सहकार गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनाची दिशा

मालकांना सदनिकांचा ताबा देऊन इमारतीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही परस्पर सहकाराने उचलली जावी, अशी या मागील संकल्पना आहे.

माणसांच्या मुख्यत: तीन मूलभूत गरजांपैकी महत्त्वाची एक गरज म्हणजे निवारा. सध्या वाढत्या शहरीकरणामुळे मोठय़ा शहरांमध्ये घरांची मागणी वाढत आहे. करोना टाळेबंदीचा काळ शहरवासीयांनी चांगला अनुभवला आहे. या काळाने दिलेला एक धडा म्हणजे घर हे फक्त निवाऱ्यापुरते नसून, ते आरामदायी आणि मानसिक स्वास्थ्यही सांभाळणारे असणे नितांत गरजेचे आहे. मात्र कमी जागा आणि वाढलेल्या किमतींमुळे घरांच्या आधुनिक रचनेच्या संकल्पनेने आता वेग धरला आहे; पण या सर्वाआधी सदनिकाधारकाने काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत, त्याची उजळणी ‘सहकारी हाऊसिंग डायरी २०२१’मध्ये केली गेली आहे.

गृहनिर्माण चळवळीचा पाच दशकांहून अधिक अनुभव असलेल्या डी.एस. वडेर यांनी ‘सहकारी हाऊसिंग डायरी २०२१’मध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबतच्या विविध विषयांची सविस्तर मांडणी केली आहे. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत सहकारी गृहनिर्माण संस्थेविषयी सामान्यांना पडणाऱ्या विविध प्रश्नांची उकल यात केलेली दिसून येते.

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून गृहप्रकल्पांची बांधणी केली जाते. बांधकाम व्यावसायिक आणि सदनिकाधारक एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करतात. मालकांना सदनिकांचा ताबा देऊन इमारतीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही परस्पर सहकाराने उचलली जावी, अशी या मागील संकल्पना आहे. लोकांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने नांदावे आणि एकमेकांच्या हिताचा विचार करून एक चांगला समाज निर्माण करावा, असा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्थापनेचा उद्देश असतो. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायदा आणि त्यांच्या व्यवस्थापनाबाबत कार्यपद्धती निर्माण केली असली तरी याबाबत बहुतांश लोक या संबंधाने अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. 

सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थपना कशी होते? संस्थेचे कार्य कसे चालते? गृहनिर्माण संस्थेच्या कामकाजाबद्दल काही मार्गदर्शक मुद्दे आणि माहिती म्हणून वडेर यांनी हाऊसिंग डायरीमार्फत दिली आहे. संस्थांच्या निवडणुका कशा होतात? किंवा एखाद्या सदनिकेचे हस्तांतरण कसे होते? संस्थेच्या विविध बैठका कशा घेतल्या जाव्यात? त्यासंबंधाने आदर्श नियमावली काय? संस्थेची येणी कशी वसूल करावयाची? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या डायरीच्या निमित्ताने एकाच ठिकाणी मिळणार आहेत. याचबरोबर संस्थेची नोंदणी, दैनंदिन कामकाजाची पद्धत याबद्दल सविस्तर आणि मुद्देसूद माहिती वडेर यांनी दिली आहे.

बदलत्या जीवनशैलीनुसार सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी महत्त्वाचे विषय असणाऱ्या सौरऊर्जा, ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ किंवा कचऱ्याचे व्यवस्थापन हे अत्यंत कळीचे विषयही वडेर यांनी हाताळले आहेत. काळाची गरज म्हणून अत्यावश्यक ठरलेल्या या सुविधांचा संस्थेला बराच आर्थिक फायदाही होतो. मात्र त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या आवश्यक परवानग्यांची नेमकी माहिती वडेर यांनी डायरीत दिली आहे. तसेच वेळोवेळी संस्थेच्या कामकाजात उपयुक्त ठरणारी शासकीय परिपत्रके आणि माहितीचा समावेश करण्यात आला आहे. अनेकांगी फायदे व दिशादर्शन पाहता ही डायरी प्रत्येक गृहनिर्माण संस्था आणि घर घेणाऱ्या प्रत्येकाच्या हाती असणे आवश्यक आहे.

गृहनिर्माण संस्था : संदर्भ डायरी २०२१

संपादक : डी. एस. वडेर

प्रकाशक : वडेर अँड असोसिएट्स

वितरक – मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ मर्या., मुंबई

कायदेशीर संदर्भासाठी मूल्य: ४५० रुपये

संपर्कासाठी ई-मेल – dsvader11@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Book review housing society reference diary 2021 zws

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक