अजय वाळिंबे
झायडस समूहाच्या कॅडिला हेल्थकेअरची स्थापना सुमारे ३२ वर्षांपूर्वी म्हणजे १९९५ मध्ये करण्यात आली. सुरुवातीला केवळ २५० कोटी उलाढाल असणाऱ्या या कंपनीने गेल्या तीन दशकांत लक्षणीय प्रगती तसेच आर्थिक वाढ साधली असून २०२२ च्या आर्थिक वर्षांकरता १५,२०० कोटी रुपयांहून जास्त उलाढाल नोंदविली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे झायडस लाइफ सायन्सेस (पूर्वाश्रमीची कॅडिला हेल्थकेअर) ही केवळ भारतातील मोठी कंपनी नसून एक जागतिक स्तरावरील भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाच्या या कंपनीकडे भारतातील पहिल्या ३०० पैकी सुमारे १२ प्रसिद्ध ब्रॅण्ड असून कंपनीचा निम्म्याहून जास्त व्यवसाय ब्रॅण्डेड उत्पादनांचा आहे. कंपनीचा २३,००० हून अधिक कर्मचारी वर्ग असून त्यापैकी सुमारे १,४०० शास्त्रज्ञ झायडसच्या आठ वेगवेगळय़ा ‘आर अँड डी सेंटर’मध्ये संशोधन करत आहेत. कंपनीच्या एकूण महसुलापैकी ४५ टक्के महसूल अमेरिकेला जेनेरिक औषधांच्या निर्यात व्यवसायातून आहे. झायडस संशोधन कार्याला महत्त्व देऊन सुमारे ७-८ टक्के महसूल खर्च संशोधनावर (‘आर अँड डी’) करते. झायडस ही भारतातील दुसरी सर्वात मोठी पशू आरोग्य सेवा कंपनी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपनी सध्या बायोसिमिलर्स, नवीन औषधे आणि लस उत्पादनात अग्रेसर असून झायडसचा २१ बायोसिमिलर रेणूंचा पोर्टफोलिओ आहे. ज्याला तिने उदयोन्मुख बाजारपेठेत आणि भारतात विकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. १२ हून अधिक लशींचा समावेश असलेल्या मोठय़ा उत्पादन बास्केटसह भारतीय फार्मा क्षेत्रामध्ये सर्वात मोठा एकत्रित जीवशास्त्र आणि लशींचा पोर्टफोलिओ आज झायडसकडे आहे. कंपनीने गेल्या दोन दशकांत कायम उत्तम कामगिरी करून दाखविलेली आहे. मार्च २०२२ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने उलाढालीत ७ टक्के वाढ नोंदवून ती १५,२६५ कोटी रुपयांवर गेली आहे, तर नक्त नफ्यात गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत १० टक्के घट होऊन तो २,१५४ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या दशकभरात कंपनीने सरासरी २१ टक्के दराने वार्षिक नफ्यात वाढ दाखवली आहे. शेअर बाजारातील मंदीचा परिणाम इतर कंपन्यांप्रमाणे झायडस लाइफसायन्सेसवर देखील झाला आहे आणि सध्या हा शेअर वर्षभराच्या नीचतम पातळीच्या (सुमारे ३५० रुपये) आसपास आहे. आधी जाहीर केल्याप्रमाणे सध्या कंपनी ६५० रुपये प्रति शेअर दराने टेंडर पद्धतीने पुनर्खरेदी (बाय बॅक) करत आहे. भागधारक गुंतवणूकदारांनी ‘बाय बॅक’चे टेंडर भरून हे शेअर्स सध्या आकर्षक असलेल्या किमतीत खरेदी करावेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biosimil portfolio zydus cadillac healthcare company amy
First published on: 27-06-2022 at 00:04 IST