माझा पोर्टफोलियो : ‘पोर्टफोलियो’ला लज्जतदार तजेला

कंपनी आपल्या व्हिएतनाममधील प्रकल्पाची उत्पादन क्षमता १३,५०० टनांवरून वाढवत २७,००० टन करणार आहे.

अजय वाळिंबे

वर्ष १९९४ मध्ये स्थापन झालेली ‘कॉन्टिनेन्टल कॉफी’ म्हणजेच आताची ‘सीसीएल प्रॉडक्ट्स (इंडिया) लिमिटेड’. कंपनी कॉफीचे उत्पादन, व्यवहार (ट्रेडिंग) तसेच वितरण व्यवसायात आहे. १९९५ मध्ये कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे भांडवली बाजारात नोंदणी केल्यापासून गेल्या २६ वर्षांत कंपनीने उत्तम प्रगती साधून भारतात तसेच जागतिक बाजारपेठेत स्वत:ची नाममुद्रा प्रस्थापित केली आहे. कंपनीचे आंध्र प्रदेशमध्ये दोन उत्पादन प्रकल्प असून परदेशातील स्वित्र्झलड (कॉन्टिनेन्टल कॉफी एसए) आणि व्हिएतनाममध्ये देखील प्रत्येकी एक प्रकल्प आहे. जगभरातील ९० हून अधिक देशांतील आघाडीच्या जागतिक कॉफी उत्पादकांसाठी ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ २५० हून अधिक ‘इन्स्टंट कॉफी’चे मिश्रण तयार करते.

भारत, व्हिएतनाम आणि स्वित्र्झलडमधील प्रकल्पात कंपनी स्प्रे-ड्राईड (२४,००० टन) आणि फ्रीझ-ड्राईड (११,००० टन) क्षमता असलेली ही जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. देशांतर्गत व्यवसायामध्ये ‘बी२बी’ (इन्स्टंट कॉफीचे उत्पादन) तसेच ‘कॉन्टिनेंटल’ नाममुद्रेखाली ‘बी२सी’ कॉफी व्यवसाय दोन्ही समाविष्ट आहेत. कंपनीची ७५,००० आऊटलेट्स (विक्री दालने) असून उत्तम वितरण व्यवस्था असून दक्षिण भारतातील बाजारपेठेत कंपनीचा ४ टक्के बाजार हिस्सा आहे. युरोपियन बाजारपेठेत कंपनीने ‘कॉन्टिनेन्टल’ या नाममुद्रेखाली अनेक उत्पादने सादर केली आहेत. तसेच देशांतर्गत प्रीमिक्सची वाढती मागणी पाहता कंपनीने ‘धीस’ या नाममुद्रेअंतर्गत मालगुडी, कॅपाचीनो, मोका, हेजलनट आणि कॅरमल अशी नवीन श्रेणी बाजारपेठेत सादर केली आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये सरलेल्या तिमाहीत जाहीर केलेले निकाल अपेक्षेप्रमाणे आले असून कंपनीने या कालावधीत ३३७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तसेच जून २०२१ पर्यंत ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ला ‘एमईआयएस’ (मर्चंडाईज एक्सपोर्ट इंडिया स्कीम) योजनेअंतर्गत सात कोटी रुपये मिळाले असून कंपनीला मार्च २०२२ पर्यंत आणखी १५ कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. कंपनी आपल्या व्हिएतनाममधील प्रकल्पाची उत्पादन क्षमता १३,५०० टनांवरून वाढवत २७,००० टन करणार आहे. यामुळे आगामी कालावधीत कंपनी भारतातील वाढत्या मागणीसाठी देशांतर्गत उत्पादन वापरू शकेल.

पडलेल्या बाजारात ‘सीसीएल’चा समभाग तुम्हाला आकर्षक भावात मिळू शकेल. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून हा ग्राहकोपयोगी कंपनीचा समभाग तुमच्या पोर्टफोलियोचे संतुलन सांभाळू शकेल.

सीसीएल प्रॉडक्ट्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५१९६००)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ३९०/-

वर्षांतील उच्चांक/ नीचांक : रु. ४९५/२२६

बाजार भांडवल :

रु. ५,९९२ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. २६.६१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ४६.१९

परदेशी गुंतवणूकदार      ९.२१

बँक/ म्यु. फंड/ सरकार   १७.७३

इतर/ जनता     २६.८७

संक्षिप्त विवरण

* शेअर गट : स्मॉल कॅप

* प्रवर्तक       : छल्ला राजेंद्र प्रसादी

* व्यवसाय क्षेत्र  :कॉफी उत्पादन आणि वितरण

* पुस्तकी मूल्य : रु. ८७.३

* दर्शनी मूल्य : रु. २/-

* गतवर्षीचा लाभांश : २०० %

शेअर शिफारशीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. १४.२४

*  पी/ई गुणोत्तर :      २७

*  समग्र पी/ई गुणोत्तर :       ७५.१

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.४२

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    १५.२

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : १६.५

*  बीटा :      ०.९

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ccl products india ltd company profile zws