकरीत समाधान काही मिळत नव्हते. ती नोकरी सोडून अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करावी असा विचार आला, पण नवघरे यांना त्यांच्या भावामुळे या विचारावर पाणी सोडावे लागले. ‘प्राध्यापकच व्हायचे तर इंजिनीअर कशाला झालास,’ असे ते म्हणाले. पुन्हा काही दिवस पूर्वीची नोकरी कायम ठेवली. याच काळात कच्चा माल पुरविणाऱ्या हिंदाणी यांच्याशी ओळख झाली. तेव्हा एखादा कच्चा माल मिळत नसेल तर त्यासाठी पर्यायी कच्चा माल कोणता हे ते सांगत. माल मागविताना दिसणारी हुशारी जोखल्यानंतर हिंदाणी यांनी स्वमालकीच्या भूखंडावर नवा व्यवसाय करण्याबाबत विचारणा केली.

श्रीधर सांगतात, ‘उद्योगासाठी लागणारे भूखंड औद्योगिक वसाहतीमध्ये विकत कसे मिळतात याचीही माहिती नव्हती. तशा स्थितीत तो माणूस स्वत:हून व्यवसाय करायला बोलावत होता, पण मन धजावत नव्हते. याच काळात बजाज ऑटो, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या कंपन्यातील अधिकाऱ्यांबरोबर ओळखी झाल्या होत्या. त्यांना स्वतंत्र व्यवसाय करू, असे विचारले, तर त्यांनीही व्यवसायाला मदत करण्याचेही आश्वासन दिले.’

काही दिवस भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला. लेथ मशीनसह काही यंत्रे विकत घेतली. स्वत:जवळचे ५० हजार आणि भागीदाराचे अडीच लाख रुपये इतक्या भांडवलातून व्यावसाय उभा राहिला, पण तंत्रज्ञान बदलत होते आणि त्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास भागीदाराची तयारी नव्हती. तेव्हा महिन्याला दहा हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळत असे. याच काळात लग्न झाले आणि सुदैवाने पत्नी प्राध्यापकच मिळाली. नोकरी न करता व्यावसायिक व्हावे यासाठी पत्नीने देवगिरी सोसायटीतून दीड लाख रुपयांचे कर्ज काढले. घरातील सोने मिळून तीन लाख रुपयांच्या भांडवलावर पुन्हा व्यवसाय वाढविण्याचे ठरविले. तेव्हा तीन मित्रांसमवेत भागीदारी करावी, असे वाटत होते. तिघांनी मिळून भूखंडही विकत घेतला, पण नंतर लक्षात आले की, आपले सूर फारसे जुळणार नाहीत. ते दोघे बाजूला झाले आणि ‘एएसआर इंजिनीअरिंग प्रा. लि.’ ही कंपनी सुरू झाली.

या सगळया व्यवसाय उभारणीमध्ये एक बाब प्रकर्षांने जाणवत गेली. ती म्हणजे किचकट वाटणाऱ्या कामांना स्वीकारण्याची तयारी. व्यवसाय करताना आपल्याकडे असणारे सारे कौशल्य वापरायचे आणि त्रासदायक वाटणाऱ्या समस्येतून ग्राहकाला सोडवायचे असे सूत्र स्वीकारून काम करत आहे. ‘फिक्स्चर’ ही इंजिनमध्ये वेगवेगळे सुटे भाग पकडून ठेवणारी यंत्रणा म्हणता येईल. यंत्रातील कोणत्याही सुटय़ा भागाने त्याची जागा अगदी मायक्रॉनमध्ये सोडली तरी यंत्र बिघडते. मीटर किंवा मिलिमीटरच्या भाषेत सांगायचे झाल्यास, मायक्रॉन हे परिमाण म्हणजे एका मीटरचा दहा लाखावा अथवा एका मिलिमीटरचा हजारावा भाग ठरतो. यंत्राच्या दोन भागांमध्ये इतकी सूक्ष्मतम जागाही राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्याचे संकल्पन आणि त्याचे फिक्स्चर तयार करावे लागतात. विशेषत: ज्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात उत्पादने करायची असतात तेथे अशी भूमितीय रचना चुकून चालत नाही. कोणत्या संदर्भबिंदूला पकडून किती हालचाल व्हावी हे ठरविण्यासाठी आता खूप सारी यंत्रसामग्री निघाली आहे. तयार केलेले उत्पादन योग्य त्या परिमाणात मिळणे यासाठी लागणारे फिक्स्चर तयार करणाऱ्या ‘एएसआर’ कंपनीने आतापर्यंत सात हजारांहून अधिक ‘फिक्स्चर’ तयार केले आहेत.

दुचाकी, तीनचाकी किंवा चारचाकी गाडीमधील ‘सिलेंडर ब्लॉक, ‘सिलेंडर हेड’, ‘क्रँक केस’, ‘गिअर बॉक्स हाऊसिंग’ असे नाना प्रकार असतात. या सगळया उत्पादनांनी त्यांची भूमितीय रचना सोडता कामा नये अशा प्रकारची उत्पादने नवघरे यांच्या कंपनीमध्ये तयार होतात. पूर्वी पारंपरिक पद्धतीने होणारे काम आता संगणकीय गणिती क्रियाआधारित होत आहेत. तशी अत्याधुनिक यंत्रासामग्री विकसित झाली आहे. ती सारी उपलब्ध करून घेतली गेली असल्याने एका कंपनीच्या तीन कंपन्या नवघरे चालवीत आहेत. येणाऱ्या ग्राहकाला त्याचे उत्पादन योग्य परिमाणात आहे की नाही, याची खातरजमा करण्यावर जोर दिला जातो. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक अचूकता आणणारे मनुष्यबळही आता विकसित केले जात आहे. सुदैवाने बाजारपेठेत एवढी मंदीची चर्चा असते, पण तशी कधी जाणवली नाही, असे नवघरे आवर्जून सांगतात. हे सारे करताना पायाभूत सुविधांमध्ये वाढ करावी लागते. अधिकाधिक काळानुरूप बदल करावे लागतात. तसे ते केल्याने सध्या त्यांच्या कंपन्यांमध्ये १५० जणांच्या हाताला काम आहे. त्यातील ७० जण हे अभियंते आहेत.

केवळ पैसा नाही तर आव्हाने स्वीकारत आपल्या ज्ञानावर उद्योग उभा करता येतो. याचा भरवसा बाळगून जे काम करतात त्यांना पुढे जाता येते असाच नवघरे यांचा अनुभव आहे.

– व्यवसाय : ‘फिक्स्चर’ उत्पादने

– व्यवसाय : ‘फिक्स्चर’ उत्पादने

– प्राथमिक गुंतवणूक : तीन लाख रुपये

– सध्याची उलाढाल : वार्षिक २५ कोटी रुपये

– रोजगार  :  १५० (पैकी ७० अभियंते)