scorecardresearch

क..कमॉडिटीचा : जागतिक मंदीत कापूस तरणार?

या वर्षीचा मोसमी पावसाचा हंगाम अधिकृतपणे संपला असला तरी मागील दोन वर्षांप्रमाणेच ऑक्टोबर किंवा कदाचित नोव्हेंबर-डिसेंबरमध्येदेखील पाऊस पडत राहिल्यास आश्चर्य वाटणार नाही.

क..कमॉडिटीचा : जागतिक मंदीत कापूस तरणार?

श्रीकांत कुवळेकर

या वर्षीचा मोसमी पावसाचा हंगाम अधिकृतपणे संपला असला तरी मागील दोन वर्षांप्रमाणेच ऑक्टोबर किंवा कदाचित नोव्हेंबर-डिसेंबरमध्येदेखील पाऊस पडत राहिल्यास आश्चर्य वाटणार नाही. याचे कारण लागोपाठ तिसऱ्या वर्षी आपण ला-निना या समुद्रीय तापमानाशी संबंधित असलेल्या हवामानविषयक घटनेला सामोरे जाणार आहोत. ला-निनाच्या प्रभावामुळे भारतात अतिवृष्टी होते तर अमेरिका खंडामध्ये दुष्काळ पडतो. त्यामुळे येथे खरीप पिकांच्या ऐन काढणीच्या हंगामामध्ये पावसाचे आव्हान उभे ठाकेल अशी परिस्थिती आहे. यामध्ये कडधान्यांच्या जोडीला सोयाबीन या आपल्या राज्यातील महत्त्वाच्या पिकाकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर दोन-तीन वेचण्या होणारे कापूस हे महत्त्वाचे पीक असून त्याची पहिली वेचणी लवकरच चालू होणार आहे, परंतु पाऊस पडत राहिला तर त्यातदेखील खंड पडेल की काय अशी चिंता लागून राहिली आहे.

दुसरीकडे २०२२-२३ वर्षांकरिता अन्नधान्य उत्पादनाचे पहिले अनुमान केंद्र सरकारने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. त्यातील आकडे नेहमीप्रमाणेच अपेक्षेपेक्षा चांगले दिसत असले तरी एप्रिलमध्ये प्रसारित होणाऱ्या तिसऱ्या अनुमानापर्यंत ते कितपत टिकतील याबाबत शंका उपस्थित करायला जागा आहे, परंतु सरकारी अनुमान आणि त्याचे कमोडिटी बाजारावरील परिणाम हा आजचा विषय नाही. मुळात ऑक्टोबर हा खरीप काढणीबरोबरच पिकांची अनुमाने प्रसिद्ध करण्याचा हंगामदेखील असतो. यात अनेक व्यापारी संस्था, कंपन्या आणि निमसरकारी किंवा खासगी सर्वेक्षण रिपोर्ट यांच्या माध्यमातून अनेक पिकांचे अनुमान प्रसिद्ध केले जाते, परंतु हे अंदाज प्रसिद्ध करताना त्यामध्ये त्या त्या संस्थेचे आणि त्यांच्या सभासदांचे हित लक्षात घेऊनच तसे आकडे प्रसिद्ध केले जातात. त्यातून येणाऱ्या मंदीमध्ये विशिष्ट वर्गाकडून भरपूर माल खरेदी करून त्याची साठवणूक केली जाते. मग कालांतराने अशी बिनबुडाची अनुमाने कमी केली जाऊन तेजी आणली जाते, परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कारण अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांनी आपला माल मंदीत विकून टाकलेला असतो. वर्षांनुवर्षे चालणारी ही प्रथा यावर्षीदेखील अनुभवायला मिळत आहे. सोयाबीन आणि कापूस यांचे बंपर उत्पादन होणार असल्याच्या बातम्या सर्वत्र ऐकायला मिळत आहेत. आजवरची पीक परिस्थिती पाहता ऑक्टोबरमध्ये पावसाने कृपा केली तर सोयाबीनचे उत्पादन मागील वर्षांपेक्षा चांगले होईल अशी परिस्थिती आहे. पुढील तीन-चार आठवडय़ांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. आजच्या घटकेला या अनुमानाचा परिणाम किमतीवर झालेला आहे. कारण सोयाबीन मागील चार-सहा आठवडय़ांमध्ये २० टक्के तरी घसरले असून आज ४,७०० रुपये प्रति क्विंटलजवळ आले आहे. म्हणजे जेमतेम वर्ष-दीड वर्षांपूर्वी १०,००० रुपयांनादेखील न मिळणारे सोयाबीन आज निम्म्याहून कमी झाले आहे.

अर्थात, हा सोयाबीनबाबतचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील महिन्याभरात हवामानानुसार हा अंदाज बदलू शकतो. त्याबरोबरच कापसाचे उत्पादन अनुमानदेखील मागील वर्षांपेक्षा सुमारे २० टक्के अधिक दाखवायचा प्रयत्न केला जातोय. त्याला कसे सामोरे जायचे हाच आपला आजचा विषय आहे. कारण वायदे बाजारात ५०,००० रुपये प्रति गाठ ही विक्रमी पातळी गाठलेला कापूस आता ३१,००० रुपयांच्या खाली घसरला आहे. हा नवीन हंगामाच्या कापसाचा भाव आहे. हजर बाजारात खरेदी-विक्रीदारांची गरज आणि मालाच्या दर्जानुसार सुमारे ८,००० – ९,००० रुपये क्विंटलच्या दरम्यान हा भाव आहे. उशिरा लागवड आणि सप्टेंबरमधील पावसामुळे हंगाम सुमारे महिनाभर पुढे ढकलला गेलाच आहे आणि पाऊस थांबला नाही तर तो अजून दोन आठवडे पुढे जाऊ शकेल.

कापूस पीक अंदाज
वर म्हटल्याप्रमाणे सध्या पीक उत्पादनांच्या अनुमानांचादेखील हंगाम चालू झालेला आहे. यापैकी सर्वाचे लक्ष लागलेले अनुमान असते ते ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’कडून जाहीर होणाऱ्या अनुमानांकडे. मागील वर्षी सुरुवातीला ३७० लाख गाठीचे अनुमान हंगाम संपत आला तेव्हा ३१५ लाख गाठींवर आले होते. हे पाहता कापूस क्विंटलमागे ५,००० रुपयांवरून १२,००० रुपयांवर का गेला होता हे लक्षात येईल. मागील वर्षांतील अनुभव लक्षात घेऊन या वर्षी असोसिएशनने सावध पवित्रा घेतला आहे. जर यापुढील हवामान अनुकूल राहिले तर उत्पादन ३७५ लाख गाठींवर जाऊ शकेल. परंतु पाऊस चालू राहिला तर उत्पादन ३२५ लाख गाठींपर्यंत खाली येईल असे असोसिएशनचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांचे मत आहे. येथे लक्षात घेणे गरजेचे आहे की, मागील वर्षीदेखील ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील पावसाने मोठे नुकसान झाले होते. अर्थात याची कल्पना असोसिएशनला नक्कीच असावी, परंतु किमती नियंत्रणात राहण्यासाठी उत्पादनातील घट एकदम न दाखवता हळूहळू कमी करीत नेण्यासाठी केंद्राने दबाव आणला असावा हे जाणकारांना सांगण्याची गरज नाही.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या हमीभाव खरेदी करणाऱ्या सरकारी संस्थेच्या म्हणण्यानुसार कापूस उत्पादन यंदा ३६० लाख गाठीचे उत्पादन अपेक्षित आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या पहिल्या अंदाजाप्रमाणे ३७० लाख गाठी या लक्ष्याच्या तुलनेत उत्पादन ३४२ लाख गाठींचे अंदाजले गेले आहे, जे मागील वर्षीपेक्षा १० टक्क्यांनी अधिक आहे. सर्वात महत्त्वाच्या म्हणजे अमेरिकन कृषी खात्याच्या अनुमानांमुळे तर जास्त संभ्रम निर्माण झाला आहे. कारण सप्टेंबरमधील अधिकृत अनुमानाप्रमाणे २०२२-२३ वर्षांकरिता भारतातील उत्पादन ३५८ लाख गाठी होणार आहे. वरील सर्व आकडे हे उत्पादनाबाबतचे असले तरी ते एकंदर हंगामातील मागणी-पुरवठा समीकरण दर्शवत नाहीत. याबाबतीत अमेरिकन कृषी खात्याच्या दिल्लीमधील कार्यालयाच्या संपूर्ण हंगामातील मागणी-पुरवठा तालिकेतील आकडे काही वेगळेच दर्शवतात. उत्पादन जरी अधिकृत उत्पादनाशी मिळतेजुळते असले तरी २०२२-२३ वर्षांसाठी मागणी सुमारे आठ लाख गाठींनी अधिक आहे. तसेच पुरवठय़ाच्या बाजूला किमतीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक म्हणजे वर्षांअखेरचा शिल्लक साठा. अधिकृत अनुमानाप्रमाणे सुमारे ११५ दशलक्ष गाठी असणारा हा आकडा चक्क ९० दशलक्ष गाठींपेक्षादेखील कमी दाखवला आहे. म्हणजे मागणी अधिक आणि पुरवठा कमी हे समीकरण किमतींसाठीपोषक आहे. हा अंदाज खरा मानावा का? होय, कारण मागील वर्षांच्या सप्टेंबर महिन्यातदेखील साधारण अशीच स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी अधिकृत अंदाजापेक्षा भारतातून व्यक्त केलेला अंदाज अधिक अचूक ठरला होता. त्यानंतर कापसात काय झाले हे सांगायची आवश्यकता नाही. हवामान अंदाज पाहिले तर ला-निनाच्या प्रभावामुळे पुढील काळात भारतात पाऊस वाढेल आणि कापूस-बहुल अमेरिका आणि ब्राझील भागात परत दुष्काळाची शक्यता राहील. त्यामुळे तेथील उत्पादनदेखील अपेक्षेपेक्षा घटू शकेल.

जागतिक मंदीचा पदर
एकंदर कापसासाठी मध्यम अवधीसाठी तेजीदर्शक घटक स्पष्ट होत असले तरी यावर्षीची जागतिक अर्थव्यवस्थेची अवस्था वेगळी आहे. मागील वर्षी करोना लाटेतून बाहेर आलेल्या जगामध्ये इतर वस्तूंप्रमाणेच वस्त्र-प्रावरणांची जोरदार खरेदी झाली होती. त्यामुळे कापसाला अधिक आधार मिळाला होता, परंतु या वर्षी महागाई रोखण्यासाठी संपूर्ण जगामध्ये व्याजदर वाढीची अहमहमिका लागली आहे. त्यातही अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हने अजून तीन दरवाढीचा अंदाज दिल्यामुळे डॉलर सोडून सर्व चलने कमजोर झाली आहेत. त्यामुळे जागतिक शेअर आणि कमोडिटी बाजार सुनामीला सामोरे जातील अशा शंका व्यक्त होत आहेत. तसेच युरोप आणि इतरत्र मंदीची सुरुवात झाल्याचेदेखील हळूहळू स्पष्ट होत आहे. भारतातदेखील याची सुरुवात झालीच आहे, परंतु घसरत्या रुपयामुळे कापसासारख्या निर्याताभिमुख कमोडिटीजला थोडा आधार मिळतो हेही खरे आहे.

वरील परिस्थिती पाहता या वर्षी कापसामध्ये परत मागील वर्षीचा विक्रम गाठणे अशक्य वाटत असले तरी पहिले दोन महिने कापूस साठवणूक करून ठेवणे इष्ट ठरेल. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणे योग्य ठरेल.

अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या