|| प्रवीण देशपांडे

भांडवली बाजारातील समभागांची खरेदी-विक्री करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तसेच वायदे बाजारात (फ्युचर्स अँड ऑप्शन्स) व्यवहार करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. समभागाच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा आणि समभागावर मिळालेला लाभांश करपात्र आहे. तसेच वायदे बाजारातील व्यवहारावर होणारा भांडवली नफा हादेखील करपात्र आहे. समभागाच्या विक्रीवर भरावा लागणारा कर हा काही निकषावर अवलंबून असतो.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

प्राप्तिकर कायद्यानुसार समभाग हे प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपनीचे समभाग आणि दुसरे म्हणजे भांडवली बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपनीचे समभाग.  सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागाची भांडवली बाजारात खरेदी-विक्री केली जाते.  सूचिबद्ध  नसलेल्या कंपन्यांच्या  समभागांचे खरेदी-विक्री व्यवहार खासगीरीत्याच केले जातात.

भांडवली बाजारात जे व्यवहार केले जातात त्यामध्ये गुंतवणूक (दीर्घ किंवा अल्प मुदतीची), समभाग खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि वायदे बाजार व्यवहारांचा समावेश होतो. या प्रत्येक प्रकारात करविषयक नियम वेगळे आहेत. हे व्यवहार प्रामुख्याने दोन प्रकारांत विभागले जातात :

१. ज्या समभागांची डिलिव्हरी घेतली जाते : समभागामध्ये खरेदी-विक्री हा व्यवहार ‘गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न म्हणजेच भांडवली नफा’ किंवा ‘उद्योग-व्यवसायातील उत्पन्न’ मध्ये दाखवायचा हा संभ्रम करदात्यांच्या मनात नेहमी येतो. या दोन्ही प्रकारच्या उत्पन्नावर कर आकारणी भिन्न आहे आणि अनुपालनसुद्धा वेगळे आहे. ज्या समभागाची खरेदी, नफा मिळविण्याच्या उद्देशाने केली आहे असे व्यवहार उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न म्हणून समजले जातात आणि ज्या समभागाची खरेदी लाभांश मिळविण्याच्या आणि भांडवली वृद्धी या उद्देशाने केली आहे असे व्यवहार ‘भांडवली नफा’ या उत्पन्नाच्या स्रोतात गणले जातात. करदात्याला आपले उत्पन्न कोणत्या स्रोतात करपात्र आहे हे जाणून घेतले पाहिजे. ‘भांडवली नफ्याच्या’अंतर्गत भरावा लागणारा कर सवलतीच्या दरात आहे. जर करदाता उद्योग-व्यवसाय म्हणून हे व्यवहार करत असेल तर ‘उद्योग-व्यवसायाच्या’ उत्पन्नासाठी असणार्या प्राप्तिकर कायद्यातील सर्व तरतुदी अशा व्यवहारासाठी लागू होतात. अशा व्यवहारात तोटा झाला तर तो इतर उत्पन्नातून वजा करण्याचा आणि पुढील वर्षासाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करण्याच्या तरतुदी वेगळ्या आहेत. उद्योग-व्यवसायाचा तोटा हा इतर उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून किंवा इतर उत्पन्नातून (पगाराचे उत्पन्न सोडून) वजा करता येतो. दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो. अल्पमुदतीचा तोटा हा अल्प किंवा दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. (समभागांची डिलिव्हरी घेणे म्हणजेच जे समभाग एका दिवसांपेक्षा अधिक काळ आपल्या डिमॅट खात्यात बाळगले जातात.)  

२. ज्या समभागांची डिलिव्हरी घेतली जात नाही : यामध्ये ‘इंट्राडे’ आणि बायडे बाजारातील व्यवहारांचा समावेश आहे. या व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न ‘उद्योग-व्यवसायाचे’ उत्पन्न म्हणूनच गणले जाते. याचे कारण म्हणजे हे व्यवहार फक्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने केले जातात. यामुळे ‘उद्योग-व्यवसायाच्या’ उत्पन्नासाठी असणाऱ्या प्राप्तिकर कायद्याच्या सर्व तरतुदी अशा व्यवहारासाठीसुद्धा लागू होतात.

इंट्राडे व्यवहार : ‘इंट्राडे’ व्यवहारात समभाग ज्या दिवशी खरेदी केले जातात, त्याच दिवशी विकले जातात आणि त्याची डिलिव्हरी म्हणजेच ते आपल्या डिमॅट खात्यात खरेदी करून ठेवले जात नाही. त्यामुळे हे सट्टा उत्पन्न (स्पेक्युलेटिव्ह) म्हणून करपात्र असते. विवरणपत्रात हे उत्पन्न सट्टा उत्पन्न या शीर्षकाखाली दाखवावे लागते. हे सट्टा उत्पन्न नकारात्मक असेल, म्हणजेच तोटा असेल तर हा तोटा इतर उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही. असा वजा न झालेला तोटा पुढील चार वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि तो फक्त सट्टा उत्पन्नातूनच वजा करता येतो. यासाठी विवरणपत्र मुदतीत दाखल केले असले पाहिजे आणि हा तोटा विवरणपत्रात दाखविला असला पाहिजे.

वायदे बाजार व्यवहार : या व्यवहारामध्येसुद्धा समभागाची डिलिव्हरी घेतली किंवा दिली जात नसली तरी हे व्यवहार सट्टा उत्पन्न या शीर्षकाखाली गणले जात नाहीत, या व्यवहारातून मिळालेले उत्पन्न सामान्य उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न म्हणूनच गणले जाते. हे उत्पन्न नकारात्मक असेल म्हणजेच तोटा असेल, तर हा तोटा इतर उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून, सट्टा उत्पन्नातून किंवा इतर उत्पन्नातून (पगाराचे उत्पन्न सोडून) वजा करता येतो हा तोटा पुढील आठ वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो आणि तो उद्योग व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो. यासाठी विवरणपत्र मुदतीत दाखल केले असले पाहिजे आणि हा तोटा विवरणपत्रात दाखविला असला पाहिजे.

असा व्यवहार करणाऱ्यांनी आपले व्यवहार उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नात आणि भांडवली नफ्याच्या उत्पन्नात योग्य पद्धतीने दाखविणे गरजेचे आहे. या दोन्हीसाठी करआकारणी आणि अनुपालन वेगवेगळे आहे. उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नासाठी लेखे आणि लेखा-परीक्षणाच्या तरतुदी लागू होतात. असे व्यवहार करणाऱ्या करदात्याला या तरतुदी तपासून पाहणे गरजेचे आहे. तसेच अनुमानित कराच्या तरतुदीदेखील या व्यवहारासाठी लागू होतात. या तरतुदींचे पालन न केल्यास करदात्याला दंड भरावा लागू शकतो. जे करदाते असे व्यवहार करतात त्यांना हे व्यवहार विवरणपत्रात योग्य सदराखाली दाखविणे गरजेचे असते. प्राप्तिकर खात्याकडे विविध माध्यमातून करदात्याच्या व्यवहारांची माहिती मिळत असते. असे व्यवहार विवरणपत्रात न दाखविल्यास प्राप्तिकर खाते करदात्याला नोटीस पाठवू शकते. 

उद्याचा अर्थसंकल्प….

उद्या लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून असलेले करोनाचे संकट, महागाई, वाढलेला वैद्यकीय खर्च या पार्श्वभूमीवर उद्याचा अर्थसंकल्प कसा असेल याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. करोनाच्या महामारीमुळे उद्भवलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना मिळणे गरजेचे आहे. महामारीमुळे अनेकांचे उत्पन्न कमी झाले, नोकऱ्या गेल्या, मागणी कमी झाली यासाठी अर्थसंकल्पात ठोस तरतुदी अपेक्षित आहेत. कर कमी करणे, वजावटीची मर्यादा वाढविणे असे उपाय घेतले जातील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे उद्या मिळतील.

सर्वसामान्य करदात्यांच्या प्रत्यक्ष कराबाबत काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले पाहिजे.

१. कलम ‘८०सी’मध्ये मिळणारी दीड लाख रुपयांच्या वजावटीची मर्यादा वाढवून अडीच लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची अपेक्षा आहे. सध्याची दीड लाखाची मर्यादा २०१४-१५ या वर्षात वाढविली होती. महागाई विचारात घेता ही मर्यादा वाढविणे अपेक्षित आहे.

२. गृहकर्जावरील व्याजावर सध्या दोन लाख रुपयांपर्यंत वजावट मिळते, महानगरातील घरांच्या किमती बघता ही मर्यादा अडीच लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची अपेक्षा आहे.

३. भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या समभागावरील दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर कमी करणे आणि समभाग उलाढाल कर (एसटीटी) कमी करण्याची मागणी होत आहे.

४. कलम ‘८० टीटीबी’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना व्याजावर ५०,००० रुपयांची वजावट मिळते, ती वाढवून एक लाख रुपये करावी अशीही मागणी होत आहे.  

५. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बरेच कर्मचारी घरातूनच काम करतात आणि यासाठी काही खर्चसुद्धा होतो. यासाठी अतिरिक्त वजावट किंवा प्रमाणित वजावटीत वाढ अपेक्षित आहे.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com