सूर्य आता डोईवर आला

बाजाराचा तंत्र कल

|| आशीष ठाकूर

गेल्या लेखात ‘उच्चांकी मुसंडीसाठी,आवश्यक विश्रांती’मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे गेल्या आठवडयाच्या पूर्वार्धात निर्देशांकानी आपली विश्रांती पूर्ण करून, ताजातवाना होऊन तेजीची घोडदौड कायम राखली. या पाश्र्वभूमीवर या आठवडयाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव

  • सेन्सेक्स: ३८,६७२.९१
  • निफ्टी : ११,६२३.९०

हवामान खात्याने समाधानकारक पावसाचे केलेल भाकीत, तसेच या आठवडयातील रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणात कर्जावरील व्याजदरात पाव ते अर्धा टक्कय़ांची सवलत दिली गेली तर, या सुखद वातावरणात निर्देशांक नवीन उच्चांकाला गवसणी घालेल, तो अनुक्रमे सेन्सेक्सवर ३९,३०० आणि निफ्टीवर ११,८५० ते १२,००० असेल. येथे अल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्यांनी (गुंतवणूक कालावधी सहा महिन्यांहून कमी) २५ टक्कय़ांच्या चार तुकडयात प्रत्येक वाढीव टप्यावर समभागांची नफारूपी विक्री करणे गरजेचे आहे. कारण फेब्रुवारीमध्ये जेव्हा सेन्सेक्स ३५,३०० आणि निफ्टी १०,६०० वर होता तेव्हा गुंतवणूकदारांच्या मनात बाजार कोसळण्याची भीती वाटत होती, तेव्हा त्यांना धीर देण्यासाठी उष:काल होता होता..ही लेखमाला सुरू केली. कारण तेव्हा तांत्रिक विश्लेषणातील विविध प्रमेय ही त्या वेळच्या अंध:कारात देखील नवीन उच्चांकाचे दिशानिर्देशन करत होते.

आताच्या घडीला सेन्सेक्स ३५,३०० आणि निफ्टी १०,६०० च्या नीचांकापासून तब्बल सेन्सेक्सवर ३,३०० आणि निफ्टीवर १,००० अंशाहून अधिक वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात पहाटेचा अंधार होता, तर आता सूर्य डोईवर आहे. तेव्हा पुढील मंदीचा उष्माघात टाळण्यासाठी आता चालू असलेली ‘तेजीची झुळूक’ पदरात पाडून घेणे श्रेयस्कर.

मागील लेखाचे सूत्र पकडून आपण आता    १९९० च्या दशकाकडे वळूया.

देशाच्या उदयोगधंद्याच्या, व्यापार उदीम चक्राचे, आर्थिक प्रगतीच प्रतिबिंब म्हणजे भांडवली बाजाराचा निर्देशांक. ‘बॅरोमीटर ऑफ इकॉनॉमी’ असे त्याला म्हटले जाते. यात महत्त्वाची, अधोरेखित करण्याची गोष्ट ही की, आर्थिक प्रगती प्रथम व भांडवली बाजाराचा निर्देशांक हा दुय्यम पण १९९१ पासून दुय्यम असलेल्या शेअर बाजार निर्देशांकालाच अतोनात महत्त्व प्राप्त झाले. चढता, तेजाळलेला भांडवली बाजार निर्देशांक म्हणजे औद्योगिक आघाडीवर चौफेर घोडदौड अशा खुळचट कल्पना जन्माला आल्या, त्यामुळे आर्थिक आघाडीवरची प्रगती ही ‘बाळसे आहे की सूज’ हेच कळेनास झाले. हेच बरोबर १९९२ साली हर्षद मेहताचा घोटाळा, २००८ चा अमेरिकेचे सब प्राईम अरिष्ट आणि चीनमधील सरकार पुरस्कृत तेजी, या सर्वाचा शेवट अर्थव्यवस्थेस हादरा देणारे ठरले.

आता आपण हर्षद मेहताचे प्रस्थ वाढण्यामागील कारणे समजून घेऊ.

  • प्रत्येक सरकारी बँकांनी नफा कमावलाच पाहिजे, असा सरकारी आदेश.
  • जागतिक बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी भारतीय भांडवली बाजार सुदृढ असण्याची गरज.

सरकारी फतव्यामुळे सरकारी बँकांनी अल्पावधीत नफा आणायचा कुठून? हा यक्ष प्रश्न उभा ठाकला त्यावरच उत्तर.. बँकांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक हे हर्षद मेहतांच्या दारात उभे राहू लागले. बँकांच्या तिजोऱ्यांची दारे हर्षदसाठी ‘तिळा तिळा दार उघड’सारखी उघडू लागली.

या संधीचा पुरेपूर फायदा हर्षदने कसा उठवला, ते पुढील लेखात जाणून घेऊ.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bse nse nifty sensex

ताज्या बातम्या