क.. कमॉडिटीचा : हरभऱ्यासाठी धोक्याची घंटा

भारतातीलच नव्हे तर जागतिक पातळीवर देखील कृषीमाल बाजारपेठ अजूनही तेजीच्या शिखरावर किंवा त्याच्या आजूबाजूला आहे

श्रीकांत कुवळेकर ksrikant10@gmail.com

भारतातीलच नव्हे तर जागतिक पातळीवर देखील कृषीमाल बाजारपेठ अजूनही तेजीच्या शिखरावर किंवा त्याच्या आजूबाजूला आहे. अकृषक वस्तू, म्हणजे नैसर्गिक वायू, कच्चे तेल याबरोबरच धातूंच्या किमती देखील तेजीत असून मागील आठवडय़ामध्ये अ‍ॅल्युमिनियम, जस्त, निकेल आणि तांबे यांच्या किमती बऱ्यापैकी कमी झाल्या असल्या तरी त्या मानाने गहू, मका, खाद्यतेले अजूनही वधारलेलेच आहेत. कापूस तर भारतात दररोज नवे शिखर गाठत असून हजर बाजारात ८,००० रुपये क्विंटल पार जाऊन पोहोचला आहे तर वायद्यामध्ये ९,००० रुपयांची पातळी पार केली आहे. मागील लेखामध्ये कापसामध्ये जोखीम व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली आहेच.

या तेजीच्या वातावरणामागे वाईट हवामान, वाहतूक खर्चातील अफाट वाढ, कामगार टंचाई आणि पुढील हंगामात प्रमुख देशांमध्ये सलग दुसऱ्यांदा दुष्काळसदृश वातावरण अशी कारणे असली तरी कुठेतरी हेज फंडांनी कमॉडिटी मार्केटमध्ये अब्जावधी डॉलर्सची केलेली गुंतवणूक तेजीचा लगाम आपल्या हातात ठेवत असते. तो कधी आवळला जाईल आणि बाजारात मोठी घसरण येईल याचा भरवसा नसतो आणि हे आपल्याला समजण्यापूर्वीच बाजारात किमती घसरलेल्या असतात. यासंदर्भात नुकतेच सोयाबीनचे उदाहरण देता येईल. काय होतेय याचा अंदाज येण्यापूर्वीच सोयाबीन ८,००० रुपयांवरून ५,५००-५,२०० रुपयांवर आले देखील होते. कापसाबाबत असेच न घडो एवढेच आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने म्हणू शकतो.

तेजीच्या या कालखंडामध्ये एक कमॉडिटी मात्र अलिप्त राहिली आहे. ती म्हणजे हरभरा किंवा चणा. वस्तुत: मंदिरापासून मदिरालयापर्यंत आणि पंचतारांकित हॉटेलांपासून ते गोठे आणि तबेल्यांपर्यंत सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर मनुष्य आणि प्राण्यांच्या खाण्यासाठी वापरली जाणारी वस्तू म्हणजे चणा. भारतातील कडधान्यांच्या एकूण उत्पादनापैकी एकटय़ा चण्याचा वाटा ३५-४० टक्के म्हणजे ११० लाख टन एवढा मोठा असतो. थोडक्यात सांगायचे तर भारताचे आणि चण्याचे एक दृढ समीकरण आहे. अगदी अलीकडेपर्यंत ऑस्ट्रेलिया, रशिया किंवा कॅनडामध्ये चणा हा प्रामुख्याने भारतीयांसाठी पिकवला जात असे. अशा या लोकप्रिय कृषी वस्तूला या संपूर्ण वर्षांत जेमतेम महिनाभरच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाला असल्यामुळे या पिकाने शेतकऱ्यांची घोर निराशाच केली आहे.

मात्र या परिस्थितीचा दुष्परिणाम पुढील हंगामात भोगावा लागणार असल्याची चिन्हे आहेत. कारण पडलेल्या किमती, वायदे व्यवहारांवर बंदी आणि इतर पिकांचे विक्रमी भाव अशा तिहेरी संकटामुळे या रब्बी हंगामात शेतकरी चण्याकडे बऱ्यापैकी पाठ फिरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली तर पुढील वर्षांत हरभऱ्याचाही भाव गगनाला भिडेल. आणि ग्राहकांना त्याची झळ बसेलच परंतु उत्पादकांना देखील लागवड क्षेत्रात घट केल्यामुळे म्हणावा तसा फायदा होणार नाही.

चणा हे रब्बी पीक असून गव्हानंतर हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पीक आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर मोहरी येते. चण्याचे भाव आज हमीभावाच्या खाली गडगडले असताना दुसरीकडे मोहरी मात्र हमीभावापेक्षा दुपटीहून अधिकचा भाव खात आहे तर गहूदेखील निर्यातीमध्ये जोरदार कामगिरी करीत असल्यामुळे पुढील काळात भाव अधिक सुधारण्याची शक्यता आहेच. त्यातच कॅनडा, दक्षिण अमेरिका, युक्रेन, रशियासारख्या जगातील प्रमुख गहू उत्पादक देशांमध्ये प्रतिकूल हवामानामुळे गव्हाच्या उत्पादनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने भारतातील गव्हाला चांगले दिवस येतील अशी शक्यता वाढली आहे. मोहरीलादेखील भारतात विक्रमी भाव मिळण्याची अनेक कारणे आहेत. एकतर जागतिक बाजारात कॅनडा, युरोपसारख्या देशांमध्ये मोहरीच्या उत्पादनात मोठी घट संभवत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम मोहरीच्या तेलाच्या किमतीवर होताना दिसतो. तर भारतातदेखील मोहरीच्या तेलामध्ये भेसळ रोखण्यासाठी योजलेल्या उपाययोजना, तेलाची वाढती मागणी आणि एकंदरीतच खाद्यतेलातील आयातनिर्भरतेचा परिणाम होऊन मोहरी संपूर्ण वर्षभर महाग राहिली आहे. या परिस्थितीत शेतकरी आपल्या जमिनीपैकी जास्तीत जास्त जमीन या दोन पिकांखाली आणताना हरभऱ्याचे क्षेत्र कमी करण्याची शक्यता आहे.

मागील शुक्रवारी प्रसारित झालेल्या सरकारी आकडय़ांचा कल पाहिला तर याची प्रचीती येईल. शुक्रवार अखेरीस देशातील कडधान्यांखालील एकूण क्षेत्र ९.७ लाख हेक्टरवर आलेले दिसते. मागील वर्षी याच काळामध्ये १२.६ लाख हेक्टरवर कडधान्ये पेरली गेली होती. यावर्षी आतापर्यंत चण्याखालील क्षेत्र ७.७७ लाख हेक्टर असून मागील वर्षी याच काळात ते ९.३६ लाख हेक्टर एवढे होते असे सरकारी माहिती दर्शवते. या उलट मोहरीखालील क्षेत्रात मागील वर्षांच्या १९.६ लाख हेक्टरवरून २४.६७ लाख हेक्टर एवढी घसघशीत वाढ झालेली दिसत आहे. गव्हाच्या पेरणीला अजून थोडा वेळ आहे.

वर म्हटल्याप्रमाणे हीच परिस्थिती राहिली तर पुढील वर्षी चण्याचे उत्पादन घटल्यामुळे किमतीमध्ये तेजी येईलच परंतु थोडा व्यापक विचार करता असे म्हणता येईल की, भारतातील कडधान्य सुरक्षा ही प्रामुख्याने चणा पूर्ण करीत असल्यामुळे येऊ घातलेल्या परिस्थितीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. महागडी आयात करून येथील मागणी पूर्ण करावी की येथील शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळण्यासाठी आयात धोरण एकदम कडक करून येथील उत्पादनाला उत्तेजन द्यायचे याचा साकल्याने विचार व्हावा.

तसेच मागील वर्षी आपण पाहिले कीवायदे बाजारात देखील मोहरी आणि सोयाबीनच्या विक्रमी किमती असताना शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळीच जोखीम व्यवस्थापन करणे शक्य झाले आणि त्यातून त्यांचा मोठा फायदा झाला. परंतु आजघडीला चणा आणि मोहरी या दोन्ही वस्तू वायदेबाजारातून काही काळासाठी काढून घेण्यात आल्या आहेत. त्या तातडीने परत वायदे बाजारात आणल्यास शेतकऱ्यांना जोखीम व्यवस्थापनाचे एक खात्रीशीर साधन मिळून त्यांना आपले उत्पन्न वाढवण्याची एक संधी देखील प्राप्त होईल.

भारताचे आणि चण्याचे एक दृढ समीकरण आहे. मंदिरापासून मदिरालयापर्यंत आणि पंचतारांकित हॉटेलांपासून ते गोठे आणि ाबेल्यांपर्यंत सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर मनुष्य आणि प्राण्यांच्या खाण्यासाठी वापरली जाणारी ही वस्तू. अशा या लोकप्रिय कृषी वस्तूला या संपूर्ण वर्षांत जेमतेम महिनाभरच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळावा हे तर शेतकऱ्यांसाठी घोर निराशेचेच..

अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Boom in agricultural market gram rate in agricultural market zws

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news